संपादक अनंत दीक्षित यांच्या स्मृती जागवताना पत्रकारितेचे वलय केवळ मिरवण्यापुरते नाही तर समाजाबरोबर चालण्यासाठी या माध्यमाचा उपयोग अधिक व्यापकपणे कसा करता येऊ शकतो याची चर्चाही या निमित्ताने झाली हेही कमी नव्हे..!
अनेक दिवसांनी एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे समाधान गेल्या आठवड्यात मिळाले. निमित्त होते, कोल्हापुरात घडलेल्या पत्रकार मित्रांनी त्यांच्या उमेदवारीच्या काळात सहवास लाभलेल्या संपादक अनंत दीक्षित यांच्या स्मृती समारंभाचा. त्याला श्रोत्यांनीही भरभरून प्रतिसाद दिला. शिवाय कालच्या आणि आजच्या पत्रकारितेवर विचार मंथन देखील झाले.

अनंत दीक्षित मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे. सोलापूरकर यांचे यांचा तोंडावळा पुण्याच्या दिशेने असतो. तसे अनंत दीक्षित देखील तत्कालीन आघाडीवरच्या दैनिक केसरीमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यांनी पत्रकारितेची गती खूपच लवकर पकडली. परिणामी पाहता पाहता ते कोल्हापूर सकाळच्या संपादकपदी रुजू झाले. कोल्हापूर सकाळचे ते तिसरे संपादक. मराठी साखळी वृत्तपत्रांच्या सुरुवातीचा काळ होता. सकाळ वृत्तपत्र समूहाने त्या अगोदर फक्त मुंबईची आवृत्ती १९७२ मध्ये सुरू केली होती. दि. १ऑगस्ट १९८० रोजी कोल्हापूरला स्वतंत्र आवृत्ती सुरू झाली. सदा डुंबरे पहिले संपादक आणि त्यानंतर विजय कुवळेकर यांनी काही काळ संपादक पदाची जबाबदारी सांभाळली होती. साखळी वृत्तपत्रे छोट्या छोट्या जिल्हा वृत्तपत्रांवर आक्रमण करणार, असा आक्षेप घेत दैनिक पुढारीने त्या काळात विरोधी भूमिका घेतली होती. केवळ भूमिका घेऊन न थांबता पुढारीने अंकात देखील मोठे बदल करायला आणि स्पर्धा सुरुवात केली. मात्र कोल्हापुरातील पत्रकारितेच्या स्पर्धेचे वातावरण थोडे गढूळ बनले होते.
अशा पार्श्वभूमीवर सकाळच्या कोल्हापूर आवृत्तीच्या संपादकपदी अनंत दीक्षित यांची निवड झाली होती. कोल्हापूर या शहराचे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व होते आणि आहे. जीवनाच्या सर्वांगाला स्पर्श करणारे सार्वजनिक वातावरण देखील आहे. त्याला साद घालण्याचा प्रयत्न वृत्तपत्रीय पत्रकारिता थोडा फार प्रयत्न झाला करीत होती. स्पर्धात्मक युगाचा कालखंड कोल्हापूरला सकाळ आल्यापासून सुरू झाला. त्याला खरा आकार देण्याचा प्रयत्न अनंत दीक्षित यांनी द्यायला सुरुवात केली. सार्वजनिक जीवनात घडणाऱ्या घटना घडामोडींचे वार्तांकन एवढ्या मर्यादेपर्यंत पत्रकारिता नसते. कला, साहित्य, संस्कृती, चित्रकला, शिक्षण, प्रबोधन, क्रीडाक्षेत्र आदि आघाड्यावरचे वारूळ उभे करण्यात संपादक म्हणून दीक्षित सहभागी होऊ लागले. तसा सकाळचा एक वाचक वर्ग तयार झाला. सकाळची मुळे कोल्हापुरात रुजू लागली होती..
अशा संपादकाची पत्रकारिता विस्मृतीत जाऊ नये असे या सात पत्रकारांनी आणि त्यांच्या हितचिंतक मित्रवर्यानी एकत्र येऊन विचार केला. कारण पंचवीस वर्षांपूर्वी अनंत दीक्षित यांच्यावर सकाळच्या पुणे आवृत्तीची जबाबदारी देण्यात आली. त्यांना जाऊनही आता यावर्षी पाच वर्षे झाली. पुण्यात असताना सकाळ आणि नंतरच्या काळात लोकमतच्या संपादक पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. मात्र कोल्हापूरचा मोकळा ढाकळा स्वभाव आणि मनाचा मोठेपणा त्यांच्यातून कमी होत नव्हता. याउलट पुण्यात गेल्यावर त्यांचे महत्त्व अधिकच अधोरेखित व्हायला हवे होते पण त्यांनाही कधी तसे वाटले नाही. आणि त्यांच्या मित्र परिवाराला देखील वाटले नाही. अनंत दीक्षित हे कोल्हापूरचे हे सातत्याने लोकांच्या मनात रुंजी घालत होतं. वारंवार ते कोल्हापूरच्या माणसाशी संपर्कात राहत होते. समाज घडवण्यामध्ये केवळ राजकीय नेतृत्व महत्त्वाचे नसते तर कलावंत, चित्रकार, संगीतकार, लेखक, साहित्यिक शिल्पकार यांचे योगदान देखील महत्त्वाचे असते. याची पुरेपूर जाणीव असल्याने अशा क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करूनही बाजूला राहिलेल्या किंबहुना उपेक्षित राहिलेल्यांना प्रकाशात आणण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी कोल्हापुरात केले. अनेक संस्थांच्या मागे त्यांनी बळ उभे केले. अपंगांसाठी काम करणारी संस्था असो किंवा गती कमी असणाऱ्या मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था असो त्यांच्यासाठी त्यांनी सातत्याने सकाळचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. जेष्ठ अभिनेते आणि चित्रकार चंद्रकांत मांढरे, अभिनेते गणपतराव पाटील अशा व्यक्तींचे जीवन चरित्र शब्दबद्ध करायला लावून ते सकाळमध्ये त्यांनी क्रमशः प्रसिद्ध केले.
कोल्हापुरातील विविध क्षेत्रांमध्ये तितकी माणसं मोठी होऊन गेली की त्यांची यादी केली तर ती खूपच मोठी होईल. कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी आपल्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कोल्हापूर घडवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची चरित्रमाला प्रसिद्ध करण्याचा उपक्रम हाती घेतला होता आणि अनेकांची चरित्रमाला प्रसिद्धही केली. त्यामुळे अनेकांची नव्याने नव्या पिढीला ओळख झाली.
देशातील पाचवे हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांचे चरित्र अशाच प्रकारे पुढे यावे, समाजासमोर मांडले जावे. अशी अनंत दीक्षित यांची इच्छा होती. ती त्यांनी लोकमतचे मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांच्याकडे वारंवार बोलून दाखवित होते. अखेर आम्ही निर्णय घेतला आणि विश्वास पाटील यांनी तो तडीस नेऊन पूर्ण केला. “लाल माती” या सदराखाली वर्षातील ५२ रविवारी हे सदर प्रसिद्ध झाले आणि त्याच नावाने ग्रंथाली प्रकाशन संस्थेने पुस्तक रूपाने ते चरित्र प्रसिद्ध केले. यामागील प्रेरणा अनंत दीक्षित यांचीच होती.
वाराणसी जवळच्या खेड्यातून कुस्तीच्या प्रेमापोटी दिनानाथ सिंह यांचे मुंबईत आगमन झाले. पुढे काही काळ सांगलीला सराव करून कोल्हापूरच्या गंगावेस तालमीचे नाव गाजवीत १९७२ मध्ये ते हिंदकेसरी किताब नागपूरला झालेल्या स्पर्धेत जिंकला. या पैलवानास डायरी लिहिण्याची सवय होती. त्यांनी गाजवलेल्या आणि खेळलेल्या सर्व कुस्त्यांची तारीख वार नोंद त्यांच्याकडे आहे. महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील सर्व कुस्ती मैदाने भरवणाऱ्या गावांची नावे त्यांना माहित आहेत. अशा व्यक्तिमत्त्वाचे लाल मातीतील जीवन शब्दरूप होऊन साहित्यात आणण्यास अनंत दीक्षित यांनीच भाग पाडले. मी आणि विश्वास पाटील केवळ निमित्त मात्र होतो. याची आवर्जून नोंद या निमित्ताने आवश्यक आहे, असे मला वाटते. पत्रकारितेतील कारकिर्दी बरोबरच वक्तृत्व शैली ही त्यांनी विकसित केली होती.वाचन मनन चिंतन आधीचा संगम असल्याने त्यांना हे शक्य झाले. पुढे वृत्तवाहिनी आल्यावर अनेक चर्चेत ते सहभागी होत असत. स्पष्ट विचार, ठाम भूमिका घेऊन वेगवेगळ्या पैलू द्वारे घटना घडीमोडींचा अर्थ समजून सांगत असायचे.
अशा पत्रकारातील व्यक्तिमत्त्वाची विस्मरण होण्यापूर्वी दीक्षित संपादक असताना पत्रकारितेची सुरुवात करणारे विजय चोरमारे, आदिनाथ चव्हाण, विश्वास पाटील, सम्राट फडणीस, राधेश्याम जाधव, निशिकांत तोडकर आणि धनंजय बिजले एकत्र आले आणि त्यांनी दीक्षित यांच्या स्मृती जागवण्याचा निर्णय घेतला. अनंत दीक्षित स्मृती समिती स्थापन करून त्यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय झाला. मराठी वृत्तपत्र क्षेत्रात असे पुरस्कार आणि त्यानिमित समारंभ होण्याचे भाग्य आनंद दीक्षित यांच्याच वाटेला आले असणार आहे. अनेक संपादकांच्या नावे पुरस्कार दिले जातात पण संपादकांच्या अनुयायाने किंबहुना सहकारी मित्रांनी एकत्र येऊन समारंभ घडवून आणणे कौतुकास्पद आहे. अनेक संपादकांच्या नावे पुरस्कार दिले जातात त्यासाठी संस्था किंवा ट्रस्ट आहेत त्यांच्यातर्फे ते पुरस्कार वितरित केले जातात.
कोल्हापुरात खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते पहिला अनंत दीक्षित स्मृति पुरस्कार ज्येष्ठ संपादक, विचारवंत आणि माजी खासदार कुमार केतकर यांना देण्यात आला. केतकर हे दिक्षितांचे मित्र, स्नेही सहकारी असले तरी ते वरिष्ठ आहेत. मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रसृष्टी त्यांनी गाजवलेली आहे. राज्यसभेचे सदस्य होते.त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. अनेक भाषणे गाजलेली आहेत. राष्ट्रीय पातळीवरील वृत्तवाहिन्यांमध्ये अनेक चर्चेत त्यांनी सहभाग घेतलेला आहे.
अनंत दीक्षित यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार आणि संकल्पना खूपच चांगली असल्याने या कार्यक्रमाची उत्सुकता अनेकांना होती. अनेक जण त्यांच्या स्मृती पुन्हा एकदा ताज्या करीत समारंभास आले होते. दीक्षित यांनी पत्रकारितेचे एक वलय निर्माण केले होते. साताऱ्याचे तरुण पत्रकार मोहन मस्कर यांचे अकाली निधन झाले होते त्यांच्या स्मृतीनिमित्त देखील नाशिकचे तरुण व्यंगचित्रकार आदित्य निरंतर यांचाही गौरव यानिमित्त करण्यात आला.
कुमार केतकर यांचे भाषण म्हणजे आर्थिक आणि सामाजिक बदलाचे राजकीय प्रतिबिंब कसे उमटते आहे याचे उत्तम विश्लेषण होते. नव्या आर्थिक धोरणाचे परिणाम समाजावर कसे झाले आहेत. मोठ्या वेगाने वाढलेल्या मध्यमवर्गीयांच्या जाणिवा कश्या बोथट झाल्या आहेत. परिणामी राजकीय प्रतिक्रिया समाजात आजकाल उठत नाहीत. शिवाय जाणीव देखील बोथट झाल्याने या सर्व व्यवस्थेच्या लाभापासून उपेक्षित राहिलेल्या जनतेबद्दल कोणाला आस्थाच राहिलेली नाही. संवेदना राहिलेली नाही. या मोठ्या मध्यमवर्गाला स्मृती भ्रंश झाला आहे. असा निष्कर्ष त्यांनी काढला आणि विस्ताराने आपले म्हणणे मांडले. त्या पार्श्वभूमीवर अक्राळ विक्राळ झालेल्या प्रसारमाध्यमांचे स्वरूप ही उलगडून सांगितले. अशा वातावरणात सद्यस्थितीत पत्रकारिता करणे खूपच आव्हानात्मक आहे. शिवाय हिंदू -मुस्लिम द्वेषाचे राजकारण देशभर चालू असताना लोकांचे प्रश्न घेऊन संघटितपणे राजकीय ताकद उभी करणे. परिवर्तन करणे हे महाकठीण झाले आहे. अशी ही मांडणी त्यांनी यावेळी केली. माजी आमदार उल्हास दादा पवार या कार्यक्रमासाठी पुण्याहून खास आले होते. त्यांनी खुमारसदार भाषण तर केलेच सार्वजनिक जीवनात वावरताना संपादकापासून कार्यकर्त्यांपर्यंत संबंध असणारे उल्हास दादा यांनी दीक्षित यांच्या अनेक आठवणी जागवल्या. हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी ज्या पत्रकारांनी हा पुढाकार घेतला त्यांनी पत्रकारितेचा खरा अर्थानं गौरव केला. असे म्हणायला हरकत नाही. आदिनाथ चव्हाण, विजय चोरमारे. विश्वास पाटील किंवा सम्राट फडणीस आज वरिष्ठ पदावर काम करीत आहेत. राधेश्याम जाधव इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये वरिष्ठ पदावर काम करतात. १९९० च्या शतकात पत्रकारितेत आलेल्या या सर्व तरुण मंडळींनी एक चांगला पायंडा पाडला. अनंत दीक्षित यांनी कोल्हापूरच्या सार्वजनिक जीवनामध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले होते.त्याला व्यापक रूप द्यायला हवे होते ते त्यानिमित्त झाले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी अशा उपक्रमांना मोठी साथ दिली आणि प्रोत्साहन दिले. त्यांनी अधिक जबाबदारी घेऊन अशा पत्रकारांना बळ देऊन चांगल्या पत्रकारितेचा सतत गौरव होत राहिला पाहिजे. यासाठी त्यांचे बळ महत्वाचे आहे. सर्व पातळीवर अवमूल्यन होत असताना मूल्यात्मक बदलाचा आग्रह धरणारे काल-परवापर्यंत पत्रकार असलेले तथा संपादक असलेले लोक प्रयत्न करत होते. हे पुढील पिढीला कोणीतरी सांगितलेच पाहिजे. ते काम या सात मित्रवर्य पत्रकारांनी करून कोल्हापुरात एक वेगळा कार्यक्रम घडवून आणला. अनंत दीक्षित यांच्या स्मृती जागवताना पत्रकारितेचे वलय केवळ मिरवण्यापुरते नाही तर समाजाबरोबर चालण्यासाठी या माध्यमाचा उपयोग अधिक व्यापकपणे कसा करता येऊ शकतो याची चर्चाही या निमित्ताने झाली हेही कमी नव्हे..!

Leave a reply to Nandu gurav उत्तर रद्द करा.