भाजपने मनमोहन सिंग यांच्यासारख्या दैदिप्यमान कामगिरी करून देशाची शान वाढविणाऱ्या दिवंगत पंतप्रधानांवर चिखलफेक करणारा व्हिडिओ युद्धपट प्रसारित करून एक प्रकारे आपलीच नाचक्की करून घेतलेली आहे.
“भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग जेव्हा बोलतात तेव्हा सारे जग ऐकत असते,” असे उदगार अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी २००८ मध्ये काढले होते. तेव्हा सारे जग मंदीच्या लाटेतून जात होते. पण त्या मंदीची झळ भारताला फारशी बसलेली नव्हती. याचे कारण डॉ. मनमोहन सिंग यांची अर्थनीती कारणीभूत होती. त्या पार्श्वभूमीवर श्री ओबामा यांचे हे उद्गार आहेत. मनमोहन सिंग आज खिल्ली उडवणारा एक व्हिडिओ भारतीय जनता पक्षाने ट्विट केला आहे. त्या व्हिडिओमध्ये पहलगाम येथे गेल्या २२ एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यानंतर भारताने जे प्रत्युत्तर दिले आहे. त्याची त्याला पार्श्वभूमी आहे. डॉ. मनमोहन सिंग सलग दहा वर्ष भारताचे नेतृत्व करीत होते. तेव्हा दहशतवाद्यांनी भारतात येऊन हल्ले केले होते, ही वस्तुस्थिती आहे. २००८ मध्ये मुंबईवर मोठा हल्ला केला होता. त्याच्यामध्ये १६६ जण ठार झाले होते. त्या हल्ल्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या होत्या.
केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृह मंत्री आर. आर. पाटील यांचे राजीनामे घेण्यात आले होते.
काश्मीर खोऱ्यामध्ये १९८९ पासून अशांतता निर्माण झाली आहे. सीमेच्या पलीकडून भारतात येऊन हल्ले करण्याचे प्रकार तेव्हापासून चालू आहेत. भारताने ज्या त्या वेळीस त्याला जोरदार प्रत्युत्तर ही दिले आहे. मात्र पहेलगाम हल्ल्यानंतर दिलेल्या प्रत्युत्तराचे राजकीय भांडवल करण्याचा दुर्दैवी निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. हा हल्ला झाल्यानंतर देशातील सर्वच राजकीय पक्षांनी केंद्र सरकारच्या आणि भारतीय सेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर दोन वेळा सर्वपक्षीय बैठका नवी दिल्लीमध्ये झाल्या. या दोन्ही बैठकींना सर्वच पक्षांचे नेते उपस्थित होते. केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री गण देखील उपस्थित होते.
या बैठकीमध्ये पहेलगामच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जी परिस्थिती सीमेवर निर्माण झाली आहे. त्याबद्दल सर्वच राजकीय पक्षांना अवगत करण्यात आले. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने आणि सीमेवर घडत असलेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण अशा या बैठका झाल्या. मात्र या दोन्ही बैठकांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुपस्थितीत राहिले. हे खूपच खेदजनक होते. याबद्दल राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली. पहिल्या बैठकीत असे जेव्हा हे घडले तेव्हा देखील नाराजी व्यक्त केली होती. पण दुसऱ्या बैठकीमध्ये याची सुधारणा करण्यात आली नाही.
मनमोहन सिंग पंतप्रधानपदी असताना दहशतवाद्यांनी हल्ले केले त्याचा कडाडून प्रतिकार करण्यात आला होता. मुंबईच्या हल्ल्यात एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले. त्याच्यावर खटला चालवून त्याला फाशी देण्यात आली. देशाच्या सीमेपलीकडून होत असलेल्या घुसखोरी हा गेल्या चाळीस वर्षातील गंभीर प्रश्न देशासमोर आहे. आत्ता देखील जो हल्ला झाला. जम्मू काश्मीर राज्याला खास दर्जा देणारे ३७० वे कलम हटवल्यानंतर आणि तेथील संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे आल्यानंतर झालेला हा हल्ला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची जबाबदारी वाढली आहे. गेल्या आठवड्यात दहशतवादी हल्ल्यांचा प्रतिकार करण्यासाठी भारतीय सैन्य दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेले तसेच पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादी अड्ड्यांवर जोरदार हल्ले केले आणि ते उध्वस्त केले. ही सर्व कारवाई सुरू असताना ज्या पद्धतीने भारतीय प्रसारमाध्यमे तसेच पाकिस्तानातील प्रसारमाध्यमे देखील व्यक्त होत आहेत. त्याचे वार्तांकन करीत आहेत.ते खूपच धक्कादायक आहे. शिवाय सोशल मीडियावर लोक ज्या पद्धतीने अतिरंजीत बातम्या दिल्या जात आहेत आणि विविध प्रकारची छायाचित्रे तसेच व्हिडिओ दाखवित आहेत. ते फारच धक्कादायक आहे.जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये संघर्षाची परिस्थिती येते. काही वेळा युद्ध देखील झाली. त्यावेळी सारा देश एकवटून आणि त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिक सावधानता बाळगली जाते. अशावेळी देशातील प्रत्येक नागरिकांनी अत्यंत जबाबदारीने वागले पाहिजे, बोलले पाहिजे, लिहिले पाहिजे किंवा माहितीचा प्रसार केला पाहिजे. पण याचे भान सोशल मीडियाला नाही. त्याहून अधिक गंभीर बाब म्हणजे भारतातीलचोवीस तास बातम्यांचा रतीब घालणाऱ्या न्यूज चैनल नाही.
दोन दिवसापूर्वी भारत सरकारला एक फतवा काढावा लागला आणि प्रसार माध्यमाने जबाबदारीने वागावे. अतिरंगीत बातम्या देऊ नयेत. भारतीय सैन्य दलाच्या हालचाली संदर्भात गोपनीयता पाळी जावी, त्या संदर्भातील अतिरंजीत बातम्या देणे अनेक वेळा धोक्याचे ठरते. असा स्पष्ट इशाराही देण्यात आला. काही न्यूज चॅनेलनी भारताने पाकिस्तान विरुद्ध जोरदार युद्ध छेडले आहे. इस्लामाबादवर भारताने ताबा मिळवला आहे. लाहोर हे शहर उद्ध्वस्त केले आहे. अशा थेट बातम्या देण्यात आल्या. वास्तविक या बातम्यांना काही आधार नव्हता. कारण इस्लामाबाद ताब्यात घेऊन तिथे तिरंगा झेंडा फडकविला अशा अतिरंगीत बातम्या दिल्या त्या खऱ्या नव्हत्या. प्रसार माध्यमांनी अशा पद्धतीच्या बातम्या द्यायला सुरुवात केल्यानंतर खरे तर केंद्र सरकारने कडक पावले उचलणे आवश्यक होते. पण अंधभक्त झालेल्या राष्ट्रवादी यांना कोण सांगणार..?
प्रसारमाध्यमावर सरकारचे नियंत्रण जेव्हा आवश्यक असते. त्यावेळेला नियंत्रण ठेवले गेले नाही. मात्र केंद्रात सत्तेवर असलेला भाजप हा पक्ष आपल्या राजकीय हितासाठी अनेक वेळा प्रसार माध्यमावर दबाव आणीत असतो. हे आता गुपित राहिलेले नाही. यापेक्षा भयानक गोष्ट शनिवारी १० मे रोजी घडली. भाजपने आपल्या अधिकृत ट्विटरवर एक व्हिडिओ प्रसारित केला. ज्या व्हिडिओमध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान असताना झालेल्या हल्ल्याची छायाचित्रे आणि व्हिडिओ टाकण्यात आले. त्या हल्ल्यानंतर मनमोहन सिंग यांनी काहीच कृती केली नाही. पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देणे आवश्यक होते. पण ते गप्प राहिले, असा धडधडीत आरोप करण्यात आला आहे. मात्र २०१४ मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले आणि त्यानंतर आत्ता जो पहेलगाममध्ये हल्ला झाला. त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले असे दर्शवणारे व्हिडिओ एखाद्या युद्धपटास शोभेल अशा प्रकारचे व्हिडिओ प्रसारित करण्यात आले. ही एक प्रकारे आपल्या देशाची केलेली चेष्टा होती. सरकार कोणत्याही पक्षाचे आले तरी देशाचा प्रवास, देशाची नीती, देशाचे धोरण हे अविरतपणे चालू असते.
भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा स्थापन झालेल्या स्वतंत्र भारताच्या सैन्य दलाचे कार्य अविरतपणे चालू आहे. १९४८ मध्ये काश्मीर संस्थान विलीन करताना जो गुंता निर्माण झाला. त्यावेळी सैनिकी कारवाई करावी लागली. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवादी टोळ्यांचा पाडाव करून काश्मीरला भारतात विलीन करून घेण्यात आले. १९६५ मध्ये पाकिस्तानने युद्ध छेडले. तेव्हा भारतीय सैनिकांनी जोरदार कृती उत्तर देऊन त्यांचा पराभव केला. तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान, जय किसान असा नारा दिला होता. आपल्या किसान बांधवांनी आणि जवान बांधवांनी देशासाठी एकत्र येऊन कंबर कसली म्हणून पाकिस्तानचा पराभव झाला होता १९६२ मध्ये चीनने जेव्हा आक्रमण केले तेव्हा भारताला माघार घ्यावी लागली होती. नामुष्की पत्करावी लागली होती. त्यानंतर तीनच वर्षात भारतीय सैन्य दलाने भक्कम तयारी केली. तेव्हा देशाचे संरक्षण मंत्री म्हणून महाराष्ट्राचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण यांनी नेतृत्व केले होते. त्यांनी २१ नोव्हेंबर १९६२ रोजी संरक्षण मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पुढील दोन वर्ष भारतीय सैन्य दलाची पुनर्रचना केली. त्यासाठी खास योजना तयार करण्यात आली होती. त्याचाच परिणाम १९६५ च्या युद्धाच्या विजयामध्ये दिसून आला.
१९७१ मध्ये जेव्हा पूर्व पाकिस्तान मध्ये स्वतंत्र होण्यासाठी चळवळ मोठ्या प्रमाणात सुरू झाली. त्यावेळी पाकिस्तानच्या सरकार पूर्व पाकिस्तानातील नागरिकांच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर अत्याचार केले. या वेळी भारताने युद्धात उडी घेतली आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार उत्तर देऊन पाकिस्तानचे दोन तुकडे करण्यात आले आणि बांगलादेशाची निर्मिती झाली. हा सर्व इतिहास आपल्यासमोर असताना भाजप सत्तेवर असल्यानंतरच पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले, अशा पद्धतीचे चित्र या व्हिडिओ युद्धपटामध्ये रंगवण्यात आलेले आहे.
वास्तविक पहेलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानच्या संबंधाने जी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ज्या पद्धतीने भारताने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यातून अंतिम निर्णयापर्यंत अजून हा संघर्ष आलेला नसताना भाजपने अशा पद्धतीचा व्हिडिओ युद्धपट प्रसारित करणे खूपच धक्कादायक आहे.काँग्रेसचे खासदार आणि परराष्ट्र खात्याच्या स्थायी समितीचे अध्यक्ष शशी थरूर यांनी तातडीने या ट्विटला उत्तर देताना हा व्हिडिओ युद्धपट तातडीने काढून टाकावा. अशा प्रकारे राजकीय पक्षाने भारतीय सैन्य दलाच्या कामगिरीचा वापर करून राजकीय आरोप प्रत्यारोप करण्यासाठी उपयोग करावा हे खेद जनक आहे असे शशी थरूर यांनी म्हटलेले आहे.
प्रसारमाध्यमांनी ज्या उथळपणे भारताने पाकिस्तानला दिलेल्या प्रतिउत्तराचे वार्तांकन करायला सुरुवात केली आहे. ते खूपच बालिशपणाचे आहे. देशाच्या संरक्षणाच्या संदर्भात आक्षेपार्ह आहे. असे सर्वसामान्य जनता प्रतिक्रिया व्यक्त करीत असताना आणि त्याची खिल्ली देखील उडवली जात असताना देशातील सत्ताधारी पक्षानेच या वृत्तवाहिनी सारखाच पूर्वाश्रमीच्या सरकारवर हेतूता आरोप करीत आपण केलेली कारवाई ही किती देश हिताची आहे. असा अशा प्रकारे चित्र उभा करण्याचा केविलवाणी केलेला प्रकार निंदनीय तर आहेच पण देशाच्या धोरणांचा आणि भारताच्या सैन्य दलाचा देखील अपमान करणारे आहे.
प्रसारमाध्यमे ज्या पद्धतीने प्रचार करत आहेत त्याच पद्धतीने सत्ताधारी भाजपने देखील करावा हा जबाबदार राजकीय पक्षाचा व्यवहार ठरत नाही. राजकीय आरोप प्रत्यारोप किंवा राजकारण करण्याचे दिवस, प्रसंग, घटना आणि पार्श्वभूमी वेगळी असते. निवडणुकीच्या काळामध्ये सर्वच राजकीय पक्ष एकमेकांच्या वर आरोप प्रत्यारोप करतात. तो निवडणुकीच्या राजकारणाचा भाग असतो. देशाच्या संरक्षणाचा विषय जेव्हा समोर येतो तेव्हा साऱ्या देशाने एकत्र येऊन आपल्यातील राजकीय मतभेद, सामाजिक संघर्ष राजकीय संघर्ष, अंतर्गत समस्या या सर्व बाजूला ठेवून एक दिलाने उभे राहायचे असते. अशावेळी पूर्वाश्रमीच्या सरकारने काय चुका केल्या असतील किंवा काही चुकीचे निर्णय घेतले असतील. त्याचा उहापोह करण्याची ही वेळ नसते. याचे देखील भान भारतीय जनता पक्षाला राहिलेले नाही. इतके उथळपणे हा व्हिडिओ युद्धपट प्रसारित करण्यात आलेला आहे. हा युद्धपट नसून भाजपचा वेडपट पणा आहे.
सर्वपक्षीय बैठका जेव्हा झाल्या तेव्हा सर्वच राजकीय पक्षांनी केंद्र सरकारला आणि भारतीय सैन्य दलाला एक दिलाने पाठिंबा दिला.शिवाय या परिस्थितीमध्ये आम्ही सर्वजण एक आहोत, असा संदेश जो शत्रू राष्ट्राला द्यायचा असतो तो देखील देण्यात आला. पण एखादी निवडणूक चालू असावी आणि अशावेळी राजकीय पक्षांनी आरोप प्रत्यारोप करावेत, अशा स्वरूपाचा आहे. पाकिस्तान विरुद्ध सीमेवर होत असलेला संघर्ष किंवा पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्यांना भारतीय जवान देत असलेले प्रतिउत्तर हा राजकारणाचा भाग होऊ शकत नाही. याचे देखील भान भारतीय जनता पक्षाला राहिलेले नाही, असे स्पष्ट म्हणावे लागते. देशासमोर जेव्हा संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली असते.तेव्हा साऱ्या देशाने आणि देशातील नागरिकांनी एका सुरात बोलणे आवश्यक असते. अशावेळी देशांतर्गत राजकारण किंवा देशांतर्गत असलेल्या समस्यांचा उल्लेख करायचा नसतो. आपणास राजकारण करण्यासाठी खूप निवडणुका पाहायच्या असतात. अनेक राजकीय डावपेच करायचे असतात. त्यावेळी ते राजकारण करावे.
देशासमोरील संकटाच्या काळात प्रसारमाध्यमांनी जितके सावध असले पाहिजे, गंभीर असले पाहिजे आणि सरकारला मदत होईल. भारतीय सैन्य दलास मदत होईल, अशी भूमिका घेऊन युद्धप्रसंगी वार्तांकन करायचे असते. युद्धाच्या काळात वार्तांकन करण्याच्या किंवा पत्रकारिता करण्याच्या करण्याचे काही संकेत असतात. त्याची एक आचारसंहिता असते. देश समोर ठेवून गांभीर्याने पाळायची असते. मात्र हे प्रसार माध्यम करीत नसताना बेजबाबदार वागत असताना देशातील सत्तारूढ पक्षानेच मनमोहन सिंग यांच्यासारख्या दैदिप्यमान कामगिरी करून देशाची शान वाढविणाऱ्या दिवंगत नेत्यावर चिखलफेक करणारा व्हिडिओ युद्धपट प्रसारित करून एक प्रकारे आपलीच नाचक्की करून घेतलेली आहे. याचा सर्व नागरिकांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त करून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला अशा प्रसंगात किती गांभीर्याने वागायचे असते. याची जाणीव करून देण्याची गरज निर्माण झाली आहे.
(फोटो क्रेडिट: BJP (@BJP4India) / X)


यावर आपले मत नोंदवा