उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शिवाजी पार्कच्या मैदानावर बोलायला उभे राहतात तेव्हा समोर लाखोंचा जनसमुदाय असतो. तो सर्वसामान्य मराठी माणूस असतो. त्या मराठी माणसांची निराशा करू नका. हा केवळ शिवसेनेचा किंवा मनसेचा प्रश्न नाही. मुंबई महापालिकेत सत्ता आणण्याचा प्रश्न नाही. मुंबई ही महाराष्ट्राची आहे आणि मुंबई ही मराठी माणसांची आहे. हे दाखवून देण्याचा हा शेवटचा प्रयत्न असेल. जर हा प्रयत्न यशस्वी झाला नाही तर मुंबई महाराष्ट्रात असली तरी ती मराठी माणसांच्या हातून निसटली असाच त्या निवडणुकीचा अर्थ असणार आहे.

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा, यासाठी मोठा संघर्ष मराठी जनतेने केला आहे. ही महानगरी सहजासहजी महाराष्ट्राला मिळाले नाही किंबहुना मिळू द्यायची नव्हती. मुंबई महाराष्ट्राला मिळण्यासाठी संघर्ष दिलेल्या मध्ये सर्वात मोठा वाटा मुंबईतल्या कामगार वर्गाचा होता. जो कामगार वर्ग कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून पोट भरण्यासाठी मुंबईमध्ये आला होता. त्याचा सुद्धा खूप मोठा इतिहास आहे. पण त्यावर सविस्तर परत कधीतरी वेगळे लिहिले जाईल.

छाया: Sailko/Wikimedia

कारण हा सर्व समाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या वंशावळीतील आहे. देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र मिळाले. त्याबरोबर द्विराष्ट्र कल्पना मांडणारे वीर सावरकर आणि नंतरच्या काळामध्ये तिला उचलून धरणारे मोहम्मद अली जिना हे बाजूला पडले असले तरी संविधान सभेच्या निमित्ताने तयार झालेली संसद किंवा संविधान सभा राज्याच्या पुनर्रचनेबद्दल सावध झाli होती. याचे कारण मुख्यतः भारत- पाकिस्तान फाळणी होताना उसळलेला हिंसाचार आणि त्यामध्ये मारले गेलेले लाखो लोक यांनी तत्कालीन सर्वच राजकीय नेत्यांचे मनोधैर्य खचले होते. एकीकडे साडे पाचशे संस्थानिकांचे संस्थान खालसा करण्याच्या तयारीत असतानाच काश्मीरचा विषय महाराजा हरिश्चंद्र यांनी ताणून धरला होता. महाराष्ट्र मात्र मराठी भाषिकांच्या स्वतंत्र राज्यासाठी सगळ्यात पुढे होता. तत्पूर्वी मुंबई प्रांत म्हणून ज्याला ओळखला जात होता तो प्रांत त्रिभाषिक होता. मुंबईसह कोकण किनारा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश हा भाग मराठी भाषिक होता. उत्तर कर्नाटकातील चार जिल्हे मुंबई प्रांतात होते ते प्रामुख्याने कानडी होते आणि सौराष्ट्र कच्च वगळता संपूर्ण आत्ताचा गुजरात मुंबई प्रांतात येत होता अगदी माउंट आबूपर्यंतचा भाग या मुंबई प्रांतात होता. त्या भागातील सर्व लोक बहुसंख्येने गुजराती भाषिक होते. त्या अर्थाने मुंबई प्रांत हा त्रैभाषिक होता.

महाराष्ट्रातील मराठी विरुद्ध गुजरात मधील गुजराती भाषिक असा संघर्ष भेटला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला विरोध करताना मुंबई आपल्याला हवी असा प्रयत्न गुजरातचे नेते करीत होते. याउलट गुजराती भाषिकांचे स्वतंत्र गुजरात राज्य व्हावे याला संयुक्त महाराष्ट्राचा नेहमीच पाठिंबा होता. या सर्व कालखंडामध्ये १९५२ ते ५७ गुजरातचे नेते मोरारजी देसाई मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते. पण या मंत्रिमंडळात मराठी भागाचे वर्चस्व होते. त्यांचे नेतृत्व भाऊसाहेब हिरे आणि यशवंतराव चव्हाण करीत होते. वास्तविक मार्च १९५२ मध्ये झालेल्या मुंबई प्रांताच्या विधानसभा निवडणुकीत मोरारजी देसाई निवडूनच आले नव्हते. त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील मालेगावचे भाऊसाहेब हिरे हेच मुख्यमंत्री होणार अशी अटकळ होती. पण जेष्ठतेच्या नात्याने मोरारजी देसाई नेतेपदाच्या निवडणुकीत उतरले आणि बहुसंख्य जणांनी त्यांना पाठिंबा दिल्याने भाऊसाहेब हिरे यांची संधी हुकली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर भाऊसाहेब हिरे या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणे मराठी माणसासाठी लाभदायक ठरले असते. कारण या सर्व कालखंडामध्ये भाऊसाहेब हिरे यांनी संपूर्ण मराठी मुलखात फिरून संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रयत्न करीत होते. जाहीरपणे भूमिका घेणारे ते एकमेव काँग्रेसचे नेते होते.              

मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करताना गुजरातला लागून असलेला डांग विभाग कोणाकडे जाणार याचा याची चर्चा चालू होती. त्याच वेळेला बेळगाव, कारवार, निपाणी. खानापूर, सांगली, मिरज, कवठेमंकाळ, जत, शिरोळ, इचलकरंजी आजरा या भागावर कर्नाटकातल्या संयुक्त राज्य समितीने दावा सांगितला होता. या पेक्षा गुंतागुंतीचा प्रश्न मुंबईचा झाला होता. मुंबई ही बहुभाषिक महानगरी आहे. देशाची आर्थिक राजधानी ती होऊ शकते. मुंबईची जगभर ओळख आहे. त्यामुळे मुंबई गुजरात किंवा महाराष्ट्राला न देता स्वतंत्र ठेवावी या मताचे पंडित जवाहरलाल नेहरू तत्कालीन पंतप्रधान होते. त्यांनी तशा प्रकारची घोषणा १६ जानेवारी १९५६ रोजी करून देखील टाकली होती मुंबई केंद्रशासित प्रांत असेल आणि गुजरात आणि महाराष्ट्र अनुक्रमे गुजराती आणि मराठी भाषिकांचा प्रांत असेल असे जाहीर केले होते. मुंबईचे काँग्रेसचे नेते स. का. पाटील आणि तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे देखील मत ती स्वतंत्र स्वतंत्र रहावी असेच होते. या मागणीच्या आडून मोरारजी देसाई ती गुजरातला मिळावी, असा प्रयत्न करीत होते. महागुजरात परिषदेचे नेते के. एन. मुन्शी यांनी गुजराती भाषिकांचे स्वतंत्र राज्य असावे आणि मुंबई महाराष्ट्राला मिळावी, अशी मागणी करीत होते वास्तविक १९५१ च्या जनगणनेनुसार मुंबईमध्ये ४८ टक्के लोक मराठी भाषिक होते आणि केवळ १८ टक्के गुजराती होते गुजराती भाषिक होते. त्यामुळे गुजरातचा तसा दावा फोल ठरत होता. यादरम्यान मुंबई महापालिकेच्या दिनांक २९ जानेवारी १९४९ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत आचार्य प्र. के. अत्रे आणि आर. डी भंडारे यांनी एक ठराव मांडला होता. तो ठराव म्हणतो की “भाषेच्या तत्त्वावर मुंबई राजधानी असलेला महाराष्ट्र प्रांत ताबडतोब बनविला जाणे इष्ट आहे. असे या महापालिकेचे विचारपूर्वक मत झाले असून या मताची ताबडतोब अंमलबजावणी करावी, असे मुंबई सरकारमार्फत भारत सरकारला कळवावे अशी विनंती मेयर साहेबांस करण्यात येत आहे.” या ठरावाला श्री.डायाभाई पटेल आणि विठ्ठलराव गांधी यांनी उपसूचना मांडली. ती अशी होती ” देशाच्या व्यापक हिताकडे लक्ष देऊन मुंबई ही राजधानी असलेला आणि भाषा तत्त्वावर उभारलेला महाराष्ट्र प्रांत बनवण्याच्या प्रश्नांचा विचार बेमुदत तहकूब करावा. “

हा सारा इतिहास आज मांडण्याचे कारण की, मुंबईसह महाराष्ट्रातील एकोणतीस महापालिकेच्या निवडणुका येत्या चार महिन्यात होणार आहेत. त्याशिवाय चौतीस पैकी बत्तीस जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. शिवाय सुमारे अडीचशे नगरपरिषद आणि पंचायतींच्या निवडणुका देखील होऊ घातलेल्या आहेत. यामधील सर्वात महत्त्वाची महापालिका म्हणजे मुंबई महापालिका याच्यासाठी आहे की, या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. ही महापालिका देशातील सर्वात श्रीमंत महापालिका मानली आहे. सुमारेत ६६ हजार कोटी रुपयांचं अंदाजपत्रक या महापालिकेचे आहे. मुंबई शहर देशाच्या राष्ट्रीय सकल उत्पन्नामध्ये सहा टक्के वाटा उचलते. महाराष्ट्राचा राष्ट्रीय सकल उत्पन्नामध्ये चौदा टक्के आहे. त्यापैकी केवळ मुंबईचे उत्पन्न हे सहा टक्के आहे. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्राचे राष्ट्रीय सकल उत्पन्नामधील वाटा हा आठ टक्के होतो. इतके महत्त्व मुंबईला आहे. कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे या मायानगरीमध्ये रिझर्व बँक आहे, शेअर बाजार आहे. भारतातील सर्वात मोठा चित्रपट उद्योग आहे. त्यामुळे मुंबईला खूप महत्त्व आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये बहुमताने जिंकायची असा प्रयत्न भारतीय जनता पक्ष प्रथमच करून पाहणार आहे. कारण मुंबईमध्ये शिवसेनेला किंवा काँग्रेसला जे महत्त्व आहे. ते भारतीय जनता पक्षाला कधीही किंबहुना इतर कोणत्याही पक्षाला महत्त्वाची भूमिका बजावता आलेली नाही. अडीच वर्षांपूर्वी जेव्हा शिवसेनेमध्ये फूट पडली त्यानंतर होणारी मुंबई महापालिकेची ही पहिलीच निवडणूक असणार आहे. मुंबई बरोबरच ठाणे जिल्हा आणि परिसरातील सात महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या सर्व भागांमध्ये शिवसेनेचे वर्चस्व पुर्वी होते आणि आजही शिवसेना हा महत्त्वाचा पक्ष असणार आहे. पण विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मोठा पक्ष म्हणून आज तरी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि त्यांचे चुलत बंधू राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे यांची युती होईल का…? याची चर्चा जोरदार सुरू आहे. काही नेत्यांनी यावर सकारात्मक प्रतिक्रिया देखील व्यक्त केलेली आहे आणि ही युती आता अटळ आहे .अशा स्वरूपाचे वक्तव्य देखील केले आहे.

मनसेचे संस्थापक राज ठाकरे काय भूमिका घेतात याच्यावर सर्व काही अवलंबून आहे. असे म्हणण्याचे कारण की, त्यांच्या भूमिकेमध्ये अनेक वेळा सातत्य राहत नाही. सध्या तरी ते भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत सुटले आहेत. लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीमध्ये *लाव रे तो व्हिडिओ* हा त्यांचा प्रचार मोठ्या प्रमाणात चालला होता. तो अत्यंत प्रभावी होता .नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना विविध प्रश्नावर घेतलेली भूमिका आणि पंतप्रधान झाल्यानंतर घेतलेले निर्णय आणि त्याचे समर्थन याच्यातील विरोधाभास ते मांडत होते. मात्र त्या निवडणुकीत त्याचा फारसा परिणाम झाला नाही. भारतीय जनता पक्ष – शिवसेना युतीलाच भरघोस यश मिळाले. २०२४ ची लोकसभा निवडणूक न लढवता भारतीय जनता पक्षाला मदत होईल. अशा प्रकारचीच भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांच्या भूमिकेत सातत्य नसल्याने मनसेच्या वाढीला मर्यादा आल्या. राज ठाकरे हे उत्तम पद्धतीने एखादे नियोजन करतात. त्याचे उत्तम सादरीकरण करतात. पण त्याच्यासाठी जो राजकीय संघर्ष करण्याची तयारी लागते ते मात्र ते करीत नाहीत. त्यांची सर्व सादरीकरणे ही जणू आपण सत्तेवर येणार आहोत आणि आल्यानंतर आम्ही काय करू इच्छितो अशा स्वरूपाची प्रश्न असतात. उत्तरांसह असतात.विविध प्रश्नांवरती उत्तरे तयार असावीत, हे मान्य जरी असले तरी आपणास सत्ता मिळणार आहे का..? याचे उत्तर जेव्हा नकारात्मक आहे. तेव्हा विविध प्रश्नावरील उत्तरांचे करायचे काय..? त्याऐवजी विविध प्रश्न उपस्थित करून सरकारच्या विरोधात किंवा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात असंतोष निर्माण करणे, हे महत्त्वाचे असते. १९९० ते ९५ या काळामध्ये शरद पवार यांच्या विरोधात गोपीनाथ मुंडे यांनी उभा केलेले वादळ हे त्या स्वरूपाचे होते. काँग्रेसअंतर्गत तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव विरुद्ध मुख्यमंत्री शरद पवार असा तंटा चालू होता. शरद पवार यांच्यावर जोरदार वार होत होते. त्याचा उत्तम उपयोग गोपीनाथ मुंडे यांनी प्रचारासाठी केला आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला. प्रथमच काँग्रेस केवळ ऐंशी जागा जिंकून सत्ता गमावून बसावे लागले.

आत्ता मुंबई महापालिका जिंकायची असेल तर शिवसेना आणि मनसे या दोन ठाकरे बंधूंनी एकत्र येणे महत्त्वाचे ठरणार आहे. तो निर्णय या महापालिकेच्या निवडणुकीसाठी निर्णायक ठरेल. कारण महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या मनामध्ये या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, अशी सद्भावना आहे. भाजप आणि शिंदेसेना यांना टक्कर देण्याची ताकद मुख्यतः शिवसेनेकडेच आहे. त्याला मनसेचे बळ मिळाले तर अधिक जोमाने निवडणुका होतील. शिवाय काँग्रेसला मदतीला घेतले तर स्पष्ट बहुमतात सुद्धा ही निवडणूक जिंकू शकतील. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा मुंबईमध्ये पूर्वीही प्रभाव नव्हता आणि आजही नाही. वंचित विकास आघाडीचा प्रभाव काही भागात असला तरी सुद्धा दोन ठाकरे एकत्र आल्याने मुंबई ही महाराष्ट्राची आहे आणि महाराष्ट्र मुंबईत आहे. हे दाखवून देण्याची संधी मिळणार आहे. वर ज्याप्रमाणे मुंबई गुजरातला मिळावी की महाराष्ट्राला मिळावी यासाठी झालेला झगडा इतिहासाच्या पानापानामध्ये नोंदवला गेलेला आहे. तो आपण पाहिला आहे, असे असताना मुंबईची आर्थिक नाडी बिगर मराठी माणसांच्या हाती जात असताना राजकीय सत्ता ताब्यात ठेवणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळेच हा प्रश्न उपस्थित करावासा वाटतो की, मुंबई महाराष्ट्राची आहे का, मुंबईत महाराष्ट्र आहे. आर्थिक आघाडीवर नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल शेअर मार्केटमध्ये बिगर मराठी लोकांचे वर्चस्व आहे. हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये देखील मराठी लोकांचा वाटा खूपच कमी आहे. आणि मराठी चित्रपट सृष्टीची नोंद घ्यावी अशी परिस्थिती सुद्धा नाही. त्या तुलनेने दक्षिणात्य सर्व भाषिक चित्रपट व्यवसाय जोरदार चालू आहे. किंबहुना ते हिंदी चित्रपट सृष्टीला सडेतोड उत्तर देत असतात.

मुंबईत शिवसेना टिकवून ठेवायची असेल आणि मराठी माणसांचे राज्य राहावे, असे वाटत असेल तर शिवसेना आणि मनसेला एकत्र येण्याशिवाय पर्याय दिसत नाही. उद्धव ठाकरे यांनी (शुक्रवार 6 जून रोजी) देखील एक वक्तव केले आहे की,याची चांगली बातमी लवकरच तुम्हाला मिळेल. असे पत्रकारांना सांगितले. आमची काहीच अडचण नाही, असेही ते नेहमी बोलतात. मात्र राज ठाकरे खरेच भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उभे राहणार आहेत का..? की भारतीय जनता पक्षाबरोबर युती करताना जादा जागा पदरात पाडून घेण्यासाठी दबाव निर्माण करीत आहेत? हे अद्याप स्पष्ट होत नाही. कारण हा राजकारणाचा जितका खेळ आहे, तितकाच तो अर्थकारणाचा देखील महाजुगाड आहे. अखेर या दोन्ही ठाकरेंना एकत्र येऊ द्यायचं की नाही याचा बराच निर्णय घेण्याची क्षमता केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपकडे देखील आहे. हा सर्व दबाव जुगारून मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे. “शीर जरी उडाले, तरी धड लढत राहील..!” अशी भाषा वापरीत निर्धार मराठी नेत्यांनी केला होता. त्या काळामध्ये मुंबईसाठी लढा दिलेला आहे. मुंबई महानगरी हे महाराष्ट्राच्या धडावरील शीर आहे. मुंबई शिरस्थान आहे असे म्हटले जात होते. शिर जरी कापून तुम्ही नेला तरी धड म्हणजे शरीर अखेरपर्यंत लढा देईल, असे उद्गार संयुक्त महाराष्ट्र होण्याच्यापूर्वी नायगाव मध्ये नवरात्रीच्या निमित्ताने झालेल्या प्रचंड सभेत मराठी नेत्यांनी काढले होते.

या सर्व इतिहासाची उजळणी ठाकरे बंधूंनी करण्याची गरज आहे. मुंबईतील धारावी झोपडपट्टी पुनर्रचनाचा प्रकल्प सुमारे एक लाख कोटीचा आहे. तो ज्या पद्धतीने एका परकीय कंपनीकडून काढून घेऊन अदानी ग्रुपला देण्यात आला. तसे पाहिले तर मुंबईचे सर्व अर्थकारण महाराष्ट्र राज्याच्या आणि मराठी माणसांच्या हातून निघून जाण्याचा धोका मोठा आहे. यासाठी आत्ता ठाकरे बंधू काय निर्णय घेतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मराठी माणसांचा कस लागणार आहे. परंतु अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. यासाठी मुंबईतील मुरल्या सुरल्या मराठी माणसांनी या ठाकरे बंधूंची कॉलर धरून सांगितले पाहिजे की, हातात हात घाला अन्यथा तुम्हाला आम्ही स्वीकारणार नाही. असे ठणकावून सांगायला पाहिजे. आजही उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे शिवाजी पार्कच्या मैदानावर बोलायला उभे राहतात तेव्हा समोर लाखोंचा जनसमुदाय असतो तो सर्वसामान्य मराठी माणूस असतो. त्या मराठी माणसांची निराशा करू नका. हा केवळ शिवसेनेचा किंवा मनसेचा प्रश्न नाही. मुंबई महापालिकेत सत्ता आणण्याचा प्रश्न नाही. मुंबई ही महाराष्ट्राची आहे आणि मुंबई ही मराठी माणसांची आहे. हे दाखवून देण्याचा हा शेवटचा प्रयत्न असेल. जर हा प्रयत्न यशस्वी झाला नाही तर मुंबई महाराष्ट्रात असली तरी ती मराठी माणसांच्या हातून निसटली असाच त्या निवडणुकीचा अर्थ असणार आहे. यासाठीच मुंबई महापालिकेमध्ये आचार्य प्र.के.अत्रे यांनी आणि आर.डी. भंडारे यांनी मांडलेल्या ठरावाला पटेल आणि गांधी या दोन गुजराती माणसांनी कशा प्रकारची उपसूचना मांडली होती. हे समजून घेणे त्याचा मतितार्थ समजून घेणे आज ही आवश्यक आहे.

१०८ हुतात्मे आठवा

पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरू यांनी १६ जानेवारी १९५६ रोजी मुंबई गुजरात आणि महाराष्ट्र अशा तीन राज्यांची निर्मिती होईल असे जाहीर केले मुंबई ही केंद्रशासित प्रदेश असेल असे म्हटले गेले त्याचा भडका उडाला आणि १६ ते २१ जानेवारी पर्यंत मुंबईमध्ये प्रचंड दंगा उसळला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १०८ लोक मृत्यू पावले. त्यांची स्मृती आजही हुतात्मा पार्क आपल्याला जाणीव करून देत असते.

3 प्रतिसाद ते “मुंबई महाराष्ट्राची की महाराष्ट्रात..?”

  1. आपली मांडणी योग्य आहे,

    लोकांनी सारासार विचार करणे गरजेचे आहे

    Like

  2. कृष्णा दिवटे अवतार
    कृष्णा दिवटे

    आज महाराष्ट्रात सत्तेत आहे त्यांची दशा आणि त्यामुळे दिशा जी आहे ते पाहिले तर मराठी माणूस आणि महाराष्ट्र ही लढाई हरेल असे वाटायला पुरेसा वाव आहे

    Like

Leave a reply to Vasant Bhosale उत्तर रद्द करा.

अभिलेख (Archives)