“इस सरकार में इस्तीफे नहीं होते” म्हणणाऱ्यांचा माज मातीत मिळाला! जे कालपर्यंत गर्वाने आणि अहंकाराने बरळत होते की, “या सरकारमध्ये राजीनामे देण्याची प्रथा नाही”, त्यांना देशातील तरुण तरुणींनी तसेच विद्यार्थ्यांच्या एकजुटीच्या दणक्याने त्यांची जागा दाखवून दिली आहे!

जागर सदरात गेल्या पाच जुलै रोजीच ‘देशाला सत्तांतराची गरज’ या शीर्षकाखाली लिहिण्यात आले होते की, देशातील लोकशाहीची अवस्था पाहता ती टिकणार नाही. राजकीय पक्ष ज्या पद्धतीने फोडले जात आहेत. त्यांना अवैध मार्गाने मान्यता दिली जात आहे. निवडणुका ज्या पद्धतीने होत आहेत, ते पाहता ही लोकशाही पद्धत राहिलीच नाही. भ्रष्टाचार आता उघडपणे केला जात आहे. कंत्राटदार थेट आरोप करीत आहेत की ५६ टक्के रक्कम वाटण्यात जाते. तेथे विकास कामे कोणत्या दर्जाची होतील?
अशा पार्श्वभूमीवर वातावरण तापत गेले. नीटच्या परीक्षेची प्रश्न पत्रिका फुटण्याचे प्रकरण कारणीभूत ठरले. राजकारणी आणि नोकरशाह यांची मोठी साखळी आहे. त्याला स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या एजन्सीने घेरले आहे. ज्यांना ज्यांना याप्रकरणी अटक झाली त्यांची नावे, त्यांची पदे आणि त्यांनी बजावत असलेली भूमिका पाहिल्यानंतर ही सगळी व्यवस्था कशी सडलेली आहे. हे समोर आले. अनेक जण आपल्या स्पर्धा परीक्षा केंद्राचे नाव उज्वल व्हावे, म्हणून पेपर फोडून मुलांना पास करून आणत होते. यासाठी श्रीमंत आणि उच्च शिक्षित पालक हवा तेवढा पैसा मोजायला तयार होते. त्यातूनच ही सर्व साखळी तयार झाली आणि त्याचा स्फोट नीट परीक्षेचे पेपर फुटण्यापर्यंत झाला.
सत्तांध मंडळी इतकी बेदरकार झाली आहेत की, त्यांनी काहीही बोलले तर चालते असा समज करून घेतलेला आहे. मी सत्तांध म्हणतो तेव्हा केवळ आमदार किंवा खासदारांना उद्देशून नाही तर या देशातील प्रचंड मस्तवाल अशी नोकरशाही आणि न्यायपालिकेतील अधिकारावर बसलेली व्यक्ती त्यांचाही याच्यामध्ये समावेश होतो. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी ज्या पद्धतीने सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा उल्लेख झुरळ म्हणून केला आणि त्यावर ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्यातून ही खदखद कुठे पर्यंत खालवर रुजलेली होती. हे आपल्या लक्षात येईल.

केंद्र सरकार असो किंवा विविध राज्यातील सरकार असोत त्या ठिकाणी ज्या पद्धतीने राज्यकारभार चाललेला आहे. ते पाहिल्यानंतर भ्रष्टाचार हा आता औपचारिक भाग झालेला आहे. कोट्यावधी रुपयांची सरकारी कामे मिळवून भ्रष्टाचार करायचा किंबहुना विकासाच्या नावाखाली विविध प्रकारचे प्रकल्प उभे करायचे, त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात रक्कम मंजूर करून घ्यायच्या, या प्रकल्पाची कंत्राटे वाटून घ्यायची. अशा पद्धतीने कारभार सर्वत्र चालू आहे. याचा अनुभव अनेकांना येतो. पण व्यवस्था बदलता येत नाही म्हणून त्या व्यवस्थेबरोबर राहणे अनेक जण पसंत करतात. जे पसंत करत नाही ते टिकत नाही आणि ज्यांना कोणत्याही मार्गाने पैसाच मिळवायचा आहे ते या व्यवस्थित प्रवाही होऊन जातात.
दिल्लीत जंतर-मंतरवर जे काही या आठवड्यामध्ये घडले तो देशाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट पेपर फुटीची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलाच पाहिजे यावर कॉक्रोश जनता पार्टीची तरुण मुले ठाम राहिली. इतकेच नव्हे तर जेव्हा जेव्हा भाजप या सत्तांध पक्षाविरुद्ध लढताना त्यांना कोणी हरवू शकत नाही, अशी एक प्रतिमा तयार करण्यात आली होती. देशाच्या विविध राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका भारतीय जनता पक्ष जिंकणार अशी जणू काही एक अलिखित निकालाची पट्टी तयार करण्यात आली होती. आंध्र प्रदेश किंवा केरळ सारख्या राज्यामध्ये तसेच तमिळनाडू सारख्या प्रदेशांमध्ये जेथे भारतीय जनता पक्षाला स्थान नाही याचा अपवाद सोडला तर सर्वत्र भाजप हाच निवडणुकीच्या मध्यस्थानी असणारा पक्ष अशी प्रतिमा तयार केली आहे. त्यामुळेच “इस सरकार में इस्तीफे नहीं होते” म्हणणाऱ्यांचा माज मातीत मिळाला! जे कालपर्यंत गर्वाने आणि अहंकाराने बरळत होते की, “या सरकारमध्ये राजीनामे देण्याची प्रथा नाही”, त्यांना देशातील तरुण तरुणींनी तसेच विद्यार्थ्यांच्या एकजुटीच्या दणक्याने त्यांची जागा दाखवून दिली आहे!

सरकारमधील मंत्री कुणी राजीनामा देत नाहीत अशी गर्वाने सांगण्याची भाषा का येते…? कारण आम्ही काही चुकतच नाही आणि आम्ही चुकलो असे तुम्हाला वाटत असेल तर ती मान्यच करणार नाही आम्ही जे करू ती पूर्व दिशा अशी मिजास मारली जात होती. पण गेल्या बारा वर्षात या सरकारने अनेक गंभीर चुका केलेल्या आहेत. त्या गंभीर चुका असल्या तरी त्यांचे समर्थन करणारे भक्त हे अंध असल्याने ते मानायला तयार नाहीत की भाजप चुकतो आहे. परदेश नीती असेल किंवा अर्थव्यवस्था सांभाळणे असेल, अतिरेक्यांच्या विरुद्ध लढणे असेल किंवा धर्मांधता वाढवून लोकांना अंध बनवणे असेल. शिक्षण व्यवस्थेचे वाटोळे करणे असेल किंवा विकासाचे मार्ग निवडताना केलेले गोंधळ असतील या सर्वच पातळीवरती सरकारने अनेक गंभीर चुका केलेल्या आहेत. म्हणूनच पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग पायउतार होत असताना म्हणाले होते की
“नरेंद्र मोदी जर या देशाचे पंतप्रधान होणार असतील तर तो एक उध्वंश असेल.”
भारत देशाचा इतिहासच नाकारायचा असा चंग बांधून सत्तेवर आलेल्या भाजपच्या लोकांना स्वातंत्र्यलढा मान्य नाही. स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी योगदान दिले आहे. त्यांचे योगदान मान्य नाही. मात्र १५ ऑगस्टला मोठ्या तोऱ्यात लाल किल्ल्यावर उभे राहून दोन दोन तास देशाला भाषण देणार…! तेव्हा आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतोय याची जाणीव असून देखील संपूर्ण स्वातंत्र्यलढ्यातील विचारधन आणि वैचारिक संघर्ष टाळून या देशाने दिलेला दीडशे वर्षाच्या स्वातंत्र्यलढ्याला काहीही किंमत नाही. किंबहुना त्या लढ्याचे जे सेनानी होते त्यांचे काहीच या देशाच्या उभारणीमध्ये योगदान नाही अशा प्रकारची भाषा नेहमी वापरली जाते. इतकी बेनामी या पक्षाने देशाशी केली आहे. त्यामुळे ही भूमिकाच मुळात चुकीची आहे. भारतीय जनता पक्षाकडून कोणतेही विकासाचे काम योग्य पद्धतीने होणार नाही हे यापूर्वी स्पष्ट झाले होते.
कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जेन झी तरुणाई एकत्र आली. त्यांनी संपूर्ण देश हलवून ठेवला. जे विरोधी पक्षांना आजवर जमत नव्हते ते करून दाखवले. ते स्वतः उघडे नागडे आहेतच. पण सरकार किती उघडे नागडे आहे हे त्यांनी दाखवून दिले. या तरुणाईच्या हातातील पोस्टर्स आणि त्याच्यावरील शब्द पाहिले तर सरकार किती उघडे नागडे आहे हे स्पष्टपणे लिहूनही दाखवले. त्यात कोणतीही कसूरही ठेवली नाही. त्यातील भाषा असंसदीय होती असे तुम्ही म्हणू शकाल. पण या तरुणाईची तीच भाषा आहे. त्याच भाषेत सत्ताधाऱ्यांना उत्तर देण्याची गरज होती. भारतीय जनता पक्षाने गेल्या काही वर्षांमध्ये व्हाट्सअप युनिव्हर्सिटीचा उपयोग करून घेऊन असं खोटे नाटे संदेश जनतेमध्ये पसरवले होते. हिंदू विरुद्ध मुस्लिम असा प्रचार करण्यात कोणताही कोणतीही कसूर ठेवली नव्हती. इतकेच नव्हे तर पंडित जवाहरलाल नेहरू यांचे खानदान मुस्लिम होते हे पटवून देण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. इतका द्वेष आणि मत्सर भरलेला भारतीय जनता पक्ष जनहिताची कोणतीही गोष्ट करू शकत नाही, हे स्पष्ट होते.

आंतरराष्ट्रीय पातळीवरती आज भारताची जी छबी तयार झाली आहे ती केवळ हास्यस्पद अशा स्वरूपाची आहे. भारताला कोणत्याही पातळीवर कोणतीही किंमत दिली जात नाही केवळ आपली लोकसंख्या मोठी आहे आणि भारताची बाजारपेठ अनेकांना हवी आहे इतक्याच मर्यादित पण महत्त्वाच्या कारणासाठी भारताला जमेत धरले जाते. देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे लागतात ती विकण्यासाठी भारताशी जवळीक ठेवण्याचा प्रयत्न विकसित राष्ट्रे करीत असतात. यापेक्षा अधिक महत्त्व भारताला दिले जात नाही. या तरुणाईने शिक्षण व्यवस्थेच्या एका प्रश्नावरती ज्या पद्धतीने केंद्र सरकारला धारेवर धरले आणि शिक्षण मंत्र्याला घरी पाठवले ती वाखाण्याजोगी गोष्ट आहे. आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचे वाटोळे या सरकारने गेल्या बारा वर्षात केले. जी व्यवस्था होती ती अपूर्ण असली तरी काहीतरी व्यवस्था होती. त्यामध्ये संघाच्या बिनडोक लोकांची भरती करून संस्था ताब्यात घेण्याचा मोठा पराक्रम करून दाखवण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी पात्र नसलेल्या लोकांना प्राध्यापक काय कुलगुरू म्हणून देखील नियुक्त केले गेले. केवळ आम्ही वर्चस्व दाखवतो असा गर्व मिरवण्यासाठी या सर्व गोष्टी करण्यात आल्या
या तरुणाईने शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेऊन सत्तेला आव्हान दिले आहे. यापुढे चळवळ अधिक वेगाने चालवावी लागेल. कारण शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याने शिक्षण व्यवस्था सुधारणार नाही. त्या शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आपल्याला व्यवस्थेला प्रश्न विचारावे लागणार आहेत. त्यासाठी पर्याय सुचवावे लागणार आहेत ते पर्याय अमलात येणार नाहीत म्हणून संघर्ष करावा लागणार आहे. याचीही ही सुरुवात करत असताना सत्तेची पहिली हार झालेली आहे. मी गेल्या पाच जुलैच्या जागर सदरामध्ये “देशाला सत्तांतराची गरज” आहे असे म्हटले होते. त्याची प्रचिती आता आलेली असेल. या पद्धतीने चर्चा संपूर्ण देशभर सुरू झालेले आहे. ती पाहता आता सत्तांतर करून पर्यायी राजकीय शक्ती सत्तेवर आणण्यापर्यंत ही लढाई करावी लागणार आहे.

यावर आपले मत नोंदवा