कोल्हापूर सारख्या ऐतिहासिक शहराने अजितदादा पवार यांचा आदर्श घ्यावा, असे कोणते गुण त्यांच्या व्यक्तिमत्वात होते ? किंवा त्यांच्याविषयी कोल्हापूरकरांनी कृतज्ञता व्यक्त करावी, असे कोणते काम त्यांनी शहरासाठी केले आहे…? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे कोल्हापूर महापालिकेने कोल्हापूरकरांना दिली पाहिजेत. कारण हा पुतळा स्मारक म्हणून उभा करण्याचा निर्णय कोल्हापूर महापालिकेतील महायुतीने आपल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेमध्ये घेतला आहे.

कोल्हापुरात सार्वजनिक ठिकाणी सुमारे पस्तीस पुतळे आहेत. प्रत्येक पुतळा उभारताना काही ना काही त्याच्यामध्ये ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय अधिष्ठानाची पार्श्वभूमी आहे. ( काही पुतळे अपवाद ठरतात) शिवाय या पुतळ्यांचा इतिहास पाहिला तर तो सुमारे शंभर वर्षाहून अधिक आहे. कोल्हापूरच्या दसरा चौकामध्ये उभारण्यात आलेला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला येत्या १२ एप्रिल रोजी नव्याण्णव वर्षे पूर्ण होत आहेत. तो स्मारक रूपाने कोल्हापूरकरांचा सन्मान वाढवणारा ठरला आहे. त्याचे शताब्दी वर्ष सुरू होत आहे. शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा इतिहासही स्वातंत्र्यलढ्याशी जोडलेला आहे. त्याच जागी पूर्वी मुंबई प्रांताचे गव्हर्नर विल्सन यांचा पुतळा उभारण्यात आला होता. कोल्हापूरच्या स्वातंत्र्य सैनिकांनी हा पुतळा फोडला आणि ब्रिटिश सत्तेचा निषेध केला.

शिवाजी महाराजांचा पुतळा
चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांनी पुढाकार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी दिमाखात उभा केला. अशा प्रकारे कोल्हापुरातील प्रत्येक पुतळ्याची काही ना काही पार्श्वभूमी आहे. ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक चळवळीचे अधिष्ठान त्याला आहे. विचारांची परंपरा आहे. शिवाय लोक सहभाग देखील याच्यामध्ये आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे निधन दि. ६ मे १९२२ रोजी मुंबईत झाले. कोल्हापूरच्या सिंहासनावर राजाराम महाराज आले. त्यांनी पुढाकार घेऊन राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्मारक म्हणून दसरा चौकात पुतळा उभा करण्याचा निर्णय घेतला. हा पुतळा कोल्हापूरच्या संस्थांच्या तिजोरीतून निधी खर्च करून सहज उभा करता आला असता. पण लोक सहभाग असावा या उद्देशाने छत्रपती राजाराम महाराज यांनी लोक वर्गणी गोळा करायला सुरुवात केली आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. हा पुतळा मुंबईचे शिल्पकार गणपतराव म्हात्रे यांनी तयार केला. पुतळा तयार झाला तेव्हा तो आगगाडीने मुंबईहून कोल्हापूरला आणण्यात आला. कोल्हापुरात त्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि दसरा चौकात आता जिथे पुतळा उभा आहे तिथे तो विराजमान करण्यात आला. गेली नव्याण्णव वर्षे उन्हाळे, पावसाळे, हिवाळे पहात हा पुतळा उभा आहे. कोल्हापुराकरांचे ते प्रेरणास्थान आहे.

शिवाजी महाराजांचा पुतळा

लोकवर्गणीतून पुतळा
ज्येष्ठ समाज सुधारक माधवराव बागल यांनी पुढाकार घेऊन घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बिंदू चौकात उभा करण्याचा निर्णय घेतला. तो अर्ध पुतळा आहे. कोल्हापूरचे तरुण शिल्पकार बाळ चव्हाण यांनी तो तयार केला. आंबेडकर यांचा देशातील तो पहिला पुतळा आहे. ते हयात असताना बसवण्यात आलेला पुतळा आहे. बाळ चव्हाण जेव्हा पुतळा बनवीत होते तेव्हा त्यांच्यासमोर सलग तीन दिवस बाबासाहेब आंबेडकर येऊन बसत होते. हा पुतळा देखील कोल्हापूरच्या नागरिक समितीने लोक वर्गणीतून उभा केला आहे. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण उपस्थित नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. आंबेडकर यांचा पुतळा उभा केल्यानंतर जे पैसे शिल्लक राहिले त्यातून शेजारीच महात्मा फुले यांचाही पुतळा करावा असा विचार पुढे आला. त्याच निधीतून पुन्हा महात्मा फुले यांचाही पुतळा बिंदू चौकात उभा राहिला. सामाजिक समतेचे व्यासपीठ म्हणून बिंदू चौकाला आकार देण्याचे काम त्याकाळी माधवराव बागल यांनी केले.

बिंदू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लोकवर्गणीतून उभारलेला पुतळा

कोल्हापुरातील कोणत्याही पुतळ्याची तुम्ही आठवण काढली किंवा त्याचा इतिहास तपासून पाहिला तर अशाच प्रकारे पुतळे उभे करण्यात आले आहेत. करवीर संस्थानाच्या संस्थापिका ताराराणी महाराज यांचा पुतळा बसवण्याची मनीषा लोकांनी व्यक्त केली. तेव्हा त्या पुतळ्याचे सुंदर काम प्रख्यात शिल्पकार रविंद्र मिस्त्री यांनी केले. हा पुतळा कसा असेल तर महाराणी अश्वावरून येत असताना या पुतळ्याची पोझ कशी असेल. याचे प्रात्यक्षिक त्या काळात घेण्यात आले. एका घोड्यावर ताराराणीच्या रूपात एका महिलेला बसवण्यात आले होते आणि आत्ता ज्या पद्धतीने घोडा उभा आहे. त्या पद्धतीने त्याचे चौदा छायाचित्रकारांनी छायाचित्रे काढली. त्या छायाचित्रांच्या आधारे हा पुतळा बनवण्यात आलेला आहे. घोड्याच्या मागच्या पायाच्या दोन टापूवर उभा असलेला पुतळा एक आदर्श शिल्पकलेचा नमुना आहे.

कोल्हापूरच्या प्रवेशव्दारातील ताराराणी यांचा पुतळा

कोल्हापूर महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. टाऊन हॉलच्या एका बाजूला चिमासाहेब महाराजांचा पुतळा आहे. जयंती नाल्याजवळ प्रिन्स शिवाजी यांचा पुतळा आहे. शिवाजी विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला उंची देईल, असा छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्कृष्ट पुतळा विद्यापीठ परिसरात लोकवर्गणीतून उभारला आहे. कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठ व्हावे म्हणून मोठी चळवळ झाली होती आणि शिवाजी महाराज यांचे एक शैक्षणिक स्मारकच त्या निमित्ताने उभे करण्यात कोल्हापूरकरांनी पुढाकार घेतला होता. कोल्हापुरात ठिकठिकाणी असे अनेक पुतळे आहेत. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, सत्यवादीकार बाळासाहेब पाटील, अण्णासाहेब लठ्ठे, वि. स. खांडेकर, तात्यासाहेब मोहिते, अल्लाउदिया खान, पिराजीराव सरनाईक, बाईंचा पुतळा, रेड्याची टक्कर!

कोल्हापूर मधील साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा. चित्रपट, राजकारण, समाजकारण, सहकार आदि सर्वांचे प्रतिबिंब उमटवणारे अशा आदर्शवत थोर व्यक्तींचे पुतळे उभे करण्यात आलेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या पुतळ्यांच्या उभारणीच्या मागे एक मोठी प्रेरणा लाभलेली आहे. असे निर्णय करीत असताना एक विचार त्याच्यामध्ये आहे. हा सारा वारसा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यापासून पुढे चालत आलेला आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या वाटचालीमध्ये याचे प्रतिबिंब ठिकठिकाणी आपल्याला उमटलेले दिसते. कोल्हापूरच्या वाटचालीमध्ये भरीव कामगिरी केलेल्या आणि विविध क्षेत्रांमध्ये आपला स्वतंत्र असा ठसा उमटवलेल्या व्यक्तींचे पुतळे इथे उभे करण्यात आले आहेत. हीच संकल्पना विस्तारित करताना अलीकडच्या काळात देखील छत्रपती शिवाजी महाराज यांचा कसबा बावड्याला सुंदर पुतळा उभा करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेने यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा उभारला आहे.

अशी एक वेगळी परंपरा असलेलं कोल्हापूर हे शहर आहे. या शहराच्या वैचारिक आणि सामाजिक परंपरेमध्ये भर घालणाऱ्यांचे पुतळे स्मारक म्हणून उभारण्यात आले आहेत. केवळ एखादा पुतळा उभा करायचा आहे आणि जयंती पुण्यतिथी साजरी करायची आहे एवढ्या मर्यादित अर्थाने हे पुतळे उभे करण्यात आलेले नाहीत.

बारामती कार्यक्षेत्र
अशा पार्श्वभूमीवरील कोल्हापूर शहरामध्ये अजितदादा पवार यांचा पुतळा स्मारक म्हणून उभा करावा ही कल्पना कोणत्याच पातळीवरती योग्य ठरत नाही. कारण अजित पवार यांचे कोल्हापूर हे कार्यक्षेत्र नाही. जरी ते महाराष्ट्राचे नेते असले मानले तरी त्यांचे कार्यक्षेत्र हे बारामतीच राहिले आहे. त्यांनी पुणे जिल्ह्यासाठी विशेष काम केले. शिवाय पिंपरी- चिंचवड महापालिकेचा कारभार त्यांनी अनेक वर्षे पाहिला. बारामतीचा पॅटर्न जो ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळे तयार झाला त्याच्यामध्ये आपल्या कार्याने भर घातली हे नाकारता येत नाही. त्यांचे गेल्या २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळावर अपघाती निधन झाले. त्या अपघाती निधनानंतर अजित पवार यांच्या विषयीची एक प्रचंड सहानुभूती निर्माण झाली. कारण ज्या पद्धतीने त्यांचे अकस्मात निधन झाले. ते खूपच दुःखद होते. हळहळ व्यक्त करणारे होते. संपूर्ण महाराष्ट्र मधून आणि देशभरातूनही त्यांच्या या दुर्दैवी निधनाबद्दल जनतेला तीव्र दुःख झाले होते.

अजित पवार

अजित पवार जेव्हा राजकारणात सक्रिय होते. त्यावेळी त्यांच्याविषयी फारसे चांगले बोलले जात नव्हते. ते तापट स्वभावाचे आहेत. त्यांच्याकडे व्हिजन नाही. समोर येईल त्या विषयावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात. खूप वेळ देतात. एवढ्या मर्यादेपर्यंत त्यांच्याविषयी बोलले जात होते. मात्र ज्या पद्धतीने त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर जी सहानभूतीची लाट निर्माण झाली. तेव्हा अजित पवार यांना अवगुण म्हणून जे गुण चिटकवले जात होते. ते सर्व त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण गुण म्हणून गौरवण्यात येऊ लागले. याविषयी कोणाची तक्रार असण्याचे कारण नाही. अजित पवार यांनी आपल्या वैचारिक राजकीय चौकटींना मर्यादा घालून भारतीय जनता पक्षाबरोबर जावे लागले. याचे कारण त्यांच्यावर सिंचन प्रकल्पामध्ये घोटाळे करण्यात आल्याचा आरोप झाले होते. देशाच्या पंतप्रधानांनी त्यांच्यावर सिंचन आणि राज्य सहकारी बँकेमध्ये घोटाळे केल्याचा आरोप केला होता. मात्र अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याबरोबर या सर्व आरोपांना केराची टोपली दाखवण्यात आली.

अजित पवार हे तथाकथित लोकप्रिय नेते वगैरे होण्यासाठीचे जे गुण लागतात. ते गुण त्यांच्याकडे अवगत होते. त्यामुळे ते लोकप्रिय देखील होते. पण ज्याला स्टेट्समन किंवा राजनीतिन्य म्हणता येईल, अशा स्वरूपाचे राजकीय नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे फारसे गुण नव्हते. यशवंतराव चव्हाण किंवा शरद पवार यांचा वारसा आपण चालवतो, असे ते म्हणत असले किंवा त्यांच्या विचाराने आपण वाटचाल करतो असे जरी म्हणत असले तरी या दोन नेत्यांच्या नेतृत्वातील गुणांचा अभावच अधिक दिसत होता. सहकारी साखर कारखानदारी किंवा सहकार चळवळीकडे त्यांनी ज्या पद्धतीने पाहिले आणि त्याचे खाजगीकरण केले. हे एकमेव उदाहरण त्यांच्या नेतृत्वाविषयी बोलण्यासाठी पुरेशी आहे. त्यांनी अनेक सहकारी साखर कारखाने विकत घेतले. त्याचे सहकारातून खाजगीकरण केले. अशा प्रकारे जवळपास दररोज ऐंशी हजार टन उसाचे गाळप होईल इतक्या क्षमतेचे कारखाने त्यांच्याकडे होते. ही सर्व कला त्यांनी अवगत केली असली तरीसुद्धा महाराष्ट्राच्या विकासासाठी एक व्यापक दृष्टिकोन घेऊन विधायक विचार करणारा नेता अशी त्यांची काही प्रतिमा नव्हती. त्यामुळे त्यांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा आदर करीत पुढे वाटचाल करण्यासाठी प्रेरणा घ्यावी, असे म्हणता येणार नाही. एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्याविषयी वाईट बोलू नये किंबहुना त्या व्यक्तीच्या गुणांचाच उल्लेख करावा अवगुण टाळावेत अशी सभ्यता म्हणून सार्वजनिक मर्यादा पाळली जाते.

अजित पवार यांचे नाव बारामतीशी जोडले गेलेले होते. तो त्यांचा मतदारसंघही होता. त्यांनी एखाद्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून जे जे करणे आवश्यक होते ते सर्व बारामतीकरांसाठी केलेले आहे. त्यामुळे अजित पवार यांचे बारामतीमध्ये स्मारक करणे, पुतळा उभारणे, त्यांच्या नावाने एखादी संस्था उभी करणे हे स्वागतहार्यच आहे. याविषयी कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. मात्र मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये त्यांचे स्मारक करण्याची जाहीर केले आहे. हे मात्र अति होते असे वाटते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज किंवा महात्मा फुले यांचे स्मारक मुंबईत झाले नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक मुंबईपासून काही अंतरावर समुद्रात करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जाहीर करण्यात आला होता. तो भव्यदिव्य वाटावा अशा प्रकारे जिथे मनुष्य वस्ती नाही अशा ठिकाणी ते स्मारक करावे ही कल्पनाच थोडीशी न पटणारी वाटत होती. मात्र ते अजूनही उभे राहिलेले नाही. असे असताना अजित पवार यांना संपूर्ण महाराष्ट्राने नेते म्हणून स्वीकारले देखील नव्हते किंबहुना त्यांनी ते नेतृत्व सिद्धही केलेले नव्हते. असे असताना मुंबईमध्ये त्यांचे स्मारक करण्याची घोषणा ही हास्यास्पदच वाटते. आता जे राजकारणी सक्रिय आहेत त्यांच्यामध्ये अजितदादा हे निश्चितच उठून दिसणारे होते. मात्र ते महाराष्ट्राचे आदर्शवत नेते होते. असे मानायला मन तयार होत नाही. त्यामुळेच कोल्हापूर महापालिकेने अति उत्साहाने तथा भावनेच्या भरात केलेला ठराव जरी योग्य असला तरी कोल्हापूरचा सुमारे साडेतेराशे वर्षांचा इतिहास पाहता, चढणघडण पाहता अजित पवार यांचे स्मारक रूपाने पुतळा उभा करणे पटण्याजोगे नाही.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज

वसंतदादांचा विसर
सांगलीला मदन पाटील यांचाही असाच पुतळा महापालिकेने उभा केलेला आहे. मदन पाटील यांची राजकीय वाटचाल, त्यांनी केलेल्या कार्य, त्यांनी केलेली भाषण, त्यांचे विधिमंडळात केलेलं कार्य तसेच सांगली शहर आणि जिल्ह्यासाठी दिलेले योगदान याचा लेखाजोखा मांडला तर सांगलीकरांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा, त्यांची प्रेरणा घ्यावी असे काहीही सांगता येत नाही. वसंतदादाj पाटील यांचे नातू म्हणून त्यांना राजकारणात संधी मिळाली. नगरपालिकेच्या पातळीवरचे राजकारण ते सांभाळत राहिले. दादा घराण्यातील सदस्य असल्यामुळे आपोआपच राजकीय नेतृत्व मिळत गेले. मात्र त्यांना ज्या संस्था वसंतदादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थापन केलेल्या चालवण्याची संधी जेव्हा चालून आली त्या त्या वेळी त्या संस्था चालविता आल्या नाहीत. ही वस्तुस्थिती आहे.

१९६७ मध्ये स्थापन केलेली शेतकरी सहकारी बँक जिचे वसंतदादांच्या निधनानंतर वसंतदादा शेतकरी सहकारी बँक असे नामकरण करण्यात आले. ती बँक बुडाली. मदन पाटील यांनीच पुढाकार घेऊन स्थापन केलेला वसंत बझार याच्या चौदा शाखा काढण्यात आल्या. ग्राहकांचा उत्तम प्रसाद मिळाला होता. पण हा वसंत बझार सहकार तत्त्वावर चालवणे शक्य झाले नाही. त्याचे अवशेष आता शोधूनही सापडत नाहीत. असे नेतृत्व असलेल्या मदन पाटील यांचा पुतळा उभा करण्यात आला आहे. वसंतदादा पाटील आणि त्यांच्या तेरा सहकाऱ्यांनी सांगलीचा जेल फोडून पलायन केले होते. ही घटना २४ जुलै १९४३ रोजी घडली होती. त्या क्रांतिकारकांचे स्मारक करावे, असा अग्र मदन पाटील यांच्याकडे अनेक वेळा धरला होता. पण त्यांनी कधी त्याचे महत्त्व जाणले नाही. या ऐतिहासिक जेल फोडण्याच्या प्रसंगी दोन स्वातंत्र्य सेनानींना आपला प्राण गमवावा लागला होता. वसंतदादा पाटील यांच्या खांद्याला गोळी लागली होती. अशा प्रसंगातून बसून दादा आणि त्यांचे सहकारी तावून-सुलाखून निघाले होते. या घटनेची साधी स्मृती सांगलीमध्ये कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाही.

त्या त्या शहराचा ऐतिहासिक वारसा आपण जपला पाहिजे. त्या शहरासाठी कार्य केलेल्या नेत्यांचे स्मरण केले पाहिजे. पण अजितदादा पवार यांनी कोल्हापूरसाठी तसे कोणतेही भरीव काम केलेले नाही. किंबहुना २०१२ मध्ये शिवाजी विद्यापीठाचा सुवर्ण महोत्सव झाला. त्यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अजितदादा पवार यांनी शिवाजी विद्यापीठाला पन्नास कोटी रुपयांचा विशेष निधी देऊ, अशी घोषणा केली होती. आजवर तो निधी मिळाला नाही. लोकशाही आहे. लोकांनी निवडलेले लोकप्रतिनिधी निर्णय घेतात आणि मदन पाटील यांचा पुतळा उभा होतो. त्याप्रमाणेच अजितदादांचा देखील पुतळा कोल्हापुरात राजाराम कॉलेज आणि शिवाजी विद्यापीठाच्या चौकात उभा केला. तर आश्चर्य वाटायचे कारण नाही. पण भावनेच्या आहारी जाऊन असे काही निर्णय घेतले जातात. त्याऐवजी त्यांच्या नावाने एकादी शाळा, संस्था, ग्रंथालय किंवा एखादा समाज उपयोगी काम उभे केले तर ते अधिक संयुक्तिक ठरेल. कोल्हापूरच्या जनतेने अजित पवार यांच्या कार्याचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गुण प्रेरणास्थान म्हणून कसा घ्यावा याविषयीचे स्पष्टीकरण देखील हा पुतळा उभा करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांनी जनतेला द्यावे, ही अपेक्षा करणे गैर नाही.

शाहू स्मारक
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्मारक कोल्हापुरात भव्य दिव्य उभे केले जावे अशी अनेक वर्षाची मागणी आहे. बाबुराव धारवाडे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी मिळून पुढाकार घेतला आणि दसरा चौकात छोटेखाणी का असेना शाहू स्मारक बांधले गेले. पण ते परिपूर्ण नाही. शाहू महाराजांच्या कार्याला शोभे अशा स्वरूपाचे भव्यदव्य स्वरूपात शाहू स्मारक होणे कोल्हापूरसाठी आवश्यक असताना ते पूर्ण होत नाही. ही अनेक वर्षाची खंत आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाची संग्रहालयाच्या रूपात उभारणी करण्यासाठी अनेक वर्षे लागली. तसेच शाहू महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिव देहावर जिथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तेथे समाधी स्थळ उभा करावे, अशी शाहू महाराज यांची इच्छा होती. ते समाधीस्थळ अलीकडे शंभर वर्षांनी पूर्ण करण्यात आले. अशा ज्या ऐतिहासिक गोष्टी आहेत किंवा ज्यांचे आदर्श घेऊन महाराष्ट्र वाटचाल करू पाहतो आहे त्यांच्या स्मारकाकडे दुर्लक्ष केले जाते. याचीही नोंद या निमित्ताने घ्यायला पाहिजे.

यावर आपले मत नोंदवा

अभिलेख (Archives)