काश्मीर खोऱ्यात भारतीय रेल्वेला घेऊन जाणारा जम्मू तावी – उधमपूर- श्रीनगर ते बारामुल्ला हा रेल्वे मार्ग अखेर गेल्या ६ जून रोजी वाहतुकीसाठी खुला झाला. या रेल्वे मार्गावरील चिनाब नदी रेल्वे पूल हा केवळ अभियांत्रिकीचा चमत्कार नाही. तो भारताच्या कल्पकतेने आणि धैर्याने सर्वात कठीण आव्हानांवर मात करणाऱ्याच्या निर्धाराचे प्रतीक आहे.
असे वर्णन करण्यात आले आहे. ३३८ किलोमीटरलांबीच्या या रेल्वे मार्गाने अनेक पराक्रम भारतीय रेल्वेच्या इतिहासात नोंदवले आहेत. या मार्गावर ७५० छोटे-मोठे पूल आहेत. सुमारे शंभर किलोमीटरचा मार्ग बोगद्यातून जातो. या बोगद्यांपैकी पीर पंजनाल रेल्वे बोगदा (किंवा बनिहाळ रेल्वे बोगदा) असे म्हटले जाते. हा बोगदा सव्वा अकरा किलोमीटरचा आहे आणि तो भारतातील सर्वात लांब बोगदा म्हणून आता नोंदवला गेला आहे. चिनाब नदीवरील पूल ३५९ मीटर उंचीचा आहे. तो जगातील सर्वात उंच पूल म्हणून नोंदवला गेलेला आहे. या फुलासाठी १४८६ कोटी रुपये खर्च आलेला आहे. असे अनेक विक्रम करीत तयार झालेला हा रेल्वे मार्ग काश्मीर खोऱ्याला उर्वरित भारताशी जोडला गेला. या रेल्वे मार्गाच्या वाटचालीचा इतिहास ही खूप मनोरंजक आहे कारण या रेल्वे मार्गाची पार्श्वभूमी सांगणारी सुरुवात १९७२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पंजाब मधील कथुवा ते जम्मू तावी या मार्गाच्या भूमिपूजनाने केली. पुढे जम्मू ते उधमपूर हा मार्ग १९८३ मध्ये इंदिरा गांधी यांच्याच हस्ते सुरू झाला आणि १९९५ च्या मार्चमध्ये जम्मू- उधमपूर- बारामुल्ला या रेल्वे मार्गाला तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या पुढाकाराने मंजुरी देण्यात आली. तेव्हापासून या रेल्वे मार्गाचे काम सुरू झाले आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेत असताना मार्च २००२ मध्ये या रेल्वे मार्गास राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला. जम्मू ते उधमपूर या ५३ किलोमीटर मार्गाचे काम पूर्ण झाले. त्याचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते १३ एप्रिल २००५ रोजी झाले. हा मार्ग समुद्रसपाटीपासून सरासरी साडेपाच हजार मीटर उंचीवर आहे. हा भारतातील सर्वात उंचावर असलेला रेल्वे मार्ग आहे आणि जगातला दोन नंबरचा आहे. चीनच्या तिबेटमध्ये असलेला मार्ग अधिक उंचीवर आहे. हिमालयातील दऱ्याखोऱ्यातून जाणाऱ्या या रेल्वे मार्गाचे काम निश्चित करण्यात आल्यानंतर त्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले. पण काम एकाच बाजूने सुरू झाले नाही. ठिक ठिकाणावरून करण्यात आले. जम्मू – उधमपूर मार्गाचे उद्घाटन झाल्यानंतर मुजहोम ते अनंतनाग या ६६ किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले दि. ११ ऑक्टोबर २००८ रोजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याच हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. १४ फेब्रुवारी २००९ रोजी मुजहोम ते बारामुल्ला या एकतीस किलोमीटरचे काम पूर्ण करून त्याचे उद्घाटन करण्यात आले. २९ ऑक्टोबर २००९ रोजी अनंत नाग ते कांजीगुद अठरा किलोमीटर मार्गाचे उद्घाटन झाले. कांजिगुद ते बनिहाल या मार्गाचे या अकरा किलोमीटर मार्गाचे उद्घाटन डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते झाले. तोवर १३५ किलोमीटर रेल्वे मार्गाचे पूर्ण काम झाले होते.

पुढे दिनांक ४ जुलै २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उधमपुर ते कटरा या पंचवीस किलोमीटर मार्गाचे उद्घाटन करण्यात आले आणि गेल्या सहा जून रोजी चिनाब नदीवरील सर्वात उंच पुलाचे काम पूर्ण झाल्याने उद्घाटन करण्यात आले. जम्मू तावी ते बारामुल्ला हा रेल्वे मार्ग पूर्णपणे कार्यान्वित झाला आहे. कोकण रेल्वेपेक्षा अधिक गुंतागुंतीचा आणि अभियांत्रिकी आव्हानांचा हा मार्ग ठरला आहे. या मार्गाच्या पूर्ततेसाठी कोकण रेल्वे महामंडळाने देखील आपले योगदान दिले आहे.
दक्षिण कोरियातील ऑफकॉन्स या कंपनीने चिनाब नदीवरील रेल्वे पूल बांधण्याचे काम हाती घेतले. या कामासाठी बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेने खूप मोठे योगदान दिले आहे. पुलाचे डिझाईन करण्याचे काम या संस्थेकडे होते. गेली सतरा वर्षे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स तर्फे प्रा. डॉ. जी. माधवी दत्ता यांच्या नेतृत्वाखाली टीम काम करीत होती. चिनाब नदी ही आंतरराष्ट्रीय नदी आहे. तिचा उगम हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पिती जिल्ह्यातून होते. त्यापैकी लाहौल विभागात चंद्रा नदीचा उगम होतो आणि स्पिती भागातून भद्रा नदीचा उगम होतो. त्यामुळे पंढरपूरमधून वाहणाऱ्या चंद्रभागा नदीची आठवण येते. या दोन नद्यांचा संगम या जिल्ह्यात झाला आहे. तेथून चिनाब नदीचा प्रवास सुरू होतो. ती वाहत वाहत लडाख आणि काश्मीर खोऱ्यातून पुढे येते. पठारावर आल्यानंतर पाकिस्तानातील पंजाब प्रांतातून वाहत जाऊन अनेक नद्यांना सोबत घेऊन सिंधू नदीला जाऊन मिळते. या सर्व नद्या सिंधू नदीच्या खोऱ्याचा भाग आहेत. चिनाब नदीला बियास, रीवा, झेलम, सतलज, अशा पाच प्रमुख नद्या मिळतात. जेव्हा सतलज नदीला चिनाब नदी मिळते तेथून पुढे ती पंचनद म्हणून ओळखले जाते. अखेरीस ती सिंधू नदीला मिळते.
काश्मीर खोऱ्याचे गेटवे ऑफ काश्मीर म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो त्या कांजीगुद येथे उधमपूर ते श्रीनगर मार्गात मार्गावर चिनाब नदी लागते. ही नदी पार करण्यासाठी मोठा पूल बांधावा लागला. खोल दरी असलेल्या या नदीच्या दोन्ही बाजूची दोन्ही बाजूचे कडे हे अनाकलनीय होते. तेथील भूगर्भाची चाचणी करण्यात आली होती. पण प्रत्यक्ष काम सुरू केल्यानंतर अनेक प्रकारच्या दगडांचा आणि त्यांचा स्तरांचा शोध लागला. परिणामी त्या पुलाच्या डिझाईनमध्ये असंख्य वेळा बदल करावा लागला. अत्यंत गुंतागुंतीचा आणि डिझाईन करायला अवघड असलेल्या या पुलाची रचना करताना भू – वैज्ञानिक अभियांत्रिकी ज्ञानाचा कस लागला होता. हे काम बंगलुरुच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या प्रा. डॉ. जी. माधवी लता यांच्या नेतृत्वाखालील टीम करीत होती. या संदर्भात त्यांनी आपला अनुभव एका शोधनिबंधामध्ये मांडलेला आहे. त्या म्हणतात की, चिनार नदीवरील दोन्ही तट हे स्थलकृती या विघटीत झालेल्या दगडातून बनलेल्या आहेत. ज्याचा शोध सर्वेक्षण करताना लागलेला नव्हता. अनेक दगडांच्या मध्ये आणि दगडांच्या स्तरांमध्ये देखील छिद्रे होती. त्यामुळे अखेरीस काम करीत असताना “डिझाईन ऍज यू गो” अशी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली. याच नावाने डॉ. माधवी लता यांनी ” द के स्टडी ऑफ चिनाब रेल्वे ब्रिज जिऑलॉजिकल कंडिशन्स ऑफ द साईट- डिझाईन ऍज यू गो ” या नावाने एक शोधनबंध आंतरराष्ट्रीय पत्रिकेत. लिहिला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सर्व अनुभव कथन केलेला आहे.
प्रा. डॉ. माधवी लता

पॅरिसमधील आयफेल टॉवर पेक्षा पस्तीस मीटरने उंच असलेल्या या चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन झाल्यानंतर प्रा. डॉ. माधवी लता या प्रकाशझोतात आल्या. त्यांच्या विषयी भरभरून लिहिले गेले. माधवी लता या मूळच्या आंध्र प्रदेशातील आहेत. त्यांनी जवाहरलाल नेहरू टेक्निकल युनिव्हर्सिटी मधून १९९२ मध्ये बी. टेक. केले आहे. त्यांनी तेलंगणा मधील वारंगल येथील नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ टेक्नॉलॉजी मधून एम. टेक. केले आहे. मद्रास आयआयटी मधून २००० मध्ये त्यांनी भू-वैज्ञानिक अभियांत्रिकी विषयावर पीएचडी केली आहे. भूवैज्ञानिक अभियांत्रिकी मधील तज्ञ म्हणून त्यांच्याकडे आता पाहिले जाते. जेव्हा या पुलाच्या उद्घाटनानंतर त्यांच्या कामाकडे लक्ष गेले. तेव्हा त्यांनी सांगितले की, हे काम मी एकट्याने केलेले नाही. हे काम म्हणजे आमच्या सर्व सहकाऱ्यांचे एकत्रित काम आहे. केवळ मी एकटीनेकाम केले अशा प्रकारची प्रसिद्धी कृपया देऊ नका.
चिनाब नदीवरील पूल बांधताना त्याच्या दोन्ही बाजूला रस्ते करावे लागले. त्यापैकी दक्षिण बाजूला बारा किलोमीटरचा रस्ता करण्यात आला तर उत्तर बाजूला अकरा किलोमीटरचा रस्ता करण्यात आला आहे. हा रस्ता पार करून गेल्यानंतरच चिनाब नदीचे पात्र लागते. या पुलाची लांबी साडेसातशे मीटर आहे आणि उंची ३५९ मीटर मोजली जाते.
याच मार्गावरील पंजनाल रेल्वे बोगदा हा देखील एक चमत्कार म्हणायला पाहिजे. या बोगद्याची लांबी सव्वा अकरा किलोमीटर आहे. कोकण रेल्वे वरील रत्नागिरी जवळच्या साडेनऊ किलोमीटरच्या लांबीच्या बोगद्यावर या बोगद्याने मात केली आहे. मुंबईच्या गॅमन कंपनीने हे काम केले आहे. ही कंपनी १९२२ मध्ये एका जॉन जी. गॅमन नावाच्या इंजिनिअरने मुंबई स्थापन केली. आजही या कंपनीचे कार्यालय मुंबईत आहे. अंजी नदी वरती ७२५ मीटर लांबीच्या केबल पुलाने देखील चमत्कार घडविला आहे. बांद्रा- वरळी सिलिंक ज्या पद्धतीचा केबल ब्रिज आहे. तशा स्वरूपाचा हा ब्रिज हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधला आहे. अंजी नदी ही चिनाब नदीची उपनदी आहे. या पुलाची उंची ३३१ मीटर आ.हे या पुलावरून रेल्वे गाडी धावत असताना एक वेगळाच चमत्कार पाहायला मिळतो.
भारतीय रेल्वेच्या इतिहासामध्ये काश्मीर खोऱ्यात बांधण्यात आलेल्या जम्मू – तावी उदमपूर – श्रीनगर – बारामुल्ला या रेल्वे मार्गाने नवा इतिहास नोंदवला गेला आहे. सुमारे 28 हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या रेल्वे मार्गाने काश्मीर खोरे आता भारताशी जोडले गेलेले आहे. या रेल्वे मार्गावर दररोज बारामुल्ला ते जम्मू तावी अशी रेल्वे गाडी धावते आहे. या मार्गावर वंदे भारत ट्रेन देखील सुरू करण्यात आलेली आहे.

काश्मीर जोडले…!
हा रेल्वे मार्ग जम्मू-काश्मीरमधील पर्यटनाचा चेहरा मोहरा बदलून टाकेल. शिवाय उर्वरित भारताला काश्मीर खोऱ्यात जाण्यासाठी उत्तम मार्ग तयार करून दिला आहे. या मार्गावरील चिनाब रेल्वे पूल हा एक अभियांत्रिकी कल्पकतेचा अद्भुत नमुना आहे तसेच अंजी नदीवरील केबल पूल हा आणखीन एक वेगळा अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा चमत्कार आहे. शिवाय शंभर किलोमीटर अंतर बोउद्यातून प्रवास करण्याचा आनंद मिळणार आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगामधून कोकण रेल्वेने जाताना हा अनुभव येत होता. “सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेला” अशी राष्ट्रीय राजकारणामध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या निमित्ताने नोंद झाली आहे. सह्याद्रीने अशा प्रकारचा रेल्वे मार्ग आपल्याला १९९० मध्येच दिला. आता पस्तीस वर्षांनी हिमालयामध्ये आपल्याला रेल्वे मार्ग उपलब्ध झाला आहे. स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पहिल्या, दुसऱ्या आणि आता तिसऱ्या पिढीचे भाग्य आहे की, त्यांना काश्मीरचे सौंदर्य आणि त्याचा आनंद रेल्वे मार्गाने जाऊन घेता येणार आहे. अन्यथा हिमालयामध्ये होणाऱ्या हिमवृष्टीमुळे जम्मू ते श्रीनगरचा महामार्ग दरवर्षी अनेक वेळा बंद पडत होता. दिल्ली ते श्रीनगर किंवा मुंबई ते श्रीनगर आपल्याला विमानानेच प्रवास करावा लागत होता. आता रेल्वेचा पर्याय उपलब्ध झाला आहे हा एक मोठा क्षण भारतीय रेल्वेच्या इतिहासामध्ये नोंदवला जाणार आहे गेला आहे.


यावर आपले मत नोंदवा