सुधाकर बडगुजर काय किंवा बबनराव घोलप काय यांच्यासारखे कितीही गंभीर गुन्हे असलेले लोक आमच्या पक्षात आले तरीसुद्धा चालतात. कारण जनतेने आता हिंदुत्व स्वीकारलेले आहे आणि हिंदुत्वासाठी भाजप व्यतिरिक्त कोणालाही जनता मतदान करणार नाही. हिंदुत्वाचा प्रयोग यशस्वी ठरलेला आहे, अशी घमेंड भारतीय जनता पक्षाला आलेली आहे का..? असा प्रश्न पडतो.

महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे राजकारण पाहिले तर या पक्षाकडे काही साधन सुचिता राहिली आहे की नाही..? असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी राजकारण करताना कोणतीही नैतिक पातळी सांभाळायची नाही असेच जणू काही अलिखित नियम तयार केला आहे. हा सर्व खटाटोप कशासाठी चालू आहे.. तर सत्तेसाठी चालू आहे. येनकेन प्रकारे सत्ता हातात ठेवायची यासाठी हा प्रयत्न चालू आहे का? ही सत्ता नेमके कोणासाठी चालवायची आहे? या सत्तेतून नेमकं साध्य काय करायचं आहे? या सत्तेतून लोकहिताची काही कामे करायचे आहेत का? नवा समाज घडवायचा आहे का? नवा भारत घडवायचा आहे का..?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अपेक्षित ठेवली तर त्याच्यामध्ये काही गैर आहे असे वाटत नाही. कारण १९७७ मध्ये जो जनता पक्षाचा प्रयोग केला होता. तो प्रयोग फसल्यानंतर १९८० मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. पूर्वासुरीचा अखिल भारतीय जनसंघ हा पक्ष संपुष्टात आलाच होता. तेव्हा नव्या भारतीय जनता पक्षाचे नेमके कोणते धोरण असावे. यासंदर्भातची संभ्रमावस्था होती. म्हणूनच गांधीवादी समाजवाद असा काहीतरी नसलेला तात्विक मुलामा या पक्षाने आपल्या धोरणांना देण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा आणि आत्ताच्या भारतीय जनता पक्षाचा काही संबंध असला तरी तो एक मोठा मुद्दा त्या काळात होता. आणि भारतीय जनता पक्षाला नेमके कोणते धोरण स्वीकारावे याचा गोंधळ उडून गेला होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांच्याच अंगरक्षकांनी केली. ते अंगरक्षक शीख होते. पंजाबमध्ये खलिस्तानसाठी झालेल्या रक्तपाताची त्याला पार्श्वभूमी होती. अमृतसर येथील सुवर्ण मंदिरावर लष्करी कारवाई करून खलिस्तानवाद्यांचा बिमोड करण्यात आला होता. तो राग मनात धरून इंदिरा गांधी यांची हत्या घडवून आणण्यात आला. त्यासाठी त्यांच्या अंगरक्षकांमधील शीख सुरक्षा रक्षकांना हाताशी धरण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. तेव्हापासून गोंधळात असलेल्या भारतीय जनता पक्षाने एनकेन प्रकारे सत्ता मिळण्याचा निर्णय घेतला आणि राम मंदिर, हिंदुत्व, मुस्लिमद्वेष आधी विषय हाताळत सत्तेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. अलीकडच्या काळामध्ये तर भाजपने राजकारणाची कोणतीही पातळी ठेवलेली नाही. काही करून सत्ता मिळवणे त्यासाठी वाटेल त्या थराला जाणे, भ्रष्टाचार करणे आणि करणाऱ्यांना जवळ करणे. हे सर्व गोष्टी त्यांनी चालू ठेवलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्ष मध्यवर्ती भूमिकेत आल्यानंतर त्यांचं जे वर्तन आहे ते पाहिल्यानंतर महाराष्ट्राची ही परंपरा अशी होती का..? असा प्रश्न पडावा इतकी वाईट राजकीय वाटचाल महाराष्ट्राला घालून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेच्या मदतीने भारतीय जनता पक्षाने आपला विस्तार केला. वेळ येताच शिवसेनेलाही त्यांनी सोडचिठ्ठी दिली. दोन अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेमध्ये फूट पाडण्याचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील एक गट आपल्याकडे घेण्याचा निर्णय घेतला. त्याला कोणतेही नैतिक अधिष्ठान नव्हते. किंबहुना या दोन्ही पक्षातील नेत्यांना ब्लॅकमेल करून आपल्याकडे ओढून घेतले आहे. त्यांच्या राजकीय व्यवहारांच्या फायली आणि आर्थिक गैरव्यवरांच्या फायली तयार ठेवून भीती घालून आपल्या पक्षाबरोबर आघाडी करण्यास भाग पाडले. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आघाडीवर होते. तेच आता राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सत्तेत बसलेले आहेत.
हा सर्व पाढा वाचण्याचे कारण हे की, काही दिवसापूर्वी नाशिकचे शिवसेनेतून हकालपट्टी केलेले उद्धव ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. बडगुजर याच्यावर सार्वजनिक जीवनातील २९ वर्षात बावीस गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. शिवाय सर्वात मोठा गुन्हा त्यांनी सार्वजनिक जीवनाला काळीमा फासणारा काही वर्षांपूर्वी केला होता. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटामध्ये हात असलेला आरोपी सलीम कुत्ता याच्याबरोबर एका रंगेल पार्टीमध्ये नाचताना त्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता. सलीम कुत्ता हा आज देखील बॉम्बस्फोटाच्या आरोपामध्ये तुरुंगात आहे. तो मध्यंतरी पॅरोलवर सुटला होता. तेव्हा त्यांनी आयोजित केलेल्या एका पार्टीमध्ये हा सुधाकर बडगुजर त्याच्याबरोबर नाचत होता. त्या प्रकरणावरून भारतीय जनता पक्षाने शिवसेनेवर टीकेची राळ उडवली होती. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः शिवसेनेवर प्रचंड टीका केली होती. सुधाकर बडगुजर याच्या प्रवेशाच्या वेळीच माजी मंत्री बबनराव घोलप यांना देखील भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. हे बबनराव घोलप महाशय शिवसेना – भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार १९९५ मध्ये सत्तेवर आले तेव्हा समाज कल्याण मंत्री होते. त्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये चर्मोद्योग महामंडळाच्या कारभारात गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्यांच्या आरोपानंतर चौकशी समिती नेमण्यात आली आणि त्या चौकशी समितीमध्ये दोष आढळून आल्यानंतर त्यांच्यावर खटलाही दाखल करण्यात आला. या गुन्ह्यामध्ये त्यांना तीन वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा झाली. असा गैरव्यवहार करून तो सिद्ध झालेला आणि गुन्हेगार ठरलेला शिक्षा भोगलेला नेता आज भाजपला प्रिय वाटतो आहे. बडगुजर काय किंवा बबनराव घोलप काय कशाही स्वरूपाचे कोणत्याही स्वरूपाचे कितीही गंभीर गुन्हे असलेले लोक आमच्या पक्षात आले तरीसुद्धा चालतात. कारण जनतेने आता हिंदुत्व स्वीकारलेले आहे आणि हिंदुत्वासाठी भाजप व्यतिरिक्त कोणालाही जनता मतदान करणार नाही. हिंदुत्वाचा प्रयोग यशस्वी ठरलेला आहे, अशी घमेंड भारतीय जनता पक्षाला आलेली आहे का..? असा प्रश्न पडतो.
एकेकाळी हवाला प्रकरणांमध्ये आरोप झाल्यानंतर देशाच्या उपपंतप्रधान पदाचा आणि गृहमंत्री पदाचा राजीनामा देऊन आरोपातून निर्दोष सुटका होईपर्यंत मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, असा निर्धार लालकृष्ण अडवाणी यांनी केला होता. लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी यांनीच पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या या पक्षाची आत्ताची हालत पाहिल्यानंतर यांना नैतिकतेशी काहीही देणे घेणे नाही, असाच व्यवहार आता होताना दिसतो आहे. महाराष्ट्रातील साखर उद्योगात गैर व्यवहार करणारे सारे आघाडीवर असलेले लोक आज भाजप बरोबर आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाजूला फेकलेले लोक आज भाजपमध्ये आश्रय घेत आहेत. भाजपमध्ये कोणीही प्रवेश घेतला तर त्याचे स्वागत त्यांचे स्वागत करताना भाजपच्या नेत्यांचा उर भरून येतो. त्यांना असे वाटते की, आपल्याला किती चांगले दिवस आलेले आहेत. एकेकाळी दोन चार टक्के मतांचा पक्ष म्हणून आम्हाला हिणवले जात होते. आज आम्ही कोणत्या पातळीवर आहोत हे पहा…! असेच जणू काही ते सर्वांना सांगण्यासारखा अविर्भाव करतात. अजित पवार यांच्यावर जलसंपदा खात्यातील गैरव्यवहाराबद्दल गाडीभर पुरावे देतो असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस आज त्यांच्याबरोबर एका मंत्रिमंडळात आहेत आणि अजितदादा म्हणतात की, आम्ही फुले शाहू आंबेडकर विचारांचे पाईक आहोत. यांना खरंच वाटते का सर्वसामान्य माणसाला काहीही थापा मारून सांगितलं तरी सर्व गोष्टी पटतात, असा त्यांचा समज आहे का? भारतीय जनता पक्षात तर इतका हमभाव तयार झालेला आहे की, आपण काही केलं तरी चालू शकतं. असंच त्यांना वाटते आहे. याच जागर सदरामध्ये काही आठवड्यापूर्वी असा प्रश्न उपस्थित केला होता की, गेल्या तीन विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष प्रथम क्रमांकावर येत असताना आणि तो बहुमताच्या जवळ जात असताना जे दोन पक्ष अंतर्गत लाथा लाथाल्याने बदनाम होत होते. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत होते. त्यांच्यामध्ये फूट पाडून त्या पक्षांच्या बरोबर सरकार स्थापनेची गरज काय होती..? ती गरज एवढ्यासाठीच होती की, धारावी प्रकल्पाचा ठेका कोणाला द्यायचा आणि तो ठेका घेण्यासाठी कोण उत्सुक होत..? याचा निर्णय व्हायचा होता. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार असताना हा ठेका एका सौदी अरेबियाच्या कंपनीला देण्यात येणार होता. तो दिलेला ठेका रद्द करायला लावून आपल्या मर्जीतील कंत्राटदाराला हा ठेका द्यायचा होता. याच्यासाठी सरकार बदलण्यात आलं आणि त्याच्यासाठी हवी ती तडजोड करण्यात आली. ज्यांना भ्रष्टाचारी म्हणून हिणवलं त्यांच्या गळ्यात गळे घालण्यात आले. हे सर्व महाराष्ट्रातील जनता पहात आहे. परवाच या धारावीच्या प्रकल्पासाठी वापरण्यात येणाऱ्या जमिनीचा स्टॅम्प ड्युटी देखील माफ करण्यात आला. कारण तो विकासाचा प्रकल्प आहे आणि त्याच्यासाठी स्टॅम्प ड्युटी घेऊन मोठे पाप करावे…? असे भाजपला वाटले. म्हणून ती माफ करण्यात आली. हे सर्व जे चालू आहे ते सर्व राजकारण महाराष्ट्र पाहतो आहे. महाराष्ट्रातील जनता पाहत आहे. भाजपाची ही राक्षसी महत्त्वाकांक्षा त्यांना एक दिवस खड्ड्यात घालणार आहे. महाराष्ट्रातली जनता विचारते आहे की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दिले होते. ते आश्वासन पूर्ण का केले जात नाही…? कर्जमाफीसाठी समिती स्थापन करून आता अभ्यास करण्यात येणार आहे आणि मग कर्जमाफीचा निर्णय घेणार आहेत. असे आत्ता सांगितले जात आहे. वास्तविक अशा प्रकारची समिती नेमणूक म्हणजेच कर्जमाफीच्या मागणीला नकार देणे असाच प्रकार आहे.
वसंतदादा घराण्याचे वर्तुळ पूर्ण झाले….!
महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या निवडक लोकांच्यामध्ये माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे स्थान खूप वरचे होते. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद चार वेळा भूषविले होते. राजस्थानचे राज्यपाल होते.अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस होते आणि विशेष म्हणजे स्वातंत्र्य सेनानी आणि शेतकऱ्यांचे नेते होते. त्यांनी महाराष्ट्रात सहकार चळवळ उभी केली आणि यशस्वीपणे राबवली देखील…! अशा वसंतदादा पाटील यांना राजकीय जीवनामध्ये पराभव हा कधी माहीतच नव्हता. त्यांचा वारसा चालवण्याच्या नावावर त्यांचे पुतणे विष्णू अण्णा पाटील चिरंजीव प्रकाश बापू पाटील आणि नातू मदन पाटील आणि प्रतीक पाटील यांनी जवळपास चाळीस वर्षे राजकारण करीत राहिले. पण दादांनी स्थापन केलेल्या कोणत्याही संस्था त्यांना नीट चालवता आल्या नाहीत. दादांनी कधीही काँग्रेसचा विषय विचार सोडला नाही. अनेक वेळेला काँग्रेसमध्ये अन्याय होत असताना काँग्रेस पक्षाशीच संघर्ष केला. ज्या पदावर ते गेले. ते पद त्यांनी कधीही पूर्ण मुदत संपेपर्यंत सांभाळलं नाही. जेव्हा संघर्ष करायची वेळ आली तेव्हा राजीनामा देऊन लोकांमध्ये गेले. पण लाचारी पत्करले नाही. काँग्रेसचा विचार अखेरपर्यंत जपला.
त्या दादांच्या नावावर जगणाऱ्या त्यांच्या वारसदारांच्यापैकी माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हा वसंतदादांसारख्या महान नेत्याच्या महान वारसा तो काय सांगायचा..? काँग्रेसने त्यांच्यावर अन्याय केला त्यामुळे त्या भाजपमध्ये गेल्या, असं सांगतात. यांचे कर्तुत्व काय म्हणून यांच्यावर अन्याय केला म्हणून तक्रार करीत आहेत? हे अजूनही समजलेले नाही. मदन पाटील राजकारणात सक्रिय असेपर्यंत या कधी घराच्या बाहेर देखील पडल्या नाहीत. त्यांच्या निधनानंतर राजकारणात येऊ लागल्या. कोणत्याही कामाचा अनुभव नसताना त्यांना सिंहासनावर बसवावे अशी त्यांची अपेक्षा होती. गेल्या वर्षी झालेली विधानसभा निवडणूक त्यांनी काँग्रेस विरोधात लढवली आणि त्याच तक्रार करताहेत की काँग्रेसने त्यांच्यावर अन्याय केला. त्यांनी स्वतः काँग्रेसवर अन्याय केला आणि त्यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेसच्या उमेदवाराचा सांगलीमध्ये पराभव झाला.
अशा जयश्रीताई पाटील यांना आता भाजपने आपल्या पक्षात घेऊन पवित्र केले आहे. हा भाजप प्रवेश काँग्रेसच्या अन्यायाच्या निषेधार्थ आहे की, आणखीन काही केलेल्या व्यवहारावर पडदा टाकण्यासाठी आहे हे लवकरच कळेल.

Leave a reply to संजीव साबडे उत्तर रद्द करा.