देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देणारे नेतृत्व भाजपमध्ये पण नाही आणि विरोधी पक्षांमधूनही उभे राहील, अशी शक्यता नाही. काँग्रेसमध्ये काही दोन-चार नावे होती ते सर्व नेते भाजपमध्ये दाखल झालेले आहेत. त्यामुळे देवेंद् फडणवीस यांना काळजी करण्यासारखे काहीच नाही. तरी पण उन्मादवादी राजकारणाच्या आहारी का जावे वाटते, याचे उत्तर एकच वाजाबाकीचे राजकारण केल्याने महाराष्ट्र पुढील प्रश्न सोडविण्यात यश येत नाहीत.

जनतेच्या भल्याचे कायदे करणारे कायदेमंडळाचे मंदिर गुरुवारी डागाळले. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते विधान भवनाच्या आवारातच एकमेकांना भिडले. कार्यकर्ते गावगुंडा प्रमाणे एकमेकांच्या अंगावर धावून गेले. कॉलर धरत ‘म” “भ” च्या भाषेत शिवीगाळ करीत एकमेकांना गुद्दे मारले. कपडे फाडले. कायदे करणाऱ्यांच्या साक्षीने असे कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले. यापूर्वी विधानभवनात कधीही न घडलेल्या या घटनेने लोकशाहीची मान शरमेने खाली गेल्याची संतप्त भावना व्यक्त होत आहे.

“लोकमत” मध्ये प्रसिद्ध झालेल्या विधानभवनातील मारामारीच्या बातमीची ही सुरुवात आहे. अशा प्रकारे बातमीदाराने बातमीचा सार मांडला आहे. महाराष्ट्र विधीमंडळला ८८ वर्षे पूर्ण झाली. या इतिहासामध्ये अशा प्रकारची विधानभवनामध्ये मारामारी होणे आणि एकमेकांची बे अब्रू करणे, कपडे फाडणे असा प्रकार कधी झाला नव्हता.

आधुनिक महाराष्ट्राच्या राजकारणाची सुरुवात यशवंतराव चव्हाण यांच्यापासून झाली असे सातत्याने म्हटले जाते. त्यांनी आधुनिक महाराष्ट्र घडवण्यासाठी बेरजेचे राजकारण केले, असे सांगितले जाते आणि अनेक नेत्यांना त्यांनी विरोधी बाकावरून उठून सत्तारूढ बाकावर आणून बसवले. आपल्याला आधुनिक महाराष्ट्र घडवायचा आहे. तुमच्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि तुमच्या पाठीमागे असलेल्या जनतेच्या पाठिब्याने हा महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्न करूया अशी त्यांची त्या मागची भूमिका होती. त्याला बेरजेचे राजकारण म्हटले जाते.

यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात तावून सुलाखून निघताना कधीही विरोधी पक्षांचा अवमान होईल किंवा उपमर्द होईल. अशा प्रकारची भाषा त्यांनी वापरली नाही किंबहुना संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांकडून यशवंतरावांची टिंगल टवाळी करण्यात येत होती. त्यांचा उपमर्द करण्यात येत होता. तरीसुद्धा त्यांनी संसदीय भाषेची लक्ष्मणरेषा ओलांडली नाही. महाराष्ट्राच्या आधुनिक कालखंडाच्या राजकारणाचा प्रारंभ तिथून होतो. वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील. शरद पवार, अ. र. अंतुले असे अनेक कर्तबगार मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि प्रशासनाचा गवगवा संपूर्ण देशभर होता. त्यामुळेच महाराष्ट्र प्रगतीपथावर गेला अनेक राज्यातील बेरोजगारांचे लोंढे महाराष्ट्राकडे आले करण महाराष्ट्र हा प्रगती करीत होता. सुरुवातीला दक्षिणेकडून आणि आत्ता उत्तरेकडून सातत्याने लोक रोजीरोटीसाठी महाराष्ट्रात येत असतात. हे सर्वात महत्त्वाचे लक्षण महाराष्ट्राच्या प्रगतीची आहे.

देवेंद्र फडणवीस. छाया: लाइव हिन्दुस्तान

अशी उत्तम पार्श्वभूमी लाभलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर दुसऱ्यांदा विराजमान होताना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वेगळ्या अपेक्षा होत्या. महाराष्ट्राचे नेतृत्व त्यांनी चतुराईने करून राजकारणातील एक वेगळी उंची गाठतील, अशी अपेक्षा होती. उत्तम वक्तृत्व आणि अभ्यास तसेच कष्ट करण्याची तयारी असल्याने देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये मौलिक भर घालतील अशी देखील अपेक्षा होती. पण ती अपेक्षा आता फोल ठरत चालली आहे. कारण महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र धर्म म्हणून जी सभ्यता पाळून शिव शाहू फुले आंबेडकर विचाराने महाराष्ट्र पुढे जाईल असे म्हटले जात असताना त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न धार्मिक उन्माद निर्माण करणाऱ्या राजकारणामुळे होतो आहे. विधानभवनाच्या परिसरात जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांची झालेली मारामारी हा त्याचाच परिपाक आहे. काही वर्षांपूर्वी मुंबईचे माजी खासदार किरीट सोमय्या विविध प्रकरणांना हात घालून आपण भ्रष्टाचार विरोधी मोहीम राबवतो आहोत, असा भास निर्माण केला होता. आता तेच किरीट सोमय्या कोणत्या बिळात लपून बसले आहेत, हे समजत नाही. ठराविक लोकांना पकडून त्यांची काही प्रकरणे उकरून काढून राजकीय दृष्ट्या त्यांना नामोहरण करण्याची मोहीम होती. ज्या ज्या नेत्यांच्यावर त्यांनी आरोप केले त्यातील अनेक नेत्यांच्या खटल्यांच्या फाईल क्लोजर रिपोर्टने बंद करण्यात येत आहेत. ही त्यांची भ्रष्टाचाराविरोध लढण्याची मोहीम..! 

मध्यंतरीच्या काळात नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे यांना उन्माद निर्माण करणारी भाषा बोलण्याची मोहीम चालवण्यास सांगण्यात आले होते. ती अधिकच अतिरेकी भूमिका घेऊन बोलू लागल्यानंतर त्यांना थोडं शांत घ्या, असं सांगण्यात आले. तसाच प्रकार सांगली जिल्ह्यातील जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बाबतीत घडत आहे. जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख यांच्या अंगावर पडळकर यांचे समर्थक ऋषिकेश उर्फ सर्जेराव बबन टकले हे धावून जातात. त्या टकले यांना चुना तंबाखू मळून सुरक्षा रक्षकच देतात, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सभागृहात केला आहे. हा आरोपत्यारोपाचा भाग सोडून दिला तरी ज्या पद्धतीने विधान भवनामध्ये मारामारी होणे, शिवीगाळ करणे, एकमेकांवर धावून जाणे हा प्रकार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच घडला याची नोंद कायमची राहणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बेरजेचे राजकारण सकारात्मक घडवून आणण्यासाठी करण्याची परंपरा होती. आता नेमके त्याच्या उलट समाजामध्ये धार्मिक द्वेष निर्माण करून वोट बॅंकेचे राजकारण करण्यावर भर देण्यात येत आहे.

 महाराष्ट्र धर्माची परंपरा पाहता याला राजकारणातील वजाबाकीच म्हटले पाहिजे. यशवंतराव चव्हाण यांच्या बेरजेच्या राजकारणापासून महाराष्ट्राच्या वाटचालीची सुरुवात झाली आणि आपण आता वजाबाकीच्या राजकारणाच्या कडेवर येऊन उभे राहिलेलो आहोत. वास्तविक अशा परिस्थितीतून अशा मार्गाने महाराष्ट्राला मार्गक्रमण करायला लावणे किंबहुना तशी परिस्थिती निर्माण करणे हा महाराष्ट्राचा अवमान आहे. आपण सतत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतो. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जय जयकार करतो, महात्मा फुले यांचे नमन करतो, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारायचे स्वतःला अनुयायी समजतो. पण कृती मात्र त्याच्या नेमकी उलटी होत आहे. पुढारलेल्या महाराष्ट्राला किंबहुना ज्या महाराष्ट्राचा उल्लेख पुरोगामी महाराष्ट्र म्हणून केला जातो त्याला कुठेतरी छेद देण्याचे राजकारण सुरू आहे. हे देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात येत नसावे का? ते देखील या राजकारणाचे बळी ठरत नसतील का? अशा प्रसंगी सतर्क राहून त्या उन्मादी राजकारणाच्या चक्रव्युहातून महाराष्ट्राला बाहेर काढण्याचे धैर्य दाखवणे आवश्यक आहे..ही खूप मोठी संधी देवेंद्र फडणवीस यांना मिळाली होती.

संयुक्त महाराष्ट्र स्थापन करण्याची मागणी होत होती. तेव्हा अनेक अडथळ्यांच्या शर्यती यशवंतराव चव्हाण यांना पार कराव्या लागल्या होत्या. एका बाजूला देशाचा विचार होता.त्यासाठी झटणारे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची साथ सोडायची नव्हती आणि मराठी माणसांचा महाराष्ट्र उभा राहावा, निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या विषयी आत्मीयता पण त्यांना होती. अशा कठीण परिस्थितीमध्ये समतोल साधक एका बाजूला केंद्रीय नेतृत्वाला विश्वासात घेऊन मराठी माणसाची भूमिका पटवून देण्याचे काम ते करीत होते. प्रतापगडावर ३० नोव्हेंबर १९५७ रोजी उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा स्मारकाचे टाकलेले पाऊल हे त्याच प्रयत्नाचा एक भाग होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण ज्या पद्धतीने केले पाहिजे आणि महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे याची केलेली ती पेरणी होती. त्याचे उद्घाटन देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येत होते. तेव्हा संयुक्त महाराष्ट्रासाठी मराठी माणूस रस्त्यावर उभा राहून आपल्या मागण्यांची तड लावण्याचा प्रयत्न करीत होता आणि त्याचा नेमका संदेश केंद्रीय नेतृत्वाला गेला. या प्रसंगाचे वर्णन यशवंतराव चव्हाण यांनी एका मुलाखतीमध्ये “आमची ही जीत झाली आणि विरोधकांची पण जीत झाली” असे केले आहे

 संतांची परंपरा

महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणारे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने त्यांच्यावर टीका टिपणी करीत होते त्यातून त्यांनी कडवट भूमिका घेणे सोडून दिले. उलट त्यांना पोषक होईल, अशा पद्धतीची भूमिका मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्या सर्व नेत्यांच्या विषयी त्यांनी या मुलाखतीत केलेले वर्णन म्हणजे महाराष्ट्राच्या संतांची परंपरा सांभाळण्यासारखे आहे. संत ज्ञानेश्वर यांच्यावर आंघोळ करून येताना थुंकणाऱ्यांचा त्यांनी कधीही दुस्वास केला नाही. ते पुन्हा पुन्हा जाऊन आंघोळ करून येत होते. तशाच पद्धतीने यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्रातील लढणाऱ्या नेत्यांचा दुस्वास केला नाही. त्यामुळे तर आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचण्यामध्ये त्यांना यश आले.

हा सर्व इतिहास समोर असताना महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याची सत्ता आपल्या हातात आल्यानंतर सर्वांना सोबत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. उन्मादाचे राजकारण सुरू केल्यानेच विधिमंडळासारख्या लोकशाहीच्या मंदिरात शिव्या शाप देण्याचे उदगार निघतात. याची जाणीव होणे फार महत्त्वाचे आहे. दोन आमदारांचे समर्थक ज्या पद्धतीने मारामारी करतात ही एक त्या सर्व प्रक्रियेचीच भाग आहे. हे अचानक घडलेले नाही. हे सातत्याने ज्या पद्धतीचे राजकारण ज्या स्तराला गेले आहे. त्याचा हा परिपाक आहे.

अलीकडेच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे ज्या पद्धतीने हल्ला झाला किंवा काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्यावर पुण्यात हल्ला झाला होता. ती सर्व प्रकरणे कशा पद्धतीने हाताळली गेली? यावरूनच कळते की, सरकार अपराध करणाऱ्यांच्या बाजूने उभे आहे. ज्या पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्था हातात घेण्यात आला. त्यांच्यावर जर बसवण्याऐवजी त्यांना बळ देण्याची भूमिका सरकारने घेतली आहे, हे स्पष्ट दिसते आहे. त्यामुळेच निखिल वागळे किंवा विश्वंभर चौधरी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्याचा तपास खटला देखील दाखल होऊ शकत नाही. अपराद्यांना शिक्षा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचे देखील असेच होणार आहे.

 उन्मादवादी

एका बाजूला तुम्ही जन सुरक्षा सारखा कायदा आणून अतिरेकी विचार मांडणारे किंवा अत्यंत कट्टर विचार मांडणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे सांगत आहात. त्याच वेळी निलेश राणे किंवा गोपीचंद पडळकर यांच्यासारखे पदाधिकारी कडवट, कट्टर भाषा वापरून सार्वजनिक सभ्यतेला छेद देत आहेत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही किंबहुना अशा प्रकारची कडवट भूमिका मांडणाऱ्यांचा सन्मानच केला जातो. असाच संदेश महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस देऊ पाहत आहेत. देवेंद्रजी यातून महाराष्ट्राचे जे नुकसान व्हायचं ते होऊन जाईल. ते आता झालेलेच आहे. पण तुमचे राजकारणातील नुकसान खूप मोठे होणार आहे. आज महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पाहिले तर फडणवीस यांच्याच वयातील पिढी करती आहे.शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, हरिभाऊ बागडे, सुभाष देसाई अशा सर्व नेत्यांचे राजकारण आता उतरतीस लागलेले आहे. देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देणारे नेतृत्व भारतीय जनता पक्षात पण नाही आणि विरोधी पक्षांमधूनही उभे राहील, अशी शक्यता नाही. काँग्रेसमध्ये काही दोन-चार नावे होती ते सर्व नेते भाजपामध्ये दाखल झालेले आहेत. त्यामुळे देवेंद्. फडणवीस यांना काळजी करण्यासारखे काहीच नाही. महाराष्ट्र बरोबरच स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी किंवा भल्यासाठी बेरजेचे राजकारण करण्याऐवजी वजाबाकीचे राजकारण का करावे? असे वाटत असेल हे एक कोडेच पडलेले आहे. यासाठी कदाचित केंद्रीय नेतृत्वाकडून दबाव निर्माण केला जात असेल. तो दबाव जुगारून देण्याची हिम्मत देखील काही वेळा दाखवावी लागते. यासाठी नेतृत्वामध्ये दम असावा लागतो.

तो दम सत्तेच्या जोरावर विरोधकांना दाखवण्याऐवजी सार्वजनिक सभ्यतेची बाजू कशी सांभाळली जाईल यासाठी दाखवणे अधिक उचित ठरेल. त्यामुळे “लोकमत” च्या बातमीने ज्या पद्धतीने गुरुवारच्या घटनेचे वर्णन सुरुवातीलाच केले आहे. त्यातून लोकशाहीची मान शरमेने खाली गेली आहे. ती मान ताठ राहायची असेल तर आपल्याही पाठीचा कणा ताठ असावा लागतो. हे विसरून चालणार नाही. संख्याबळाच्या जोरावर सध्या तरी देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीला धक्का लागण्याची शक्यता अजिबात नाही. पण केवळ खुर्ची सांभाळण्यामध्ये वेळ घालवत बसण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भल्यासाठी, लोकशाही मूल्यांसाठी सामाजिक सभ्यतेसाठी भूमिका घेण्याची गरज असते. ती घेतली तर इतिहासात तुमची नोंद बेरीज केल्याची होईल. अन्यथा “महाराष्ट्राच्या वाटचालीच्या परंपरेची वजाबाकी करणारा नेता” अशीच नोंद झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक प्रश्न सत्ताधारी पक्षच निर्माण करीत असेल तर त्याच्या आधारे विरोधकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करता येणार नाही. सत्ताधारी पक्षालाच या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. पुढे जाण्यासाठी मार्ग निर्माण करावा लागतो सुडाचे राजकारण करण्यासाठी आपल्यालाही काही चुकाच कराव्या लागतात. त्यामुळे पक्ष फोडून सत्ता मिळवली असली तरी त्याला बेरजेचे राजकारण म्हणत नाहीत. उलट भाजपचे राजकारण वजाबाकीच्या बाजूने जात आहे असेच म्हणावे लागेल. त्याच उन्मादाची विधानभवनातील मारामारीच्या रूपाने सुरुवात झाली आहे. असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

 नैतिक अधिकार..?

याच उन्मादवादी भूमिकेतून विरोधी पक्षाला मान्यता न देण्याचा आडमुठेपणा सरकार करीत आहे. सोयीसाठी हा अधिकार किंवा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचा आहे. हा साळसूदपणा लोकांच्या लक्षात येत नाही, असे जर वाटत असेल तर ती तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेत आहात. म्हणूनच दोन आठवड्यापूर्वी महाराष्ट्र विरोधी पक्ष नेत्याविना पोरका झाला आहे असे म्हटले होते. आता महाराष्ट्र कायदा सुव्यवस्थेविना बेवारस झाला आहे का..? असा प्रश्न कोणी केला तर ते चुकीचे ठरणार नाही. निखिल वागळे आणि विश्वंभर चौधरी यांच्यावर भर दिवसा केलेल्या हल्ल्याचा तपास पूर्ण होऊन अद्याप खटला दाखल होत नाही. तेव्हा न्यायच नाकारला जातो. हे तुम्ही तुमच्या राज्यकारभारातून दाखवणार असाल तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार तरी तुम्हाला कसा प्राप्त होतो…?

“देवेंद्रजी यांचे वजाबाकीचे राजकारण..!” ला एक प्रतिसाद

  1. “जागर” मधील तुमचा हा लेख वाचल्यावर खालील विचार माझ्या मनात आले.
    ~~~

    ’लोकमत’मधील ’जागर’ पुरवणीत सजग आणि विचारी संपादक वसंत भोसले यांचा ’देवेंद्रजी यांचे वजाबाकीचे राजकारण’ हा लेख वाचला. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे वातावरण निर्माण झाले आहे ते अत्यंत चिंताजनक आहे. एकेकाळी ‘बेरजेचे राजकारण’ ही महाराष्ट्राची राजकीय ओळख होती—जेथे वैचारिक भिन्नता असूनही परस्पर सन्मान राखणारी भूमिका नेत्यांकडून घेतली जात असे. परंतु अलीकडील घटनाक्रम, विशेषतः नितेश राणे, गोपीचंद पडळकर यांच्यासारख्या नेत्यांनी वापरलेली उद्दाम, विभाजनवादी आणि उन्मादजनक भाषा, ही केवळ लोकशाही मूल्यांना धोका नाही तर सभ्य सार्वजनिक संवादालाही बाधा पोहोचवणारी ठरत आहे.

    सत्ताधारी पक्षाच्या वरदहस्ताने हे सगळे घडत असल्याचे चित्र अधिकच स्पष्ट होते, जेव्हा अशा आक्रमक आणि कडवट वक्तव्यांवर कुठलीही कारवाई न करता त्यांचं छुपं समर्थनच केलं जातं. विधानभवनासारख्या सर्वोच्च संस्थेत हातघाईची भाषा, रस्त्यावरील गुंडांसारखी मारामारी आणि धमक्या देत विधानभवन परिसराचा आखाडा केला जातो तेव्हा ती लोकशाहीची शोकांतिका ठरते. जयंत पाटील यांनी मांडलेला आरोप की विरोधकांच्या अंगावर धावून जाणाऱ्यांना सुरक्षारक्षकच ‘चुना-तंबाखू’ देतात, हा केवळ एका घटनेचा संदर्भ नसून राज्याच्या राजकारणात भडकवणाऱ्या भूमिकांना मिळणाऱ्या मूक संमतीचं प्रतीक आहे.

    दुसरीकडे, ‘जनसुरक्षा कायदा’ आणून कट्टर विचारवंतांवर कारवाई केली जाईल असे सांगणारेच जर आपल्या गोटातील उन्मादी नेत्यांना मुक्तसंचाराची मुभा देत असतील, तर हा दुहेरी निकष आणि ढोंगीपणाच ठरतो. हे सगळं एक रणनीती म्हणून केलं जातं आहे—समाजात धार्मिक ध्रुवीकरण निर्माण करून मतांचं राजकारण साधण्यासाठी देवेंद्र फडणवीस कुठल्याही थराला जात आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संयम, समन्वय आणि समृद्ध राजकीय संवादाची जी एकेकाळी प्रतिमा होती, ती मोडून टाकली आहे. त्यांनीच जर मर्यादा ओलांडणाऱ्या नेत्यांवर वचक ठेवला नाही, तर त्यांचे शासन एकांगी, पक्षनिष्ठ आणि लोकशाहीविरोधी असल्याची प्रतिमा बळकट होईल. हे वजाबाकीचे राजकारण देवेंद्र फडणवीस यांना भविष्यात नक्कीच महागात पडणार.

    महाराष्ट्राच्या सभ्य राजकीय परंपरेचा योग्य तो मान राखायचा असेल, तर कट्टरतेच्या भाषेपेक्षा सहअस्तित्वाची भाषा प्राधान्याने पुढे आणावी लागेल—अन्यथा हे विषवल्लीने पोखरलेलं राजकारण समाजाचं आणि लोकशाही संस्थांनाही उध्वस्त करण्याकडे झुकणार, याची जाणीव सर्वच पक्ष ठेवतील काय? – जगदीश काबरे, सांगली.

    Liked by 1 person

यावर आपले मत नोंदवा

अभिलेख (Archives)