अटल बिहारी वाजपेयी यांनी म्हटले होते की “ज्या लोकशाही देशात विरोधी पक्ष नेता सत्ताधाऱ्यांच्या पाठीशी आहोत असे आश्वासित करीत आहे. त्या देशाचा कोणीही पराभव करू शकणार नाही..! ”
काश्मीर खोऱ्यात विषयी सर्वच भारतीयांना आकर्षण आहे. तसेच पाकिस्तानशी जोडलेल्या गूढ राजकारणाचे भूत देखील मानेवर नेहमी बसलेले असते आणि काश्मीर खोऱ्यात राहणारे सारे भारताचे विरोधकच आहेत इतकेच नव्हे तर शत्रू देखील आहेत. असा देखील एक सार्वजनिक समाज भारतीयांच्या मनाच्या तळात घर करून बसलेला आहे. पहेलगाम जिल्ह्यातील बैसरन घाटीत गेल्या आठवड्यात झालेल्या पर्यटकांच्यावरील दहशतवाद्यांच्या बेछूट गोळीबाराने सत्तावीस जणांसह सय्यद आदिल हुसैन शाह या वीस वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला.
या हल्ल्यात मृत्यू पडणाऱ्यामध्ये तो एकमेव काश्मिरी होता. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला विरोध करण्यासाठी आदिल सय्यद पुढे सरसावला आणि त्याची गोळ्या घालून चाळण करण्यात आली. दहशतवाद्यांनी नावे विचारली. हिंदू नागरिकांनाच वेचून मारले. महिला आणि लहान मुलांना हात लावला नाही.पतीला गोळ्या घातल्यावर त्याच्या पत्नीला सांगितले, “जाऊन सांगा तुमच्या मोदींना” अशा स्वरूपाच्या या बातम्या या हल्ल्यानंतर प्रसारित झाल्या. त्याचा परिणाम असा झाला की, अंधभक्तांनी हिंदू विरुद्ध मुस्लिम जणू युद्ध सुरू झाले आहे, असे वातावरण करून सोडले. वृत्तवाहिन्यांनी ताळतंत्र सोडलेले होते. भारत विरुद्ध पाकिस्तान युद्धासाठी देखील तयार झाले आहेत. असे मसालेदार वर्णन करणारे बातमीपत्रे सुरू केली होती. दहशतवाद्यांच्या हल्ल्याची प्रतिक्रिया मुस्लिमांचा व्देष करणारी उमटते हे पाहून सरकारने देखील गावगुंडा सारखी भाषा सुरू केली. काश्मीर प्रश्नावरून आपल्या नागरिकांची घोर फसवणूक करणाऱ्या पाकिस्तानच्या नेत्यांनाही चेव चढला होता. पाकिस्तान युद्धाला तयार आहे, अशी भाषा त्यांनी सुरू केली. भारताविरुद्ध तीन युद्ध्ये करून पाकिस्तानने कशाप्रकारे पराभव करून स्वतःचा देश देखील एकत्र ठेवू शकले नव्हते किंवा नाहीत. आता पुन्हा तशाच वल्गना करू लागले आहेत. भारताची बाजू नेहमीच खरी ठरली आहे काश्मीर खोऱ्यात गेली चार दशके अशांतता निर्माण करून भारताला अडचणी आणण्याचे सर्व प्रयत्न करून झाले.
भारतात हिंदू – मुस्लिम दंगे कसे पेटतील. यासाठी नेहमीच आगीत तेल ओतण्याचे काम पाकिस्तानचे सरकार आणि लष्कराने केले आहे. पहेलगामच्या हल्ल्यातून हिंदू-मुस्लीम तणाव निर्माण होईल, दंगे धोपे होतील अशी अपेक्षा पाकिस्तान करीत होता. प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. भारतीय अंध भक्तांनी देखील मुस्लिम समाजाला शिव्या देऊन हिणवलं. ते अपेक्षितच होते असे म्हणायला हरकत नाही. अशा परिस्थितीत काश्मीरमधील वास्तव वेगळेच होते. सामान्य काश्मिरी माणूस आपल्या घरातील माणसावर जेवढे प्रेम करतो, त्यांना जीव लावतो, तेवढेच किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक प्रेम या हल्ल्याच्या वेळी व्यक्त केले. अनेक वेळा दहशतवाद्यांनी हल्ले केले ते भारतीय सैनिकांवर किंवा त्यांच्या ताफ्यावर हल्ले केले होते. अशा अतिरेक्यांना टिपून काढण्यात आले. काहींना पाकमध्ये आश्रम मिळाला असेल पण भारतीय जवानांनी काश्मीरचे नंदनवन जीवाची बाजी लावून सुरक्षित ठेवले आहे.
पुलवामा मध्ये २०१९ च्या फेब्रुवारी महिन्यात सैनिकांच्या ताफ्यावर हल्ला करून चाळीस जवानांना ठार मारण्यात आले होते. त्यावरून प्रचंड राजकीय वाद झाला आहे. तत्कालीन जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जम्मू ते ते श्रीनगर या जवानांना रस्ते मार्गे घेऊन जाऊ नये. त्यांच्या ताफ्यावर हल्ला होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यांना खास विमानाने हलवण्यात यावे असे केंद्र सरकारला कळविले होते.
केंद्र सरकारने विमान देण्यास नकार दिला आणि जवानांचा ताफा जम्मू ते श्रीनगर रस्ते मार्गाने जात असताना पुलवामा येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला. तेव्हा सारा देश हळहळला. संताप व्यक्त करण्यात आला. पुढे निवडणुका जाहीर झाल्या आणि पुलवामामधील हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना सरकार धडा शिकवेल. शहीद जवानांचे स्मरण करून मतदान करा, असा थेट प्रचार खुद्द पंतप्रधानांनी केला. सैनिकांच्या मृत्यूचे राजकारण करण्यात आले. पहलगाममध्ये जो हल्ला झाला तो सर्वसामान्य भारतीय पर्यटकावर झाला. तो देखील बेछूट नव्हता. हेतूता वेचून मारण्यात आले.
पहलगामपासून काही अंतरावर असलेल्या बैसरन घाटीत हा हल्ला झाला. तेव्हा जे मृत्युमुखी पडले त्यांचे जवळचे नातलग जवळच होते. शिवाय सामान्य काश्मिरी मुस्लिम सोबत होते. पहलगाम ते बैसरन घाटीत जाण्यासाठी चालावे लागते किंवा घोड्यावरून जावे लागते. स्थानिक नागरिकांच्या मदतीने हे पर्यटन गेले होते. एकही संपूर्ण कुटुंब दहशतवाद्यांनी मारले नाही. हिंदु असलेल्या पुरुष पर्यटकांनाच मारले. पत्नी बहीण किंवा मातेला तसेच लहान मुलांना हात लावला नाही. पर्यटकांना मदत करण्यासाठी स्थानिक तरुण व्यावसायिक त्यांच्याबरोबर होते. त्यांनाही हात लावला नाही. भारतीय नागरिकांनी दहशतवाद्यांचा हल्ला थेट कधी पाहिला नव्हता. या प्रसंगी य स्थानिक काश्मिरी तरुण आणि व्यावसायिक यांच्या चेहऱ्यावरील भाव अनुभवले. पहेलगाम ते श्रीनगरपर्यंत येईपर्यंत या पर्यटकांच्या दुःखाला पारावर राहिला नव्हता. त्यांना आधार देण्याचे काम याच सामान्य काश्मिरी तरुण व्यवसायिकांनी केलेm ज्यांचे नात्यातील लोक हल्ल्याला बळी पडले होते. त्यांनी अशा तरुणांचा अनुभव भरभरून सांगताना अश्रूंना वाट करून देत होते. वीस वर्षाचा अठ्ठावीस जो बळी गेला, तो सय्यद आदिल हुसैन शाह याचा समावेश होता.
दहशतवाद्यांच्या हल्ल्यास विरोध करताना तो बळी गेला. सय्यद आदिल याच्या भावाने हल्ल्याच्या दिवशी झालेला घटनाक्रम सांगितला. घोडेसवारीचा व्यवसाय करणाऱ्या आदिल याने दहशतवाद्यांना विरोध करीत त्यांची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच रायफलने त्याला गोळ्या घातल्या. आदिक याची बहीण आस्मा सांगत होती की, आदिल लोकांना मदत करण्यात नेहमी पुढे असायचाm मला त्यादिवशी सकाळपासून भीतीने ग्रासले होते. त्याला सावध रहा, असे सांगितले होते. तो ऐकला नाही. त्याचे वडील म्हणतात, तो खूप परोपकारी आणि दयाळू होता. सायंकाळी उशिरापर्यंत तो परत आला नाही म्हणून म्हणून आदिलच्या मोबाईलवर फोन केला. पण त्याचा मोबाईल कोणी उचलला नाही. तेवढ्यात हल्ल्याची बातमी आली आणि आदिल याचे देखील काही बरे वाईट झाले नसेल ना…?
या कल्पनेने जीव कासावीस झाला. आदिल सय्यद यांच्या कुटुंबीयांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपयांची मदत पाठवली. सामान्य कुटुंब असणाऱ्या आदिक यांचे घर साधेच आहे. ते बांधून देण्याचे आश्वासन देखील एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. या मदतीचे मोल पैशात करता येत नाही. अशा प्रकारच्या सामान्य माणसांच्या धैर्याला प्रोत्सान दिले पाहिजे. चांगुलपणाच्या मदतीला साद घातली पाहिजे. यावेळी थेट सामान्य भारतीयावर हल्ला झाला. ते विविध प्रांतातील होते. त्यांच्याबरोबर गेलेले नातेवाईकांच्या समोर सारे घडले आणि त्या भयंकर घटनेनंतर उमटलेल्या प्रतिक्रिया काश्मीरमधील सामान्य माणसांच्या व्यक्त झालेल्या भावना त्यांच्यातील माणुसकीचा ओलावा संपूर्ण देशाने अनुभवला. संकटाच्या काळात मदत करणे याचे महत्व काय असते याची जाणीव झाली.
श्रीनगर येथे आणि आपल्या गावी परतल्यावर ही व्यक्त केली. श्रीनगरला परतल्यानंतर हवाई मार्गाने ही मंडळी येत होती. स्वतःच्या नातेवाईकांचा मृत्यू, त्यांचे शवविच्छेदन, भारतीय लष्कर आणि काश्मीर पोलीस दलाच्या चौकशी वगैरे सोपस्कार पूर्ण करून परतीचा प्रवास सुरू करेपर्यंत तपास यंत्रणांनी मदत केलीच. मात्र काश्मीर खोऱ्यातील सामान्य गाडीचालक, घोडेसवारी करणारा, हॉटेल चालक आदी साऱ्यांनी पैसे घेण्यास देखील नकार देत होते. अशा वार्ता येत होत्या. मृतांच्या नातेवाईकांना हे आवर्जून सांगताना त्यांना अश्रू आवरत नव्हते. सर्वसामान्य माणूस एकमेकांशी माणूस म्हणूनच वावरत असतो. हे पुन्हा एकदा प्रत्ययस आले.
महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या संस्कृती, चालीरीती, धार्मिक परंपरा यांची सरमिसळ होत असते. कोल्हापूर परिसरात अशी कांही गावे आहेत की, ज्या गावात एकही मुस्लिम कुटुंब नाही किंवा चार दोनच कुटुंबे आहेत.
(फोटो क्रेडिट: TDG The Daily Guardian/Magzter)


यावर आपले मत नोंदवा