सर्वच राजकीय पक्षांनी पैशाचा वापर केला. पूर्वी देखील केला जात होता. पण भाजपने या निवडणुकीत केलेला वारेमाप पैशाचा वापर हा राजकीय सभ्यता उधळून लावणार होता.

महाराष्ट्रातील सर्वच महापालिकांच्या निवडणुका पहिल्यांदाच एकत्र पार पडल्या. निकाल जाहीर झाले. महापौर पदाचे आरक्षण आता जाहीर झालेले आहे. पुढील आठवड्यात महापौरांची निवड होईल आणि सर्वाधिक महापौर भारतीय जनता पक्षाचे होतील. याविषयी आता काही शंका राहिलेली नाही. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने झालेले राजकारण आणि लागलेले निकाल याचा अन्वयार्थ काय लावायचा असा प्रश्न पडतो तेव्हा आपण गोंधळून जातो आणि हाती काहीच लागत नाही असे देखील वाटते.

अशा पार्श्वभूमीवर एनडीटीव्हीचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांची पुण्यातील थिंक टॅंकचे विनायक पाचलग यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. या मुलाखतीतील मतांविषयी मतांतरे होऊ शकतील. पण राहुल कुलकर्णी हे एकमेव पत्रकार असावेत की, ज्यांनी महाराष्ट्रातल्या बहुतांश सर्व महापालिकांच्या निवडणुका चालू असलेल्या शहरांना भेटी दिल्या. तिथली राजकीय परिस्थिती समजून घेतली. तिथल्या घडामोडींचा वेध घेतला. अनेक सामान्य कार्यकर्त्यांशी बोलले. अनेक राजकीय कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. नेत्यांशी चर्चा केली. त्या त्या शहराची रचना, तेथील प्रश्न, त्या जिल्ह्याचे राजकारण, स्थानिक नेते, राजकीय परिस्थिती याचं उत्तम विश्लेषण त्यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाखतीला एक वेगळे महत्त्व प्राप्त होते. त्यांनी मांडले हे मुद्दे देखील खूप महत्त्वाचे आहेत. निकाल जो लागला तो आपण लोकशाही मार्गाने आलेला असल्यामुळे स्वीकारणे भाग आहे. त्यांच्या मुलाखतीकडे दोन भागात पाहता येईल.

एक भाग आहे की, राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने निवडणुका जिंकल्या. त्याचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत होते. त्यांच्या नेतृत्वाचे त्यांनी कौतुक केलेच आहे. शिवाय हा पक्ष राजकीय निवडणुकांना कसा सामोरे जातो. याच्याविषयी देखील त्यांनी भरभरून माहिती दिलेली आहे. त्याच वेळेला विरोधी पक्षांच्या भूमिका, त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांना मिळालेले यश याचे देखील उत्तम विश्लेषण त्यांनी केलेले आहे

मला त्यांच्या मुलाखतीतून खालील चार-पाच मुद्दे आवर्जून नोंद घेण्यासारखे वाटले की, ज्याच्यावर आपण अधिक चर्चा करणे आवश्यक आहे. शिवाय महाराष्ट्रातील या महापालिका असलेल्या शहरांची अवस्था काय आहे? याचा देखील आढावा घेतला पाहिजे. तो या मुलाखतीचा विषय नसला तरी निवडणुका आणि सत्तेची सूत्रे कोणाकडे जातात याला बरेच महत्त्व आहे. त्यांच्या मुलाखतीतील महत्त्वाचे निष्कर्ष असे आहेत.

१) महापालिका निवडणुका लढण्याची तयारी भारतीय जनता पक्षाने उत्तम पद्धतीने केलेली होती. २) भाजप हा सत्ताधारी पक्ष असल्यामुळे त्याने हवी तशी प्रभाग रचना करून घेतली होती. त्यामध्ये तोडफोड करून घेतली होती आणि त्यासाठी प्रत्येक प्रभाग रचनेत येणारा मतदार याचा अभ्यास केला होता. ३) भारतीय जनता पक्षाने इतर सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्ते आणि नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन विरोधकांच्या तलवारीची धार बोथट केली होती. ४) भाजपने महापालिका निवडणुका साम-दाम दंड वापरून लढवल्या. परिणामी त्यांना मोठी यश मिळाले. ५) सर्वच राजकीय पक्षांनी पैशाचा वापर केला. पूर्वी देखील केला जात होता. पण भाजपने या निवडणुकीत केलेला वारेमाप पैशाचा वापर हा राजकीय सभ्यता उधळून लावणार होता.

याशिवाय त्यांनी इशारा दिला आहे की, ज्या पद्धतीचे भेसुर चेहरे असलेले कार्यकर्ते नगराचे “सेवक” म्हणून निवडून आले आहेत. यातून आपल्या लोकशाहीचे भवितव्य काय असणार..? याच नगरसेवकांमधून उद्याचे नेते तयार होतील. ते आमदार आणि खासदार म्हणून अनुक्रमे विधिमंडळामध्ये आणि संसदेमध्ये जाऊन बसतील. तेव्हा त्या विधिमंडळाचा चेहरा कसा असेल…? असा प्रश्न पडतो, असे ते म्हणाले. आता निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये शोधून एखादा देखील सभ्य राजकीय नेत्याचा चेहरा म्हणून दिसत नाही. अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणुका पारदर्शी झाल्या काय याविषयी शंका घेतल्या जात असतील घेतल्या जात असल्या तरी ईव्हीएम मशीन मध्ये आरोप हा निरक्तक आहे. मुंबईमध्ये या मशीनचे प्रात्यक्षिक दाखवताना अधिकारी वर्ग. छाया: पी टी आय

मुलाखतीच्या सुरुवातीलाच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे खूप कौतुक केले आहे. शिवाय पुढील काही वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय दुसरा नेता असणार नाही. किंबहुना महाराष्ट्राचे राजकारण त्यांच्याभोवतीच फिरत राहील असे त्यांनी म्हटले आहे. भाजपामधील सत्ता स्पर्धेत देवेंद्र फडणवीस निश्चित पुढे आहेत. पक्षातील विरोधकांना त्यांनी बाजूला सारलेच आहे आणि पक्षाच्या विरोधकांना त्यांनी लुळे पांगळे करून सोडले आहे.

गेल्या आठवड्याच्या “जागर” मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा अन्वयार्थ शोधण्याचा प्रयत्न आपण केला होता. डांगे मोडले, आता ठाकरेंची पाळी..! असे आपण म्हटले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून मुंबई महाराष्ट्राला मिळाली पाहिजे यासाठी झालेला लढा. त्यातून महाराष्ट्रात सामील झालेली मुंबईतील मराठी माणसाचा टक्का…! मुंबई देशाची आर्थिक राजधानी असताना मराठी माणसाचा त्यातील वाटा…! अशा सर्वच बाजूने अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला होता. शिवसेनेचा जन्मच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर झाला आहे. मुंबईही मराठी माणसाची राहिली पाहिजे यासाठीच तो जन्म होता. शिवसेनेची लढाई ही मराठी माणसासाठी होती आणि त्या मराठी माणसांचा आता मुंबईतील प्रभाव किती राहिलेला आहे? हे देखील या निवडणुकीत स्पष्ट झाले. याबाबत राहुल कुलकर्णी यांनी केलेले विश्लेषण खूप महत्त्वाचे आणि योग्य पण आहे.

मराठी माणसाला वगळून मुंबईचे राजकारण करता येत नाही त्याचबरोबर केवळ मराठी माणसांच्या जीवावर देखील मुंबईचे राजकारण पूर्ण होऊ शकत नाही. हा सर्वच राजकीय पक्षांना एक प्रकारचा इशारा देण्यासारखा निष्कर्ष आहे. मराठी माणसांनी शिवसेनेला भरभरून मते दिली. पण तेवढ्याच मतावर महापालिका जिंकता येत नाही. हे आता लक्षात आले. बिगर मराठी लोकांच्या जीवावर मुंबईची सत्ता पूर्णपणे घेता येत नाही हे भाजपालाही स्पष्ट करून दाखवण्यात आलेले आहे. याचाच अर्थ मुंबईतील मराठी माणसांची राजकीय ताकद दिवसेंदिवस कमी होत जात आहे पण ती अद्याप पूर्ण संपलेली नाही. ती नजीकच्या काळात तरी ती पूर्ण संपेल, असे दिसत नसले तरी केवळ मराठी मतांच्या आधारे मुंबई महापालिका जिंकता येत नाही. त्याच वेळी मराठी मतदाराला नाकारून मुंबईच्या राजकारणाचे वर्तुळ पूर्ण करता येत नाही असा देखील इशारा देण्यात आलेला आहे

साम-दाम-दंड वापरून महापालिकेच्या निवडणुका जिंकायल्या. त्यापूर्वी नगरपालिकांच्या निवडणुका जिंकण्यासाठी असाच मार्ग अवलंबून गेला होता. पैसा, सत्ता आणि राजकीय तडजोडी करीत विरोधकांना नामोहरम करून सोडण्यात भाजपाला यश जरूर मिळालेले आहे. ते यश टिकवणे आणि ज्या हिंदुत्वाच्या नावाने भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणात पाय रोवले, त्याच्या पलीकडे जाऊन विकासाचे धोरण स्वीकारून ते अंमलात आणण्यासाठी राज्यकारभार करणे. अशी आव्हाने समोर उभी टाकलेली आहेत. महापालिकांच्या निवडणुका या मुख्यता मध्यमवर्गीय आणि शहरातील कष्टकरी वर्गांने निर्णय घेण्याचा विषय होता. ज्या प्रकारचे विकासाचे प्रारूप तयार करण्यात आले आहे. त्यातून महानगरांचे प्रश्न पूर्ण सुटतील किंबहुना नागरिकांचे जीवन सुसह्य होईल, अशी अपेक्षा करणे कठीण दिसते आहे. मात्र तसा प्रयत्न आम्ही करणार आहोत, असे प्रारूप उभे करण्यात भाजपला यश मिळालेले आहे. याचे कारण राज्यात आणि केंद्र केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. त्या सरकारच्या पत पुरवठ्यातून विकासाची कामे होतील असे चित्र उभे केले गेले. डबल इंजिनला थ्रीपल इंजिन करण्याचा प्रयत्न या निवडणुकीत झाला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निकालानंतर महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आनंद व्यक्त करताना भाजपचे आमदार मोहित कंबोज यांनी अशा पद्धतीने उचलून घेतले होते. छाया: X/mohitkamboj_

नंबर एकचा पक्ष
भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये नंबर एकचा पक्ष होण्यासाठी आणि सर्व पातळीवरील सत्ता केंद्रे आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी ज्या राजकीय तडजोडी केल्या. वेगवेगळ्या पक्षातील लोकांना त्यांचे चरित्र आणि चारित्र्य न पाहता सामावून घेतले. त्यांनाच उमेदवारी देण्यात आली. निष्ठावंतांना डावलण्यात आले. अशा सर्व नेत्यांच्या आधारे पुढील वाटचाल करायची आहे. पैशाचा अमाप वापराविषयी राहुल कुलकर्णी यांनी अनेक उदाहरणे दिली. अनेक मतदारांच्या घरांमध्ये जाऊन फ्रीज, प्रेशर कुकर, अन्य संसार उपयोगी साहित्य पाहिल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय त्यांनी दाखवले देखील आहे. पुण्यातील एका प्रभागात शंभर कोटी रुपये निवडणुकीवर उधळण्याचे उदाहरण त्यांनी सांगितले. महापालिकेच्या निवडणुकीसाठी इतका अमाप पैसा खर्च करून आणि मतदारांना भ्रष्ट करून निवडणुका जिंकून काय साध्य करणार आहोत…? त्यातून कोणत्या प्रकारची राजकीय संस्कृती निर्माण होते, असाही प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे. आता निर्विवाद समर्थन मिळाल्यानंतर सर्वच राजकीय नेत्यांनी पुढील वाटचाल करताना आपली राज्यकर्ता म्हणून प्रतिमा कशी असावी..? याचाही विचार करण्यात आला आहे. शरद पवार, विलासराव देशमुख किंवा आर आर आबा पाटील यांची त्यांनी उदाहरणे दिली. या नेत्यांनी राजकारण करीत असताना समाजातील विविध घटकांशी संवाद साधण्याची एकही संधी कधी दवडली नाही. किंबहुना साहित्य, संस्कृती, सांस्कृतिक क्षेत्रात, नाटक सिनेमांमध्ये आणि शिक्षण क्षेत्रामध्ये शेती तसेच तरुणांच्यामध्ये काय घडते आहे….! याचा वेध सातत्याने त्यांनी घेत आपली एक छबी उभी केली आहे. यापैकी शरद पवार आजही या गोष्टी करतात, हे त्यांनी जरूर सांगितले.

राजकारणाची पातळी
राजकारणाची पातळी घसरत चालण्याची नोंद करताना ही राजकीय संस्कृती महाराष्ट्राला परवडणारी नाही..हे देखील या मुलाखतीतील चर्चेवरून स्पष्ट होते, ज्याप्रकारचे भेसूर चेहरे निवडून आलेत. तसेच एक बेसूर राजकीय संस्कृती देखील उदयास येत आहे आणि ती पुढील काळासाठी धोकादायक ठरू शकते. हा इशारा फार महत्त्वाचा आहे.
महापालिकेच्या निवडणुका जिंकल्या जरूर पण यातून महाराष्ट्राचे भवितव्य काय असू शकते याचा विचार देखील आपल्याला करायला पाहिजे. कारण नगरपालिका आणि महापालिकांच्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांची महाराष्ट्रातील संख्या ही निम्मी आहे. त्यामुळे शहरीकरण यांचा विषय हा खूप गांभीर्याने घेण्याचा आहे. मात्र सर्वच राजकीय पक्षांनी गुंड पुंडांना उमेदवारी देऊन निवडून आणत असतील. त्यासाठी लागेल तेवढा पैसा खर्च करत असतील तर महाराष्ट्राची म्हणून किंबहुना महाराष्ट्र धर्माची संस्कृती म्हणून राजकारण होईल का..? तशी अपेक्षा ठेवावी का आणि त्यातून साध्य काय होणार याचा देखील विचार करणे आवश्यक झाले आहे. माझा महाराष्ट्र असा नव्हता अशी म्हणण्याची वेळ मतदारांच्यावर येणार नाही का..? याला मतदार देखील जबाबदार नाहीत का? मतदारांना सामुदायिकरित्या भ्रष्ट करून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रकार हा भारतीय जनता पक्षाने केला, असा सूरही या मुलाखतीत होता.

ही संस्कृती महाराष्ट्राला कुठे घेऊन जाणार आहे..? याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. या निवडणुकीत जे जे मार्ग अवलंबून निवडणुका जिंकण्यात आल्या पण त्यातून महाराष्ट्र आणि महाराष्ट्र धर्म हरला याची देखील नोंद या निमित्ताने झाली आहे. राहुल कुलकर्णी यांनी संपूर्ण महाराष्ट्र आडवा उभा पिंजून काढून केलेली मांडणी खूप महत्त्वाची आहे. ज्या राजकीय पक्षाला यश मिळाले त्याविषयी त्यांच्या संघटन कौशल्याबद्दल, निवडणुका लढवण्याच्या पद्धतीबद्दल शंका नाही, पण सर्वच राजकीय पक्षांनी याच मार्गाने जायचे ठरवले तर ही निवडणूक कधीही पारदर्शी होणार नाही. किंबहुना अशा निवडणुकांचा निकाल सत्ताधाऱ्यांच्याच बाजूने लागतील हे स्पष्ट होईल. सत्ताधारी जे करतात तीच पूर्व दिशा हे देखील पुढे येईल. सत्ता, सत्तेतून पैसा..! पैशातून पुन्हा सत्ता असे दुष्टचक्र निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी सर्वच राजकीय पक्षांना समान संधी देऊन मतदारांनी कौल द्यावा, अशा प्रकारच्या या निवडणुका राहिलेल्या नाहीत. हे देखील आता अधोरेखित झालेले आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मतमोजणीच्या वेळी झालेली उमेदवारांच्या प्रतिनिधींची गर्दी.. छाया: पी टी आय

काँग्रेसच विरोधक
काँग्रेस हाच आता सर्वर्थाने प्रमुख विरोधी पक्ष म्हणून समोर येण्याची अधिक शक्यता देखील आहे. मात्र त्यासाठी काम करण्याची तयारी दाखवली पाहिजे. इतर प्रादेशिक पक्षांचे भवितव्यता भारतीय जनता पक्षाच्या डावपेचांत लपलेले आहे. ती कशा पद्धतीची धोरणे प्रादेशिक पक्षांच्या भवितव्याविषयी राबवतील त्यावर त्या पक्षांचे कर्तव्य अवलंबून आहे. एकाच वेळेला स्वतःचा पक्ष सर्वोच्चस्थानी पोहोचेल आणि प्रादेशिक पक्षांना पण शह देता येईल. अशी केलेली खेळी भाजपच्या पत्त्यावर पडलेली आहे. त्यात यशस्वी झालेले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्राची वाटचाल कशी होईल याचा विचार आपण गांभीर्याने करायला पाहिजे. पुढच्या टप्प्यात महाराष्ट्रातील चौतीस जिल्हा परिषदेंपैकी बारा जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत. त्या देखील याच मार्गाने निकाल देतील का? निर्णायक ठरतील का…? याचाही आपण विचार करायला पाहिजे.

One response to “राजकारण जिंकले, महाराष्ट्र हरला..!”

  1. Good analysis.Marsthi influence is definitely diminishing on Mumbai.

    Like

Leave a reply to Prakash Patil उत्तर रद्द करा.

अभिलेख (Archives)