नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या तरुणांशी सरकारने संवाद साधायला हवा होता अशी भूमिका डॉ .मोहन भागवत यांनी मांडली. संवाद साधने ही लोकशाही प्रक्रिया आहे, असेही सांगायला ते विसरले नाही.

‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो..!’ अशी मराठीतील एक प्रसिद्ध म्हण आहे. याचा अर्थ समोरच्या व्यक्तीने वरवरचा किंवा देखाव्याचा राग दाखवावा आणि आपणही वरवरचे दुःख किंवा भीतीचे नाटक करावे असा होतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी झेन जी तरुणांशी बोलताना या म्हणीचा अपभ्रंश केला.
तुम्ही त्यांना माराच, मी आपले रडल्यासारखे करतो…! वास्तविक या म्हणीनुसार मारणे हे नसते किंबहुना ते नाटक असते आणि रडण्याचे देखील नाटकच केले जाते. पण अपभ्रंश असा झाला की, या झेन जी तरुणांना नवी दिल्लीत आंदोलन करताना अक्षरशा बदडून काढले. तेव्हा मोहन भागवत यांची वाचा गेली होती का..? असा प्रश्न पडतो आहे. या उलट या तरुणांची चेष्टाच करण्यात आली. त्यांना देशद्रोही ठरवण्यात आले. त्यांना परकीय मदत मिळते आहे किंबहुना देशातील सरकार विरुद्ध हा एक आंतरराष्ट्रीय कट आहे, असा आरोप त्यावेळी करण्यात आला. त्यांच्यावर कारवाई करणाऱ्यांना खुली सूट देण्यात आली. अद्यापही ही कारवाई कोणाच्या आदेशाने करण्यात आली हे सांगण्यास देशाचे सरकार अपयशी ठरले आहे.
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा गेल्या दिनांक २५ जुलै रोजी झाला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून ही कारवाई करण्याचे आदेश कोणी दिले..? याचे स्पष्टीकरण मागितले होते. त्याचे स्पष्टीकरण ना संसदेत देण्यात आले. ना सार्वजनिक ठिकाणी किंवा माध्यमांच्या समोर देण्यात आले. पंतप्रधान कार्यालयीन मंत्री जितेंद्र सिंह यांनी अशी कारवाई जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने होते, असे लोकसभेत सांगितले. मात्र हे सांगत असताना त्यांच्याच आदेशाने झाली हे सांगायला ते तयार नाही. लाठीमार, अश्रुधूर सोडणे किंवा पाण्याचा मारा करणे, गोळीबार करणे, अटक सत्र चालवणे आदि कारवाया कशा पद्धतीने होतात याची अजिबात कल्पना या देशावर साठ वर्षे राज्य केलेल्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना माहीत नसावे असे त्यांचे मत आहे का? इतकेच नव्हे तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेल्या आणि देशांतर्गत अनेक गंभीर समस्या हाताळण्यामध्ये काँग्रेस पक्षाने भूमिका बजावलेली आहे. त्यातील यश अपयशी त्या त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून होते.
भागवत यांची शरणागती
ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ..मोहन भागवत यांनी तरुणाईशी बोलण्याचे ठरविले. या तरुणांशी यापूर्वी बोलावे असे त्यांना कधीच वाटले नव्हते. अचानक मात्र त्यांची आठवण झाली. कारण या तरुणाईने केंद्र सरकारला नामोहरम केले. जनआंदोलनातून निर्माण झालेली ही ताकद त्यांना धक्का देणार याची जाणीव झाल्यामुळेच या तरुणांशी बोलणे आवश्यक आहे असे वाटणे स्वाभाविक होते. पण हे नाटक होते.
सरकारने मारझोड करायची आणि त्या सरकारच्या (तथाकथित वैचारिक) समर्थकांनी अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रडल्यासारखे करायचे, अशीच ही परिस्थिती होती. इतकेच नव्हे तर या तरुणांशी बोलताना डॉ. मोहन भागवत यांनी चक्क शरणागती पत्करली.
नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या तरुणांशी सरकारने संवाद साधायला हवा होता अशी भूमिका त्यांनी मांडली. संवाद साधने ही लोकशाही प्रक्रिया आहे, असेही सांगायला ते विसरले नाही. आम्ही जेव्हा तरुण होतो तेव्हा वडीलधाऱ्यांचे ऐकत होतो. आत्ताची तरुण पिढी ही विचार करणारी आहे ती वडीलधाऱ्यांना देखील प्रश्न विचारते आहे याच भूमिकेतून त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सरकारने उत्तर देणे अपेक्षित होते. पण ते झाले नाही, असेही त्यांनी सांगून नामानिराळे झाले.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर किंबहुना नीट पेपर फुटी प्रकरणी सरकारची मोठी हार झाल्याचे आणि ज्या वर्गातून ही तरुणाई महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेत पुढे येते आहे, रस्त्यावर उतरते आहे. तो मध्यम वर्ग आपला बहुतांश समर्थक असल्याने त्यांची नोंद घेणे संघाला आवश्यक वाटले असावे. पण हेच वाटणे सुमारे दोन महिन्यापूर्वी जेव्हा आंदोलन सुरू झाले तेव्हा का पाऊल उचलण्यात आले नाही? हे शहाणपण आत्ता का सुचले? सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी तरुणाईला उद्देशून झुरळ म्हटले आणि त्यातून कॉक्रोच जनता पार्टी उदयाला आली. हे सर्व घडत असताना मोहन भागवत कोठे होते? सरकारने मारझोड करायची आणि यांनी रडल्यासारखे नाटक करायचे असेच याचे वर्णन केले तर चुकीचे ठरेल का? या तरुणांनी उपस्थित केलेले प्रश्न रास्त होते. त्यांच्याशी सरकारने संवाद साधायलाच हवा होता , हे उशिरा सुचलेले शहाणपण नाही का? मोहन भागवत चोवीस तास आणि ३६५ दिवस सार्वजनिक कार्यक्रमात असतात. कारण संघाचे स्वयंसेवक स्वतःला देशासाठी आयुष्य अर्पण केले आहे, असे समजतात. मग दोन अडीच महिने हे आंदोलन तापत असताना यांना ही बुद्धी का सुचली नाही..?
दुटप्पी भूमिका
नीट पेपर फुटी प्रकरणावरून सुरू झालेले आंदोलन केवळ एका मंत्र्याच्या राजीनाम्यापुरते मर्यादित नव्हते. कारण या तरुणांनी उपस्थित केलेले प्रश्न, मांडलेली भूमिका आणि सरकारच्या नीतीबद्दल व्यक्त केलेली शंका ही योग्य होती. त्यामुळेच संघवाल्यांना भीती वाटायला लागली असणार आहे. पंतप्रधान किंवा गृहमंत्री त्या दिवसापासून सध्या चालू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात तोंड दाखवण्यासाठी पुढे येत नाहीत. कोणीही नेता बोलण्याची तयारी दाखवत नाही. याउलट आमच्या सरकारमध्ये राजीनामा देण्याची पद्धत नाही असे सांगत आहेत. सुमारे साठ वर्ष विरोधी पक्ष म्हणून ज्या राजकीय पक्षांनी या देशात काम केले. त्यांनी असंख्य वेळा अनेक मंत्र्यांचे, मुख्यमंत्र्यांचे आणि पंतप्रधानांचे देखील राजीनामे मागण्याची आंदोलने केली. ते स्वतः इतरांचा राजीनामा मागण्यासाठी पुढे पण आमच्या सरकारमध्ये अशी पद्धत नाही अशा प्रकारचा अहंगंड बाळगणारी ही दुटप्पी भूमिका आहे. त्यामुळेच संघाचे रडणे किंवा सरसंचालकांचे रडणे हे एक नाटक आहे.

ज्यावेळी तरुण रस्त्यावर उतरून आंदोलन करीत होते तेव्हा जी काही त्यांच्यावर टीकाटिपणी झाली. ती सर्व संघ परिवारातूनच झालेली आहे. संघाचे सहसरकार्यवाहक अतुल लिमये यांनी जाहीरपणे हे तरुणांचे आंदोलन म्हणजे देशद्रोह्यांचे आंदोलन आहे,अशी टीका केली होती. अशीच टीका अनेकांनी केली. त्या तरुणांना परकीय मदत मिळते, हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा कट आहे असे देखील आरोप केले गेले.
शाई फेक
इतकेच नव्हे तर दोन दिवसांपूर्वी झारखंडमध्ये एका परीक्षेच्या पेपर फुटीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी दिल्लीतल्या आंदोलनाच्या नेत्या नेहा बोरा सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकणारा ग्रस्त कोण होता? तो दुसरा तिसरा कोणी नसून झारखंडमधील हजारीबाग येथील अमरनाथ पांडे. हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे. जर मोहन भागवत यांना या तरुणांशी संवाद साधायला हवा असे वाटत असेल तर हा पांडे नावाचा संघाचा कार्यकर्ता नेहा यांच्या अंगावर शाई फेकायसाठी पुढे कसा जातो.? पांडे याला संघातून हाकलून दिले जाणार का.? त्याच्यावर कारवाई होणार का..? कारण तो शाई फेकताना काढण्यात आलेला व्हिडिओ सर्वत्र फिरतो आहे. त्यामध्ये स्पष्टपणे तो गुन्हा करताना दिसते आहे. त्यामुळे त्याच्या कृत्याची साक्ष काढण्याची काही गरज नाही. त्याचा गुन्हा जगजाहीर दिसतो आहे.

खेळखंडोबा
नीट पेपर फुटीच्या प्रकरणातून देशातील शिक्षण व्यवस्थेशी जो खेळखंडोबा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने गेली बारा वर्षे चालवलेला आहे. त्याची लक्तरे वेशीवर टांगणारी ही तरुणाई होती. ती केवळ नीट पेपर फुटीच्या विषयी बोलत नव्हती तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत निर्माण झालेल्या अनागोंदी कारभाराचा पंचनामा करीत होती. भाजप सरकारने शिक्षण व्यवस्थेला सुधारण्याऐवजी त्यामध्ये घुसखोरी करणे आणि तेथील सत्ता हस्तगत करणे एवढ्याच कार्यक्रम गेली काही वर्षे चालवलेला आहे. इतकेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाशी खेळखंडोबा चालवलेला आहे. या विद्यापीठात येणारी अनेक मुले मुली राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतात. देशातील ते सर्वोत्तम विद्यापीठ हे मानले जाते. या विद्यापीठात संघ परिवारातील लोक हस्तक्षेप करीत आहेत. अशाच प्रकारचा हस्तक्षेप देशातील अनेक विद्यापीठांमध्ये, संशोधन संस्थांमध्ये आणि शिक्षणासंबंधी असलेल्या शिखर संस्थांमध्ये केला जात आहे.
ज्या राजकीय पक्षाचे सरकार केंद्रात सत्तेत असते त्यांच्या समर्थकांना अशा शिक्षण संस्थेमध्ये हस्तक्षेप करण्याची किंबहुना संधी साधून सत्तेवर बसण्याची हौस असते. हे नाकारले जाऊ शकत नाही. काँग्रेसच्या काळात देखील हे झाले. मात्र या शिक्षण संस्थांमधील गैरव्यवहारावर अंकुश ठेवणे. त्या शिक्षण संस्था अधिक कार्यक्षम करून उत्तम चालवणे यासाठी प्रयत्न गरजेचे आहे. ही जी घुसखोरी करून संघाची माणसे आत गेली आहेत. त्यांचा अजिबात आवाका देखील नाही. संघ परिवारातून तयार झालेले विचारवंतांची यादी जर कुणाला विचारली तर ती हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांची नावे घेता येऊ शकतील. कारण त्यांचा दृष्टिकोन हा सडलेला आहे. त्याला वैज्ञानिक दृष्टिकोनाची पार्श्वभूमी नाही. जगामध्ये जे काही घडते आहे ते स्वीकारण्याची तयारी नाही. त्यामुळेच संघ परिवारातून विद्वान किंवा विचारवंत तयार होणे हे दुरापास्त आहे. डॉ. मोहन भागवत यांची वक्तव्ये किंवा झेन जी तरुणांच्या मेळाव्यामध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या उत्तरातून समाधान झाले नाही.

अनेक तरुणांनी बाहेर येऊन प्रसार माध्यमांशी बोलताना आमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांना देता आले नाहीत. हे त्यांनी जाहीरपणे सांगितले. कारण या तरुणांचा एक जागतिक दृष्टिकोन तयार झालेला आहे. पूर्वीच्या काळानुसार वडीलधाऱ्यांचे ऐकायचे किंवा वर्गात जे शिकवतात त्याच्यावर समाधान मानायचे. हे दिवस आता संपलेले आहेत. जसे अर्थकारणाचे राजकीय जागतिकीकरण झाले आहे. तसे माणसाचे देखील झालेले आहे. आधुनिक प्रसार माध्यमांच्या वापराने हे जागतिकीकरणाचे वर्तुळ पूर्ण झाले आहे. त्यामुळे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक पोस्ट फेसबुकने काढून टाकली म्हणून त्यावर कारवाई करावी असे केंद्र सरकारला वाटू लागलेले आहे. ही व्यवस्था केवळ देशी राहिलेली नाही ज्यांना ‘एक देश, एक भाषा’ ‘एक देश, एक निवडणूक’, ‘एक देश, एक धर्म’ अशा काही गोंडस कल्पना आवडू लागल्या आहेत. त्यांना या जागतिकीकरणाचा अर्थ समजणार नाही. त्यामुळेच डॉ. मोहन भागवत यांची तरुणाई समोरची शरणागती पुढे आलेली आहे. कारण समाजामध्ये जे काही चालू आहे. ते कळण्याच्या पलीकडचे आहे. हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे तर पंतप्रधान किंवा गृहमंत्री संसदेसारख्या लोकशाहीच्या सर्वोच्च व्यासपीठावर येऊन आपली भूमिका मांडू शकत नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. वास्तविक ही किती मोठी संधी होती, ती कोणी दवडली असती का?
रडण्याचे नाटक
नीट ही देखील एक चुकीची आणि देशाच्या संघराज्य पद्धतीचा विचार न करता विषमता वाढवणारी परीक्षा आहे. या परीक्षेद्वारे जे स्वतःला तथाकथित गुणवंत समजतात त्यांनाच यातून संधी निर्माण होईल. याची काळजी घेतली गेलेली आहे. याच व्यवस्थेचा गैरफायदा घेऊन नीटचे पेपर दरवर्षी फोडले गेले. नीटची परीक्षा नीटपणे पेपर फोडून यावर्षी पार पडली नाही. त्यामुळेच हा सर्व गोंधळ समोर आला या परीक्षेचे पेपर फोडणारी यंत्रणा कशा पद्धतीने काम करीत होती. याची रसभरीत वर्णने आता बाहेर येऊ लागली आहेत. अशा प्रकारची सडलेली, कुजलेली आणि भ्रष्ट व्यवस्था नष्ट करण्याचे धोरण न स्वीकारता रडण्याचे नाटक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत करीत आहेत. असेच याचे वर्णन केले पाहिजे. त्यांनी या सर्व परिस्थिती पुढे शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही, हे त्यांनी ओळखले आहे. ज्याप्रमाणे भगवान गौतम बुद्ध यांनी भारतीय समाजातील विषमतेवर नेमकेपणाने बोट ठेवून क्रांती करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गौतम बुद्ध म्हणजे विष्णूचा दहावा अवतारच आहेत असे त्यांना स्वीकारून त्यांना संपवण्याचा प्रयत्न याच परंपरेतील मंडळींनी केला आहे. तसाच हा देखील एक प्रयत्न आहे. जेन झी तरुणाईला आपण आता अशा पद्धतीने मारझोड करून रोखू शकत नाही. हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे मोहन भागवत यांचे हे मोठे नाटक होते.
जो विषय राजकीय आहे. ज्याचे उत्तर देशाचे राज्यकर्ते म्हणून सत्तेवर बसलेले आहेत त्यांनी देणे अपेक्षित असताना मोहन भागवत यांनी अशा प्रकारचा संवाद साधून थातूरमातूर उत्तरे देण्याचे कारण काय होते..? तुम्ही जे काही तथाकथित सार्वजनिक काम शंभर वर्षे करीत आलेल्या आहात असा दावा केला जातो ते करावे आणि कर्नाटकाचे गृहमंत्री प्रियंक खरगे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे एकदा द्यावीत. म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खरे स्वरूप लोकांना कळू शकेल. त्यामुळे डॉ. मोहन भागवत “आगे बढो आणि रडनेका नाटक बंद करो…! “

यावर आपले मत नोंदवा