शहरातील घनकचरा गोळा केला जातो. पण त्यावर प्रक्रिया केली जात नाही. तो रचून ठेवला जातो. त्याचे आता डोंगर तयार झाले आहेत. हे कृत्रिम डोंगर केवळ महाराष्ट्राच्या शासन कर्त्यांच्या निष्क्रिय धोरणामुळे उभे राहिले आहेत. आणि ते आता कोसळून त्याच्या खाली माणसं मरू लागली आहेत. त्याची ही कहाणी आहे.

महाराष्ट्राला सह्याद्री पर्वतरांगांच्या डोंगरकड्याची नैसर्गिक देणगी लाभलेली आहे. या डोंगरकड्यांमध्ये महाराष्ट्राचा इतिहास घडला. याच डोंगरकड्या कपाऱ्यात नैऋत्य मान्सून पावसाचे आगमन होते आणि महाराष्ट्राला तृप्त करणारा उत्सव होतो. तो उत्सव आता सुरू आहे. यावर्षी मान्सून उशिरा आला. पण तो आला. तो कोसळतच आला. अनेक ठिकाणी तो तीन मिलिमीटर पडला .काही ठिकाणी तो दोन अडीच हजार मिलिमीटर एका आठवड्यात पडला. कोयना धरणामध्ये एका दिवसात आठ टीएमसी पाण्याचा साठा वाढला. असा हा डोंगरदर्यांचा महाराष्ट्र म्हणून आपली त्याच्याशी ओळख आहे.
अशा महाराष्ट्रामध्ये जे शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. वाढत्या शहरातील घनकचरा गोळा केला जातो पण त्यावर प्रक्रिया केली जात नाही. तो रचून ठेवला जातो. त्याचे आता डोंगर तयार झाले आहेत. हे कृत्रिम डोंगर केवळ महाराष्ट्राच्या शासनकर्त्यांच्या निष्क्रिय धोरणामुळे उभे राहिले आहेत. आणि ते आता माणसांवर कोसळून लागलेले आहेत. त्याची ही कहाणी आहे.
महाराष्ट्र हे देशातील वाढत्या शहरीकरणाच्या क्रमामध्ये दुसऱ्या स्थानी आहे. पहिले स्थान तामिळनाडूने मिळवलेले आहे. एकेकाळी तमिळनाडूतून मुंबईमध्ये लोक स्थलांतरित होत होते आणि दोन वेळच्या भुकेची गरज भागवत होते. मात्र अलीकडे तमिळनाडूने प्रादेशिक पक्षांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारांच्याकडून आपली उत्तम प्रगती करून घेतली. तमिळनाडूमध्ये दारिद्र्याचे प्रमाण केवळ सात टक्के आहे. औद्योगीकरण वेगाने वाढले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून तमिळनाडूचा उल्लेख केला जातो. त्या तमिळनाडूचे शहरीकरण ज्याला दुसऱ्या भाषेत नागरिकरण देखील आपण म्हणतो. ते 50 टक्क्याहून अधिक झाले आहे. त्याच्या पाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.

महाराष्ट्रामध्ये आता एकोणतीस महापालिका स्थापन झालेल्या आहेत. अलीकडे स्थापन झालेली महापालिका म्हणजे इचलकरंजीची आहे. याशिवाय जवळपास पावणे तीनशे नगरपालिका, नगरपंचायती आहेत. या सर्व नागरिक क्षेत्रांमध्ये राहणाऱ्या महाराष्ट्रीयन लोकांची संख्या अठ्ठेचाळीस टक्क्यांपर्यंत गेली आहे. अशा या वाढत्या शहरीकरणाचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास करणे अपेक्षित असते. ग्रामीण भागातील प्रश्न वेगळे आणि शहरातील प्रश्न अधिक वेगळे असतात. विशेषतः नागरी सुविधा पुरवणे ही महत्त्वाची जबाबदारी असते. महाराष्ट्राची स्थापना झाली. तेव्हाच मुंबईसारखे आंतरराष्ट्रीय शहर ही राजधानी होती आणि त्याच्या पाठोपाठ पुणे, पिंपरी- चिंचवड, नाशिक, ठाणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर ही शहरे वेगाने वाढू लागली. या शहरांच्या नागरिक सुविधांचे व्यवस्थापन मात्र अपेक्षेप्रमाणे झाले नाही. हे आपल्याला मान्य करावेच लागेल.
महाराष्ट्रासह देशभरात शहरी करणाच्या संदर्भात शास्त्रीय पायाच्या आधारे विकासाचे नियोजन नाही. वाढत्या शहरांसाठी वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, सांडपाण्याचे निर्गतीकरण, घनकचऱ्याचा उठाव आणि त्याच्यावर प्रक्रिया, खुल्या जागांचा विकास, शहरी क्षेत्राचे पर्यावरणीय संवर्धन. अशा अनेक प्रकारच्या नागरिक सुविधांचा विस्तार आणि विकास करण्याचे धोरण नाही. परिणामी हे प्रश्न जीवघेणे आणि गुंतागुंतीचे ठरले आहेत.
दोन आठवड्यापूर्वी पिंपरी – चिंचवड या महाराष्ट्रातील औद्योगिक शहराचा घनकचरा गोळा करून ठेवलेला डोंगर कोसळला आणि त्यामध्ये नऊ लोक मृत्युमुखी पडले. हा घनकचरा २६३ फूट उंचीच्या डोंगराएवढा झाला होता. पिंपरी -चिंचवड महापालिका क्षेत्रातून दररोज एकोणीस हजार टन घनकचरा गोळा करते. त्यावर प्रक्रिया करणारा “वेस्ट टू एनर्जी” नावाने एक प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. मात्र त्या प्रकल्पाकडून हा सारा घनकचरा प्रक्रिया होऊन ऊर्जा तयार केली जाऊ शकत नाही. असाच हा साचत आलेला कचरा गेल्या पस्तीस वर्षापासून डोंगरासारखा रचून ठेवण्यात आलेला आहे.
विषारी वायू
मान्सूनचा पाऊस जोरदार सुरू झाला आणि हे कचऱ्याचे डोंगर ओले चिंब झाले. त्या डोंगरांमध्ये पाणी मुरल्याने तो कचरा अधिकच बोजड झाला. त्याचा एक मोठा भाग या घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्यालयाच्या इमारतीवरच कोसळला. त्या कार्यालयामध्ये तेवीस कर्मचारी होते. त्या इमारतीमध्ये एक कॅन्टीन देखील होते. प्रचंड दुर्गंधी सुटलेला आणि अनेक वर्षे कुजत पडलेला हा कचरा कोसळल्याने अलीकडेच बांधण्यात आलेली ही इमारतच उध्वस्त झाली. त्यामध्ये हे काम करणारे कर्मचारी गुदमरून मरण पावले. त्या कचऱ्यामुळे अनेक प्रकारचे विषारी वायू तयार झाले होते. तो कचरा बाजूला करून मृतदेह काढणे देखील कठीण होत होते. खडकी कॅन्टोन्मेंटमधील कचरा देखील येथे चालून टाकला जात होता. त्यामुळे तेथील लष्करी तुकडीने देखील तातडीची मदत केली. तरी देखील कचऱ्याच्या ढिगार्याखाली सापडलेले मृतदेह काढायला तीन दिवस लागले. आपण अनेक वेळा डोंगर कोसळणे, दरडी कोसळणे अशा घटना पाहिल्या आहेत. पुणे जिल्ह्यातच आंबेगाव तालुक्यातील माळीन हे अख्खे गावच डोंगर कोसळल्याने नाहीसे झाले होते. पिंपरी – चिंचवड जवळील मोशी गावातील हा कचऱ्याचा डोंगर कोसळून एक नवीनच दुर्घटना आणि आव्हान समोर उभे राहिले आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक कचरा
महाराष्ट्रात दररोज २३ हजार ५२३ टन कचरा निर्माण होतो. उत्तर प्रदेश १९ हजार ५२१ टन प्रतिदिन कचऱ्यासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कर्नाटक, दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्येही मोठ्या प्रमाणावर कचऱ्यावर प्रक्रिया करणे बाकी आहे. महाराष्ट्रात सुरुवातीला ३ कोटी ८९ लाख टन कचरा साठलेला होता. जो देशातील सर्वाधिक होता. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्यातील जुना साचलेला कचरा (लेगसी वेस्ट) व्यवस्थापन प्रकल्प संथ गतीने पुढे सरकत असून, राज्यात अजूनही ८०३ एकर क्षेत्रावर २ कोटी ४२ लाख टन कचरा प्रक्रिया न होता पडून आहे. महाराष्ट्रात साचलेल्या कचऱ्याचे प्रमाण (लेगसी वेस्ट )सर्वाधिक असणे हे राज्याची कचरा संकलन व्यवस्था इतर राज्यांच्या तुलनेत अधिक सक्षम असल्याचेही द्योतक आहे. कचरा दीर्घकाळ पडून राहिल्यास तो माती आणि भूजल दूषित करतो.

सध्या राज्यात २२४ कचरा डेपो आहेत. त्यापैकी ६२ डेपोचे पुनर्वसन पूर्ण झाले आहे. त्याव्दारे ८५ लाख टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई येथे कचरा व्यवस्थापनाचे काम अपेक्षेपेक्षा मंद गतीने सुरू आहे. याउलट पुणे शहराने एकूण ७० लाख टन कचऱ्यापैकी ५७ लाख टन कचऱ्यावर प्रक्रिया पूर्ण केली आहे.
राज्यातील कचरा डेपोमधील मोठा हिस्सा असलेल्या मुंबई आणि ठाणे येथील अद्याप पूर्णपणे साफ झालेला नाही. बृहन्मुंबईत दोन देवनार आणि कांजूरमार्ग येथे ६० एकर क्षेत्रावर सुमारे ४७ लाख टन कचरा साठलेला आहे. उल्हासनगरमध्ये ६४ लाख टन कचऱ्यावर प्रक्रिया व्हायची आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये २३ एकर क्षेत्रावरील २३ लाख टन कचऱ्यापैकी १९ लाख टन कचरा अद्याप हटवायचा आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बारा लाख टन कचऱ्यावर अजून कोणतीही प्रक्रिया झालेली नाही. शहरांच्या बाहेरील मोकळ्या जमिनीवर अनेक दशकांपर्यंत कोणतेही नियमन किंवा नियंत्रण न ठेवता कचरा टाकला जातो. अशा ठिकाणांना लँडफिल्स म्हटले जाते. शहरीकरणामुळे ही ठिकाणे आता शहरांच्याच हद्दीत आली आहेत. या दीर्घकाळ साचलेल्या कचऱ्याला ‘लेगसी वेस्ट’ म्हणतात. पिंपरी-चिंचवडचा मोशी येथे असा कचरा साजून तयार झालेला डोंगर कोसळला.
मोठी समस्या समोर उभी
महाराष्ट्रातील सध्याचे राजकीय वातावरण असे नव्याने उभे राहिलेल्या समस्या समजून घेण्याचे राहिलेलेच नाही. शहरीकरणातील ही एक मोठी समस्या समोर उभी आहे. नुकतेच महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन संपले त्याचवेळी ही घटना घडली मात्र याची गांभीर्याने चर्चा करण्यात आली नाही केंद्र सरकारने सुरू केलेल्या स्वच्छता अभियान मोहिमे अंतर्गत आजवर साचलेला कचरा साफ करण्यातच यश आलेले नाही त्याच कचऱ्यामध्ये त्याच डोंगरावर दररोज शेकडो टन कचऱ्याची भर पडती आहे. नागरिकांचे मूलभूत प्रश्न न सोडवता त्यांना जात धर्म किंवा भाषा अशा भावनिक विषयात गुंतवून राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम करण्यात येत आहे.

यावर आपले मत नोंदवा