चेरुवायल रामन यांचे यश केवळ दुर्मिळ भात जातीचे बियाणे वाचविणारे नव्हते. त्यांनी शेतीची एक पर्यायी व्यवस्था जिवंत ठेवली, ज्यात बियाणे ही वारशाने मिळालेली जबाबदारी होती, माती ही जिवंत व्यवस्था होती आणि आदिवासी शेतकऱ्यांचे ज्ञान हे एक आवश्यक संसाधन म्हणून ओळखले जात होते.
केरळमधील वायनाड जिल्ह्याची ओळख सर्वसामान्य माणसाला देशभर झाली ती जेव्हा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी इथून निवडणूक लढवली तेव्हा...! लोकसभेच्या २०१९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांचा अमेठी लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला. वायनाड मतदार संघातून लोकसभेत जाण्यासाठी निवड केली. या मतदारसंघातून ते प्रचंड मताने निवडून आले तेव्हा वायनाडचे नाव साऱ्या देशभर झाले. लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत देखील राहुल गांधी वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून निवडून आले. त्यांनी वायनाडचा राजीनामा दिल्याने झालेल्या पोटनिवडणुकीत श्रीमती प्रियंका गांधी निवडून आल्या त्या आता या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.
गेल्यात १४ ऑक्टोबर रोजी वायनाडचे नाव बातमीत आले. या जिल्ह्यातील पद्मश्री पुरस्कार विजेते आदिवासी शेतकरी चेरुवायल रामन यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. जिल्ह्यातील मानंतवाडी जवळील कम्माना येथील त्यांच्या मातीच्या वडिलोपार्जित घरात भाताच्या बियाण्यांच्या पोत्यांमध्ये तिथल्या लोकांची आणि हळूहळू नाहीशी होत चाललेल्या शेती संस्कृतीची आठवण साठवलेली आहे. प्रत्येक पोत्याला एक नाव आणि एक इतिहास आहे.

चेरुवायल रामन हे प्रेमाने रामेट्टन म्हणून ओळखले जात होते. वायनाड जिल्ह्यातील पन्नास पारंपरिक आणि केरळच्या इतर भागांतील चौदा अशा एकूण ६४ पारंपरिक भात जातींच्या बियाण्यांचे जतन करत होते. त्यांची शेती ही एक जिवंत बियाणे बँक बनली होती. चेरुवायल रामन या शेतावर बियाणे वारंवार पेरून जतन करीत होते आणि इतर शेतकऱ्यांना, विशेषतः आदिवासी कुटुंबांना मोफत वाटत होते. त्यांच्या निधनामुळे वायनाडचा देशी भात संग्राहक आदिवासी शेती ज्ञान आणि समुदाय नेतृत्वाखालील जैवविविधता संवर्धन यांचे संरक्षण कसे होणार, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. चेरुवायल रामन यांच्यासाठी बियाणे ही केवळ शेतीसाठीचा माल किंवा साधन नव्हते. ती अनेक पिढ्यांमधील जिवंत दुवे होती, ज्यात माती, पाऊस, ऋतू आणि त्यांचे जतन करणाऱ्या समुदायांचे ज्ञान सामावलेले होते.
केंद्र सरकारची तर्फे २०२३ मध्ये पद्मश्री, केंद्रीय कृषी मंत्रालयाचा जीनोम सेव्हियर पुरस्कार आणि केरळचा ग्रीन अवॉर्ड यांनी त्यांच्या कार्याचा गौरव झाला. पण त्यांच्या कार्याचे खरे मोजमाप पुरस्कारांत नव्हते, तर वायनाडच्या समुदायांना शतकानुशतके जगवणाऱ्या पारंपरिक भात जातींच्या अस्तित्वात होते.
१७ व्या वर्षी जबाबदारी
मामांच्या निधनानंतर वयाच्या सतराव्या वर्षी चेरुवायल रामन यांनी त्यांच्या समुदायाच्या शेती करण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे सोपवलेल्या पारंपरिक बियाण्यांचे जतन करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. वारसा म्हणून सुरू झालेले काम हे आजीवन कामाचे क्षेत्रच बनले, त्यांनी हे काम आर्थिक अडचणी आल्या, प्रकृती खालावली आणि अपुऱ्या संस्थात्मक पाठिंब्याला न जुमानता टिकवले. अविरत करीत राहिले. चेरुवायल रामन हे कुरिच्या समुदायातील होते, हा अनुसूचित जमातीचा समुदाय केरळच्या दक्षिण भागात असलेले मलबार प्रदेशात भात शेतीसाठी ओळखला जातो. एकेकाळी भात हे वायनाडच्या शेतीच्या अर्थव्यवस्थेचे, खाद्य संस्कृतीचे आणि सामाजिक जीवनाचे केंद्र होते. आजही ते टिकून आहे.
चेरुवायल रामन यांनी वडिलोपार्जित जमिनीचे या लुप्त होत चाललेल्या वारशाचे आश्रयस्थानात रूपांतर केले. शाश्वत शेतीचा मार्ग त्यांनी स्वीकारला. आदिवासी समूहामध्ये शेतीचे जे उपजत ज्ञान होते त्याच्या आधारे त्यांनी शेती विकसित करण्याचा प्रयत्न केला ते करीत असताना या परिसरात जी पारंपरिक बियाणे होती ती जतन करण्याचा त्यांचा पहिला निर्णय होता. ते प्रत्येक जात वेगळ्या प्लॉटमध्ये स्वतंत्रपणे पेरत, त्याची कापणी करत, बियाणे वाळवत आणि पुढच्या हंगामासाठी साठवत. ते पैसे न घेता सहकारी शेतकऱ्यांना, विशेषतः आदिवासी कुटुंबांना बियाणे वाटत असायचे. त्या काळात अजूनही भातासह सर्व प्रकारच्या पारंपरिक बियाणे वापरली जात होते. “बियाणे ही माझी मुलं आहेत. पुढच्या पिढीसाठी मी त्यांना जिवंत ठेवतो,” असे चेरुवायल रामन म्हणायचे.

त्यांच्या घराच्या अंधुक प्रकाशात चेन्नेलु, थोंडी, चेम्बकम, वेलियन, गांधीशाला आणि कायामा अशा नावांच्या पोत्यांमध्ये वेगवेगळ्या माती, पाणी आणि हवामानाशी जुळवून घेतलेल्या भाताची विलक्षण विविधता होती. गंधकशाला आणि कायामा या भाताच्या जाती त्यांच्या विशिष्ट सुगंधासाठी आणि मलबारच्या खाद्य परंपरेशी असलेल्या नात्यासाठी प्रसिद्ध आहेत. खोल लाल दाण्यांचा चेन्नेलु हा आदिवासी समुदायांच्या खाद्य वारशाचा भाग आहे, तर वेलियन हे बियाणे कांजीसाठी (पेज) मौल्यवान आहे. नजावरा या पारंपरिक केरळी जातीला औषधी आणि धार्मिक विधींमध्ये विशेष स्थान आहे. केरळच्या सर्व धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी जेवणामध्ये नजावरा भात केलाच जातो.
पश्चिम घाटाच्या डोंगरदऱ्यामध्ये असलेला हा वायना जिल्ह्याचा परिसर म्हणजे भात शेताचे पगारच होते. आज देखील प्रमुख पीक भातच आहे. एकेकाळी सुमारे १६० देशी भाताच्या जाती होत्या. कालांतराने ही विविधता नाहीशी झाली कारण शेतीची जागा कॉफी, मिरे, आले, सुपारी आणि शहरीकरणाने घेतली. रामन यांनी स्वतः या जाती पेरत राहून या परिवर्तनाला विरोध केला. त्यांची शेतं जिवंत जनुक बँक बनली, हे जुने बियाणे केवळ साठवून न ठेवता वारंवार पेरून जतन केली जात होती. त्यांचा असा विश्वास होता की, पारंपरिक जातींमध्ये कमी पाण्यात पिकण्याची क्षमता, अतिवृष्टी झाली तरी टिकून राहण्याची क्षमता, कीड प्रतिकार शक्ती आणि कमी खर्चाच्या शेतीशी जुळवून घेण्याची क्षमता असे मौल्यवान गुण आहेत.
शेतीच्या वर्षानुवर्षे केलेल्या निरीक्षणातून त्यांना हे ज्ञान मिळाले होते. भाताची एक जात अतिवृष्टी कशी सहन करते तर दुसरी कमी पाऊस झाला तरी कोरड्या हवामानात कशी तग धरते, हे ते समजावून सांगू शकत होते. चेरुवायल रामन यांना सातत्याने केलेल्या निरीक्षणामुळे असे लक्षात आले की, मातीतील जीव नष्ट होत आहेत. त्यांनी १९७८ पासून भात शेतीसाठी रासायनिक खते वापरणे बंद केले. नैसर्गिक शेतीकडे परतल्यावर गांडूळे आणि इतर जीव परत येऊ लागले, असे ते नेहमी सांगत होते. “शेती करणे म्हणजे मातीला मारले नाही पाहिजे, तिला पोसले पाहिजे,” हा त्यांनी घेतलेला धडा होता.

केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी त्यांच्या शेतीला भेट देऊन पाहणी केली. शाश्वत ठरणारी निसर्ग शेती अधिक विकसित केली पाहिजे असे त्यांनी नमूद केले. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी देखील त्यांच्या शेतीला भेट देऊन पाहणी केली होती. प्रियंका गांधी यांना तर ते तुम्ही माझ्या मुलीसारख्या आहात असे म्हणायचे. त्यांच्या या कामाला केरळ राष्ट्रीय पातळीवर देखील मान्यता मिळाली अनेक मानसन्मान मिळाले त्यांना अनेक ठिकाणी आपल्या निसर्ग शेतीचा अनुभव कथन करण्यासाठी बोलावले जाऊ लागले. राष्ट्रीय मान्यता मिळूनही चेरुवायल रामन यांना त्यांच्या कामातून उदरनिर्वाह करणे कठीण जात होते. त्यांच्या बियाणे संग्रहाच्या देखभालीसाठी वर्षाला सुमारे ७० हजार रुपये खर्च येत होता. “बियाणे भाषणांची वाट पाहू शकत नाहीत,” अधिकृत कौतुक आणि प्रत्यक्ष मदत यातील तफावतीबद्दल चेरुवायल रामन नाराजीने म्हणायचे. जैवविविधता संवर्धनासाठी गौरवलेला शेतकरी कधीकधी कुटुंबाला पोसण्यासाठी रेशनच्या तांदळावर अवलंबून होता.
“शेतकरी पर्यावरणाचे शत्रू नाहीत, केवळ शेतकऱ्यांसोबतच तुम्ही त्याचे रक्षण करू शकता.” असे ठामपणे ते म्हणायचे. चेरुवायल रामन यांना विद्यापीठांनी व्याख्यानांसाठी बोलावले, केरळ कृषी विद्यापीठाने तर त्यांना प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून नियुक्त केले. तरीही त्यांची मुख्य चिंता सुटली नाही..त्यांच्यानंतर बियाण्यांचे काय होणार? “मला हिरो म्हणू नका,” ते म्हणायचे. “बियाणे टिकतील याची खात्री करा. तेवढेच पुरेसे आहे.” त्यांच्या निधनामुळे ती विनंती निराधार बनली आहे. केरळ सरळ तरच जुन्या बियाणांचा संग्रहाचा शाळेत गेला पाहिजे त्या बियाणांच्यावर संशोधन झाले पाहिजे त्यातले दोष दूर करून अनेक नव्या गुणांची पेरणी केली पाहिजे ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनी असे प्रयोग केले त्यामुळे तर भारतात जगातील सर्वाधिक भात उत्पादक देश म्हणून गणला जातो आहे तो जर उत्पादनामध्ये आघाडीवर नसता तर आज भारताला अन्नधान्यासाठी जगावर अवलंबून राहण्याची वेळ आली असती आज भात आणि गहू ही दोनच पिके अशी आहेत की ज्यांचे उत्पादन आपल्याला आवश्यक तेवढे करून दरवर्षी आपण निर्यात करू शकतो. स्वामीनाथन यांनी उपलब्ध जातींच्या मध्येच सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आणि नव्या जाती जन्माला घातल्या त्यामध्ये जुन्या जुनुकांचा वापर केला. देशी पारंपारिक बियाणांच्या मधील वैशिष्ट्ये नोंदवली हेरली पाहिजेत आणि अधिक दर्जेदार बियाणे तयार करून शेतकऱ्यांना वाटली पाहिजेत. जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर याची गरज खूपच वाढली आहे भारतीय हवामानाला पोषक अशा बियाण्यांचाच वापर आपण केला पाहिजे.
चेरुवायल रामन यांचे यश केवळ दुर्मिळ भात जातीचे बियाणे वाचविणारे नव्हते. त्यांनी शेतीची एक पर्यायी व्यवस्था जिवंत ठेवली, ज्यात बियाणे ही वारशाने मिळालेली जबाबदारी होती, माती ही जिवंत व्यवस्था होती आणि आदिवासी शेतकऱ्यांचे ज्ञान हे एक आवश्यक संसाधन म्हणून ओळखले जात होते. आपल्याला हिरो न म्हणवून घेणाऱ्या या आदिवासी माणसाने केवळ स्मरणापेक्षा मोठे काम मागे ठेवले आहे. ते काम वाढले,.विस्तारले त्याचा विकास झाला. त्यांनी अनुभवाच्या आधारे मांडलेल्या सिद्धांतावर अधिक संशोधन झाले तर बदलत्या पर्यावरणीय वातावरणामध्ये भारतीय शेती टिकेल, अन्नसुरक्षा अधिक मजबूत होईल आणि आपण एका चांगल्या जीवनमानाकडे वाटचाल करू शकू.


प्रतिक्रिया व्यक्त करा