काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात एक समारंभ पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या भवनाच्या अशोका हॉलमध्ये असलेला सर एडविन लॅंडसियर लुट्येन्स यांचा अर्ध पुतळा बाजूला सारून पहिले भारतरत्न सी. राजगोपालचारी उर्फ राजाजी यांचा पुतळा बसवण्यात आला.

या दोन्ही व्यक्तींच्या उत्तुंग कामगिरीच्या काळाला पारतंत्र्यातील भारत, स्वातंत्र्यलढा, भारताची फाळणी आदींची मोठी पार्श्वभूमी लाभली आहे. याच साम्याबरोबर यातील एकाने राष्ट्रपती भवनाची रचना केली आणि दुसऱ्याला स्वतंत्र भारतात या भवनात राहण्याचा पहिला मान मिळाला.

सर एडविन लॅंडसियर लुट्येन्स आणि सी. राजगोपालचारी यांच्या आयुष्यातील घटनांची साक्ष ब्रिटनपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून चेन्नईपर्यंत कायमची अधोरेखित झालेली आहे. त्यामुळे राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो वृत्तांत प्रसार माध्यमांमध्ये आला. त्यावरून या घटनेची संबंधित असलेल्या दोघा व्यक्तींची पार्श्वभूमी पाहिली असता इतिहासाची अनेक पाने उलगडतात. सर एडविन लॅंडसियर लुट्येन्स ब्रिटिश नागरिक होते. त्यांची आर्किटेक्ट म्हणून भारतात नियुक्ती करण्यात आली होती. बंगालच्या फाळणीवरून नामुष्की झाल्याने ब्रिटिशांनी कोलकत्ता येथून राजधानी दिल्लीला हलवली. राजधानीतून राज्यकारभार करण्यासाठी नवी दिल्लीची उभारणी करण्यात आली. या उभारणीला आकार देणारे आर्किटेक्ट सर एडविन लॅंडसियर लुट्येन्स हे होते. त्यांनी आपले वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीतील राष्ट्रपती भवन, संसद भवन, इंडिया गेट, नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक आदी इमारती उभ्या केल्या. त्यांची रचना केली. नवी दिल्लीचा बहुतांश भाग आज देखील याच आर्किटेकच्या नजरेतून उभारलेल्या राजधानीचा भाग आहे.

अशा या उत्तम वास्तूंची रचना करणाऱ्या आर्किटेकची स्मृती म्हणून सर एडविन लॅंडसियर लुट्येन्स यांचा अर्ध पुतळा राष्ट्रपती भवनाच्या अशोक हॉलच्या कोपऱ्यामध्ये ठेवण्यात आलेला होता.

राष्ट्रपती भवन. छाया: राष्ट्रपती भवन वेबसाइट

आपल्या देशाला २०१४ मध्येच स्वातंत्र्य मिळाले, असे मानणारा एक वर्ग तयार झाला आहे. देश स्वतंत्र झाला तरी परकीय मानसिकतेतून आजवर देश चालवण्यात आला. ती वसाहतवादी विचारसरणी आपण बाजूला केली पाहिजे आणि राष्ट्रवादाचा जप करीत राहिले पाहिजे. या विचारांनी पछाडलेले लोक तयार झाले आहेत. ब्रिटिशांना या देशातून घालवणारे असंख्य स्वातंत्र्यवीर आणि नेते ब्रिटिश मानसिकतेचे गुलाम कधीच नव्हते. या उलट आताचे राज्यकर्ते अपराधी भावनेने सर एडविन लॅंडसियर लुट्येन्स यांचाही पुतळा बाजूला केला. वास्तविक अशा भव्य इमारतीतून देशाचा कारभार गेली पंच्याहत्तर वर्षे चालू आहे आणि आजही त्याच राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती महोदया राहतात. तिथूनच ऐतिहासिक निर्णय होता. मात्र नवी दिल्लीला रूप देणाऱ्या सर एडविन लॅंडसियर लुट्येन्स यांचा पुतळा स्मृती म्हणून ठेवल्याने आपण वसाहतवादी गुलामगिरीत जातो. असा शोध लावण्यात आलेला आहे.

ब्रिटिशांच्या साम्राज्यावरील सूर्य मावळत नाही, असे म्हटले जात होते. ते साम्राज उलथून टाकण्यासाठी ज्यांनी सारा भारत एक केला त्या महात्मा गांधी यांचा पुतळा ब्रिटिनची राजधानी लंडनमध्ये संसदेच्या समोर उभारण्यात आला आहे. महात्मा गांधी यांचा द्वेष करण्याऐवजी त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात जी मानवी स्वातंत्र्याची मूल्ये रुजवली त्यांना महत्त्व आहे. त्यातून भारतासारखा देश उभा राहिला. स्वातंत्र्याचा लढा उभा राहिला. स्वातंत्र्य, बंधुता, समता, स्वराज्य याची संकल्पना भारतीयांच्या जीवनामध्ये रुजवण्यात आली. अशा व्यक्तीचा तो सन्मान आहे. महात्मा गांधी म्हणजे ब्रिटिश सरकारच्या किंवा साम्राज्याच्या विरोधाचे केवळ प्रतीक नाही. मानवी मूल्यांच्या उद्धाराचा ते प्रतीक होते. याच भावनेतून लंडनमध्ये महात्मा गांधी यांचा पुतळा उभा करण्यात आलेला आहे. या कृतीच्या मागे कोठेही साम्राज्यवादाची प्रकट इच्छा किंवा वसाहतवादी धोरणांचे समर्थन जाणवत नाही.

सर एडविन लॅंडसियर लुट्येन्स यांनी नवी दिल्ली उभी केली. त्याचाच भाग म्हणून त्यांचा छोटासा अर्ध पुतळा राष्ट्रपती भवनात बसवण्यात आलेला आहे. हा पुतळा हटवण्याच्या मागे वसाहतवादी मानसिकतेला मनातून काढून टाकण्याचा हेतू आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला.

सर एडविन लॅंडसियर लुट्येन्स. छाया: विकिमीेडिया / Bain News Service

सर एडविन लॅंडसियर लुट्येन्स यांनी रचना केलेल्या राष्ट्रपती भवनामध्ये सी. राजगोपालचारी राहत होते. त्यांनी कधी वसाहतवादी मानसिकतेच्या आहारी जाऊन एडविन लुट्येन्स यांच्या पुतळ्याची पूजा केली नाही. त्यांना कधी या भवनात गव्हर्नर जनरल म्हणून वास्तव्य करताना त्रास झाला नाही. त्या पुतळ्याचा ही त्रास झाला नाही. आपण प्रखर राष्ट्रवादी आहोत आणि ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाला प्रचंड विरोध करणारे आहोत, अशी शेखी मिरवण्याची संधी घेणारे आहेत. यांच्या विचारांचे पूर्वज जेव्हा ब्रिटिश येथे वसाहतवादी धोरणांची अंमलबजावणी करीत होते. तेव्हा विरोध केला नाही. याउलट सी. राजगोपालचारी यांनी सुमारे पाच दशके ब्रिटिशांच्या राजवटीविरुद्ध लढण्यात घालवली.

अशा या दोन व्यक्तींचा संदर्भ या घटनेशी आलेला आहे. या दोन्ही व्यक्तींची पार्श्वभूमी काय आहे त्यांची कारकीर्द कशी होती हे पाहणे आवश्यक आहे. सर एडविन लॅंडसियर लुट्येन्स (२ मार्च १८९६ – १ जानेवारी १९४४) एक ब्रिटिश आर्किटेक्ट होते. यांनी पारंपारिक स्थापत्य शैलीचा आपल्या काळातील आवश्यकतेनुसार बदलून वापर केला. त्यांनी बरीच इंग्रजी घरे, अनेक युद्ध स्मारके आणि सार्वजनिक इमारतींची रचना केली.

लूट्यन्स यांनी नवी दिल्लीची रचना आणि बांधकाम करण्यात मोलाची भूमिका बजावली. भारतची ती राजधानी म्हणून नावारूपास आली. त्यांच्या या योगदानाची ख्याती म्हणून नवी दिल्लीला “लूट्यन्स दिल्ली” असेही म्हणतात. सर हर्बर्ट बेकर यांच्या सहकार्याने ते नवी दिल्लीतील इंडिया गेटसारख्या अनेक स्मारकांचे मुख्य शिल्पकार होते. त्यांनी व्हायसरॉय हाऊसची रचना केली. जी आता राष्ट्रपती भवन म्हणून ओळखली जाते. लूट्यन्स यांचा जन्म लंडनमधील केन्सिंग्टनमध्ये झाला होता. आयर्लंड मधील मेरी थेरेसा गॅल्वे आणि कॅप्टन चार्ल्स हेन्री ऑगस्टस लुटियन्स यांचे अपत्य होय. ते सैनिक आणि चित्रकार होते. लूट्यन्स यांनी १८८५ ते १८८७ या काळात लंडनच्या साउथ केन्सिंग्टन स्कूल ऑफ आर्टमध्ये आर्किटेक्चरचा अभ्यास केला. महाविद्यालयानंतर त्यांनी अर्नेस्ट जॉर्ज आणि हॅरोल्ड पेटो आर्किटेक्चरल प्रॅक्टिसमध्ये प्रवेश केला. इथेच सर हर्बर्ट बेकर यांची प्रथम भेट घेतली. बरेच वर्ष त्यांनी लंडनमधील ब्लूमबरी स्क्वेअर येथील कार्यालयांमधून काम केले. लूट्यन्सच्या सुरुवातीच्या कामामध्ये बरीचशी खासगी घरे होती. त्यांनी काही चर्चची रचना देखील केली. इंग्लंड, भारत, आयर्लंड, आणि स्पेनमध्येही त्यांनी कामे केली.

नवी दिल्लीतील इंडिया गेट. छाया: विकिमीेडिया / A Savin.

कोलकत्ताहून ब्रिटिश राजवटीची राजधानी दिल्लीला १९१२ मध्ये हलविली केली गेली. १९१२ ते १९३० या काळात त्यांनी दिल्लीची रचना केली. हा प्रकल्प १९२९ मध्ये पूर्ण झाला आणि १९३१ मध्ये अधिकृतपणे उद्घाटन झाले. त्यांनी राष्ट्रपती भवन, इंडिया गेट, हैदराबाद हाऊसची रचना देखील केली. ४ ऑगस्ट १८९८ रोजी लूट्यन्सने लेडी एमिली बुल्वर-लिटन यांच्याशी विवाह केला. एमिली या एडिथ आणि लॉर्ड लिटन (भारताचे माजी गव्हर्नर जनरल) यांची तिसरी कन्या होती. त्यांना पाच मुले होती. परंतु त्यांचे लग्न अगदी सुरुवातीपासूनच असमाधानकारक होते. कारण लेडी एमिलीचा थियोसोफी, पूर्व धर्म आणि जी.कृष्णमूर्ती यांच्याकडे भावनिक आणि तात्त्विक दृष्टिकोनातून ओढा निर्माण झाला होता.

आयुष्याच्या उत्तरार्धात लुटियन्स यांना अनेक वेळा न्यूमोनियाचा त्रास झाला. १९४० च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. १ जानेवारी १९४४ रोजी त्यांचे निधन झाले. लुटियन्स दिल्ली हे नवी दिल्ली मधील एक भाग आहे. याचे नाव ब्रिटिश वास्तुविशारद सर एडविन लुटियन्स (१८६९-१९४४) यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. जे ब्रिटिश राजवटीच्या काळात बहुतेक वास्तुशिल्प रचना आणि इमारतींचे रचनाकार होते. यामध्ये ल्युटियन्स बंगला याचाही समावेश आहे. दिल्लीचे वास्तुविशारद सर एडविन लुटियन्स यांनी राष्ट्रपती भवन इस्टेटीमध्ये (व्हाइसरॉय हाऊस इस्टेट) चार बंगल्यांची रचना केली. आता हे बंगले मदर तेरेसा क्रिसेंट (तेव्हाचे नाव : विलिंग्डन क्रिसेंट) वर आहेत. लुटियन्स यांनी व्हाईसरॉयच्या घराची रचना करण्याव्यतिरिक्त, मोठ्या सरकारी इमारतींची रचना केली आणि शहर नियोजनात देखील त्यांचा सहभाग होता.

सर हर्बर्ट बेकर, ज्यांनी सचिवालय इमारती (उत्तर आणि दक्षिण ब्लॉक) ची रचना देखील केली होती.त्यांनी तत्कालीन किंग जॉर्ज अव्हेन्यू (सचिवालयाच्या दक्षिणेकडील) येथे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसाठी बंगल्यांची रचना केली होती. वास्तुविशारदांच्या समूहाच्या इतर सदस्यांमध्ये रॉबर्ट टोर रसेल देखील होते. ज्यांनी कॅनॉट प्लेस, जनपथवरील पूर्व आणि पश्चिम न्यायालये, तीन मूर्ती हाऊस (पूर्वी फ्लॅगस्टाफ हाऊस म्हणून ओळखले जात होते) सफदरजंग विमानतळ (पूर्वीचे विलिंग्डन एअरफील्ड), इर्विन अॅम्फीथिएटर ( मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम असे आता नामांतर ) आणि अनेक सरकारी घरे, विल्यम हेन्री निकोल्स, सीजी ब्लॉमफिल्ड, एफबी ब्लॉमफिल्ड, वॉल्टर सायक्स जॉर्ज, आर्थर गॉर्डन शूस्मिथ आणि हेन्री मेड या वास्तू बांधल्या.

सी. राजगोपालचारी. छाया: हिंदुस्तान टाइम्स

चक्रवर्ती राजगोपालाचारी (सी. राजगोपालाचारी ) उर्फ राजाजी उर्फ सी.आर. म्हणून ओळखले जाणारे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात महत्त्वाची राजकीय भूमिका बजणारे नेते होते. वकील, लेखक, इतिहासकार आणि गांधीवादी नेते म्हणून प्रसिद्ध होते. स्वतंत्र भारताची प्रजासत्ताक म्हणून देशाची वाटचाल सुरू होण्यापूर्वी राजगोपालाचारी हे भारताचे पहिले आणि शेवटचे देखील भारतीय असलेले एकमेव गव्हर्नर जनरल होते. कारण त्यांच्याआधी ब्रिटिश नागरिकांसाठीच हे पद होते. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते, मद्रास प्रांताचे प्रिमियर, पश्चिम बंगालचे राज्यपाल, केंद्रीय गृह खात्याचे राज्यमंत्री आणि मद्रास प्रांताचे मुख्यमंत्री म्हणूनही काम पाहिले. राजगोपालाचारी यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करून स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. ते भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नचे पहिले मानकरी होते. त्यांनी अण्वस्त्रांच्या वापरास कडाडून विरोध दर्शविला आणि जागतिक शांतता तसेच निःशस्त्रीकरणाचे पुरस्कर्ते होते.

राजगोपालाचारी यांचा जन्म मद्रास प्रांतातील सेलम जिल्ह्यातील (सध्याच्या तामिळनाडूचा कृष्णगिरी जिल्हा) थोरपल्ली या गावी झाला. त्यांचे शिक्षण बंगळूरच्या सेंट्रल कॉलेज आणि मद्रासच्या प्रांतीय कॉलेजमध्ये झाले. कायद्याची पदवीही घेतली. राजकारणात प्रवेश केल्यावर ते सेलेमच्या नगराध्यक्षपदी निवडून आले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले आणि राउलट कायद्याविरोधातील आंदोलनात, असहकार चळवळ, वैकोम सत्याग्रह आदि आंदोलनात सामील झाले. १९३० मध्ये दांडी मार्च प्रमाणेच वेदरान्याम येथे मीठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व करताना राजगोपालाचारी यांना कारावास झाला. राजागोपालाचारी हे १९३७ मध्ये मद्रास प्रेसिडेंसीचे प्रीमियर ( मुख्यमंत्री) म्हणून निवडले गेले.

ब्रिटनने भारतीयांना विश्वासात न घेता दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारताच त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. भारत छोडो आंदोलनाला विरोध करीत ब्रिटिशांच्या बरोबर चर्चा करून स्वातंत्र्याची मागणी रेटावी या मताचे ते होते. भारताची फाळणी होऊ नये यासाठी मोहम्मद अली जिना यांच्याशी करण्यात चर्चा करण्यात त्यांचा पुढाकार होता. १९४६ मध्ये राजगोपालाचारी यांना अंतरिम भारत सरकारमधील उद्योग, पुरवठा, शिक्षण आणि अर्थमंत्री म्हणून नियुक्त केले गेले. त्यानंतर १९४७ ते १९४८ पर्यंत पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून, १९४८ ते १९५० पर्यंत भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून, १९५१ पासून केंद्रीय गृह खात्याचे राज्यमंत्री म्हणून ते कार्यरत होते. १९५२ ते १९५४ पर्यंत मद्रास राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. मुख्यमंत्री असताना त्यांनी हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून दर्जा देण्याच्या निर्णयाचे समर्थन केले होते. त्याचा मद्रास प्रांतामध्ये त्यांच्याविषयी प्रचंड असंतोष पसरला होता. परिणामी त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. पुढे त्यांनी ही भूमिका बदलून हिंदी विरोधात द्रविडीयन चळवळीत सहभाग घेतला. भाषावार प्रांत रचना करण्यास त्यांचा ठाम विरोध होता.

त्यांनी मुक्त भांडवली अर्थव्यवस्थेचे समर्थन करीत पंचवार्षिक योजनेद्वारे मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारण्याला विरोध केला होता. प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी मतभेद वाढल्याने अखिल भारतीय काँग्रेसचा राजीनामा दिला आणि १९६२, १९६७ आणि १९७१ च्या निवडणुकीत काँग्रेसविरूद्ध लढलेल्या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. १९६७ च्या निवडणुकीत सी. एन. अण्णादुराई यांच्या नेतृत्वात मद्रास राज्यात स्थापन झालेल्या संयुक्त काँग्रेस विरोधी मोर्चाला आकार देण्यात राजगोपालाचारी यांचा मोलाचा वाटा होता. याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्वतंत्र पक्षाला देशभरात ४४ जागा मिळाल्या आणि तो प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उदयास आला. शिवाय विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राजस्थान आणि गुजरात राज्यात हा पक्ष प्रमुख विरोधी पक्ष झाला. राजगोपालचारी यांच्या पक्षाच्या समर्थनार्थ देशातील अनेक खालसा झालेल्या संस्थानांचे राजे राजकारणात उतरले होते. २५ डिसेंबर १९७२ रोजी वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांचे चेन्नई येथे निधन झाले.

राजगोपालाचारी हे एक उत्तम लेखक होते. त्यांनी भारतीय इंग्रजी साहित्यात मोलाचे योगदान दिले. कर्नाटकी संगीतावर रचलेल्या ‘कुरई ओन्रुम इल्लै’ या गाण्याची रचना केली होती. त्यांनी भारतात शांतता आणि मंदिर प्रवेशाच्या चळवळींचा पुढाकार घेतला. जातीव्यवस्थेला विरोध करीत दलित उत्कर्षाचा पुरस्कार केला. हिंदीचा अनिवार्य अभ्यास आणि मद्रास राज्यात प्राथमिक शिक्षण विवादास्पद मद्रास योजना सुरू केल्याबद्दल त्यांच्यावर टीका झाली. महात्मा गांधी यांनी “माझ्या विवेकाचा रक्षणकर्ता” म्हणून राजगोपालाचारी यांचे वर्णन केले होते.

यावर आपले मत नोंदवा

अभिलेख (Archives)