नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या कुटुंबामध्ये ही पिलावळ कशी जन्माला आली आणि त्यांनी इतर अनेक सहकारी संस्थांमध्ये ज्या प्रकारे भ्रष्टाचार आणि गैर व्यवहार चालतात. त्याच वाटेने जाण्याचा मार्ग कसा स्वीकारला याचे कोडे पडते. लोक काय म्हणतील याचेही भान यांना नाही इतके हे बेधुंद झाले आहेत. या सर्वांना अद्दल घडवल्या शिवाय पुन्हा एकदा ‘हुतात्मा’चे वैभव उभे राहणार नाही.

राजकारण असो किंवा सहकार चळवळ असो यामध्ये घराणेशाही आता रुळलेले आहे. याला कोणताही राजकीय पक्ष किंवा संस्था अपवादात्मक नाही. महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळीने ग्रामीण भागाचा अमुलाग्र बदल केला. त्याची फळे अनेकांना मिळाली. ग्रामीण भाग समृद्ध झालाच त्याचबरोबर सर्वांगीण परिवर्तन देखील झाले. हे होत असताना त्याची दुसरी बाजू अशी आहे की, या चळवळीमध्ये वैयक्तिक तसेच कौटुंबिक स्वार्थ, राजकीय स्पर्धा आणि आर्थिक गैरव्यवहार अनेक झाले. परिणामी सहकार चळवळच बदनाम झाली. त्यातील अनेक संस्था कोसळल्या. ग्रामीण विकासाच्या या चक्राची गतीच रोखली जाते का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

अशा पार्श्वभूमीवर गेल्या सात दशकातील महाराष्ट्रातील सहकार चळवळीतील विशेषता साखर उद्योगातील एक आदर्श पॅटर्न म्हणून सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील “हुतात्मा किसन अहिर” सहकारी साखर कारखान्याचे उदाहरण दिले जाते. भारतीय स्वातंत्र्यासाठी झालेल्या साताऱ्याच्या प्रति सरकारच्या लढ्यामध्ये अग्रभागी असलेले क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांनी या कारखान्याची १९८१ मध्ये उभारणी केली. हा कारखाना मंजूर होत नव्हता त्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना संघटित करून चार वर्षे राज्य आणि केंद्र सरकार विरूद्ध संघर्ष केला. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी चळवळीमध्ये उतरलेला हा अवलिया नेता होता. स्वच्छ चारित्र, पारदर्शी कारभार आणि शेतकऱ्यांप्रति अपार निष्ठा या मूल्यांच्या आधारे हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना अल्पावधीतच नावारूपाला आणला. या कारखान्याने उसापासून साखर तयार करताना अनेक प्रकारचे आदर्श निर्माण केले. साखर कारखान्याची कार्यक्षमता पुरेपूर कशी वापरायची याचे नियोजन केले. आर्थिक शिस्त पाळली. खर्चावर पूर्ण नियंत्रण ठेवले. भ्रष्टाचार किंवा गैर व्यवहारास कुठेही थारा दिला नाही. साखर निर्मितीमध्ये उत्कृष्ट क्षमता राखली. काटकसरीने कारखाना चालवल्याने केवळ पाच वर्षात तो कर्जमुक्त करण्यात झाला. कारखाना उभारण्यासाठी काढलेल्या कर्जाचे सर्व हप्ते एकही दिवस उशिरा भरले गेले नाहीत. कारखाना कर्जमुक्त झाल्यानंतर सर्व सभासदांना जिलेबी वाटून आनंद साजरा करण्यात आला. सहकारी चळवळीमध्ये असे देशातील एकमेव उदाहरण आहे.

पारदर्शी कारभार
नागनाथ अण्णा नायकवडी नेहमी म्हणायचे की, साखर उद्योगात फायदाच फायदा आहे. उसापासून तयार होणारी कोणती गोष्ट वाया जात नाही. साखर, बॅगस, मळी आदीपासून पैसेच पैसे बनवता येतात. त्यासाठी कारखान्याचा कारभार स्वच्छ असला पाहिजे, असे ते म्हणत असत. कारखान्याचा कारभार पारदर्शी असावा याचे एकच उत्कृष्ट नमुना होता की दर रविवारी दुपारी बारा वाजता हुतात्मा संकुलाच्या शाळेच्या पटांगणात झाडाखाली धोंगडे अंथरूण संचालक मंडळाची बैठक होत असे. या बैठकीला कोणाही शेतकरी सभासद आणि कामगारास उपस्थिती लावण्यास हरकत नसायची. सर्व चर्चा खुल्या बैठकीत होत असे. त्यामुळे हुतात्मा कारखान्याने एक वेगळाच पॅटर्न महाराष्ट्रात निर्माण केला. कारखान्याची खरेदी असो किंवा इतर खर्च असो याच्यावर पूर्ण नियंत्रण ठेवले जायचे. कोणीही पैसे खात नसत इतका अण्णांचा धाक होता. नागनाथ अण्णा नायकवडी यांनी साखर कारखाना स्थापन केला असला तरी ते कधीही कारखान्याचे अध्यक्ष (चेअरमन) झाले नाहीत. संचालक मंडळाची निवडणूक कधी लढवली नाही. त्यांच्या विचाराने चालणारे आणि सहमतीने निर्णय घेणारे सामान्य शेतकरी एकत्र येऊन संचालक मंडळ तयार केले जात असे. कारखान्याची निवडणूक देखील बिनविरोध होत असे. अशा प्रकारे कारभार केल्यामुळे कारखान्याने अल्पावधीतच कर्जफेड केली. शेतकऱ्यांना वेळेवर पैसे दिले. कामगारांना वेतनश्रेणी प्रमाणे वेतन देण्याची पद्धत हुतात्मा हुतात्मा कारखानेच प्रथम अमलात आणली. कामगारांना ३० ते ४० टक्के बोनस देण्याची प्रथा हुतात्मा कारखान्यानेच पाडली. शिवाय शेतकऱ्यांच्या उसाला अपेक्षेपेक्षा अधिक दर द्यायला सुरुवात केली आणि साखर उद्योगांमध्ये एक प्रकारची चांगला दर देण्याची स्पर्धा सुरू झाली.

वाळवा येथे चालू असलेले धरणे आंदोलन

हुतात्मा साखर कारखान्याची कार्यक्षमता पूर्ण वापरली जावी यासाठी खूप कटाक्ष असे. गळीत हंगामामध्ये कारखाना कधीही बंद पडू नये आणि तो बंद पडलाच तर कमीत कमी वेळेत तो पुन्हा सुरू व्हावा यासाठी अत्यंत काटेकोर नियोजन करण्यात येत असे. कारखान्यामध्ये काम करणारे व्यवस्थापकीय संचालकापासून ते महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या पर्यंत सर्वांनी कार्यस्थळावरच मुक्कामाला असले पाहिजे. असा आग्रह नागनाथ अण्णांचा असायचा. परिणामी कारखान्याचे कामकाज चोवीस तास उत्तम चालले पाहिजे असे ते म्हण म्हणत होते.

दररोज सकाळी सात आणि सायंकाळी सातला मागील चोवीस तासातील कारखान्याच्या गाळपाचा अहवाल तयार केला जात असे. स्वतः नागनाथ अण्णा कोठेही असले तरी या अहवालाची माहिती घेत असायचे. त्याची तुलना गतवर्षीच्या त्या दिवशीच्या गाळपाशी केली जात असे. आपण आजच्या दिवसाला कोठे आहोत, हे समजत होते. त्यानुसार उत्पादन क्षमता पूर्ण वापरणे, साखरेचा उतारा उत्तम राहील याच्यासाठी काळजी घेणे. यासाठी उसाच्या तोडणीपासून तो गाळप होईपर्यंतचे उत्तम नियोजन केले जात होते. ऊस जमिनीबरोबर तोडावा कारण उसाच्या बुडख्याच्या पेरात साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे तो अधिक गोड लागतो. ऊस स्वच्छ करूनच कारखान्याला आणावा. ऊस कारखान्यावर आल्यानंतर तो आठ तासाच्या आत गाळला जावा. यासाठीचे वाहतुकीचे व्यवस्थापन उत्तम करावे. जेणेकरून साखरेचा उतारा उत्तम मिळू शकेल. अनेक वेळा या साखर कारखान्याने तांत्रिक क्षमतेचे पुरस्कार जिंकले आहेत. उत्तम साखर उताऱ्याचे अनेक पुरस्कार जिंकलेले आहेत. आर्थिक व्यवस्थापनाचे पुरस्कार जिंकलेले आहेत. असंख्य पुरस्कारांनी या कारखान्याचे कौतुक झाले आहे.

ज्याप्रमाणे कर्जे वेळेत फेडली जात होती त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या ठेवी देखील व्याजासह दरवर्षी शेतीचा हंगाम सुरू होत असताना जूनमध्ये परत दिली जात असत. हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्यामुळे शेतकऱ्यांना उत्तम शेती करण्याचे प्रोत्साहन मिळाले. उत्तम दर मिळाल्याने शेतकऱ्यांची उन्नती झाली. कामगारांना चांगला पगार मिळाल्यामुळे कामगारांनी आपली प्रगती साधली. त्यांची मुले बाळे आज उत्तम शिक्षण घेऊन देश-विदेशात गेली आहेत. एवढेच नाही तर हुतात्मा उद्योग समूहाने शैक्षणिक क्षेत्रात देखील उत्तम कामगिरी केली. नागनाथ अण्णा यांनी गरीब माणसाला शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी स्वातंत्र्यानंतर लगेचच हुतात्मा किसन अहिर शिक्षण संस्था स्थापन केली. संस्थेमध्ये येणाऱ्या प्रत्येक मुलाला प्रवेश दिला जाई. गरिबाला मोफत शिक्षण दिले जाईल. अशा पद्धतीची चळवळ त्यांनी खूप पूर्वी सुरू केली होती. अशा प्रकारे “हुतात्मा” नावाचा पॅटर्न आणि नागनाथ अण्णा नायकवडी यांचे नेतृत्व यामुळे एक आदर्श निर्माण झाला होता. अलीकडच्या काळामध्ये त्याला गालबोट लागले आणि आता तर त्याचा स्फोट झाला आहे. नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जाण्याला चौदा वर्षे झाली आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये गैरव्यवहार होतो आहे, हे शेतकरी सभासदांच्या मनाला अद्याप पटत नाही. त्यांचा विश्वासच बसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या नाहीत. जरी गैरव्यवहार झाला असला तरी तो आपण अंतर्गत सोडवू पण नागनाथ अण्णा नायकवडी यांचे नाव बदनाम होईल अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप करू नयेत अशीच भावना शेतकरी सभासदांची आहे. त्याचा आता कडेलोट झालेला आहे.

नागनाथ अण्णा नायकवडी. छाया: गौरव किरण नायकवाडी

वैभवाच्या हाती सत्ता
गेली वीस वर्षे नागनाथ अण्णा नायकवडी यांचे चिरंजीव वैभव नायकवडी कारखान्याचे नेतृत्व सांभाळत आहेत. स्वतः नागनाथ अण्णा नायकवडी यांनी कधीच अध्यक्षपद स्वीकारले नाही किंवा आपल्या कुटुंबातील कोणालाही संचालक मंडळात घेतले नव्हते. मात्र त्यांच्या अखेरच्या काळात वैभव नायकवडी यांनी आपला शिरकाव बरोबर केला आणि गेल्या वीस वर्षांमध्ये केलेल्या कारभारातून साखर कारखान्यावर कर्ज उभे राहिले आहे. शिवाय त्यांनी आपल्या काही नातेवाईकांना कारखान्यांमध्ये घेतले. शिवाय मोठ्या प्रमाणात माया जमवली आहे, असा आरोप आता त्यांच्याच घरातील मंडळी ज्येष्ठ बंधू किरण नायकवडी, पुतण्या केदार नायकवडी आणि गौरव नायकवडी करीत आहेत. एका सुंदर, आदर्शवत आणि लौकिक प्राप्त केलेल्या सहकार समूहाला गालबोट लागले आहे. पण ते आरोप बऱ्याच अंशी खरे आहेत. साखर ज्या पद्धतीने अतिरिक्त दाखवली किंवा ज्या पद्धतीने ती विकली गेली याचे आरोप आहेत. वैभव नायकवडी यांनी जमवलेली माया मुरवण्यासाठी अनेक कंपन्यांची स्थापना केली आहे. त्याची यादीच त्यांचे पुतणे केदार यांनी जाहीर केली आहे. किरण नायकवडी, केदार आणि गौरव नायकवडी या सर्वांना या या भ्रष्टाचाराचा प्रचंड तिटकारा आहे किंबहुना नागनाथ अण्णा नायकवडी यांनी पुढाकार घेऊन स्थापन केलेला हा उद्योग समूह अस्ताला जाईल याची त्यांना चिंता नाही.

याउलट वैभव नायकवडी यांनीच सर्व सत्ता केंद्रे आणि आर्थिक नाड्या आपल्या का हातात ठेवल्या आहेत..? त्यामध्ये आम्हाला देखील सत्तेचा वाटा हवा अशाच प्रकारचा संघर्ष त्यांच्यामध्ये चालू आहे अशी चर्चा शेतकरी सभासदांमध्ये आहे. अशा संघर्षामुळेच हुतात्मा सहकारी दूध संघ गौरव नायकवडी यांच्याकडे सोपवण्यात आला होता. गौरव यांनी या दूध संघाची वाट लावली. संघ व्यवस्थित चालवला नाहीच शिवाय तो चालवायला देण्याची वेळ आली. हुतात्मा बँकेचे देखील उदाहरण तसेच आहे. ही बँक मला हवी असा आग्रह धरून ज्येष्ठ बंधू किरण नायकवडी यांनी अध्यक्षपद आपल्याकडे घेतले. पण या किरण नायकवडींना बँकमधील काहीच कळत नाही. ते नेहमी शेती करण्यात मग्न असायचे आता तर सायंकाळ नंतर ते गर्क असतात, असेही बोलले जाते.

भांडणे वाटणीसाठीच
हुतात्मा साखर कारखान्याच्या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये अशीच चर्चा आहे की, ही नायकवडी कुटुंबातील भांडणे वाटणीसाठीच आहेत. किरण, गौरव किंवा केदार नायकवडी यांनी आम्हाला सत्ता नको सभासदांच्या हाती किंवा सभासदांनी निवडून दिलेल्या संचालकांच्या हाती सत्ता असू द्या, गैरव्यवहार थांबला पाहिजे, भ्रष्टाचार थांबला पाहिजे, कारखान्याचे कर्ज वेळेत फेडले पाहिजे अशा मागण्या असल्या तरी सत्ता हवी आहे. सारी सत्ता वैभव नायकवडी यांच्या कडेच का? हा त्यांचा सवाल आहे.

याउलट वैभव नायकवडी यांनी करून ठेवलेले कर्ज त्यांनी मिळवलेल्या मलीद्यातून परतफेड करावे आणि सत्ता सोडून निघून जावे, असा त्यांचा आग्रह आहे. केदार नायकवडी यांना बँकेची सत्ता हवी आहे. गौरव नायकवडी यांना कारखान्याची सत्ता तरी द्यावी किंवा आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी हुतात्मा समूहातून पैसा उपलब्ध करून द्यावा आणि तो निवडणुकीवर उधळावा अशी इच्छा दिसते. ही सर्व अण्णांची मुले म्हणणे शोकात्मक आहे. कारण ही मुले राहिलेली नाहीत ही पिलावळ झाली आहे. या पिलावळ टाळूवरचे लोणी खाण्यासाठी एकमेकांशी भांडत आहेत. या सर्व नायकवडी कंपनीला सभासदांनी बाजूला करावे किंवा सभासदांनीच अशी अट घालावी की नायकवडी कंपनीने मार्गदर्शनाच्या भूमिकेत राहावे आणि हा कारखाना नागनाथ अण्णा असताना ज्या पद्धतीने वेगवेगळ्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली चालवला जात होता, तसाच तो चालवला जावा. हुतात्मा बँक, हुतात्मा बजार, दूध संघ, सर्व शिक्षण संस्था यांचा कारभार लोकांच्या हाती सोपवावा तो पारदर्शी असावा यासाठी सर्व संस्थांच्या संचालक मंडळांच्या बैठका या सर्वांसाठी खुल्या करून टाकाव्यात आणि नागनाथ अण्णांनी जो पारदर्शी कारभाराचा आदर्श घालून दिला तशा पद्धतीनेच या संस्था चालवल्या पाहिजेत अण्णा म्हणत होते त्याप्रमाणे कुटुंबातील कोणालाही जवळ घेतले तर भ्रष्टाचाराचा संशय बळावतो. एवढेच नव्हे तर तो होतोच. यावर ते ठाम होते त्यामुळे त्यांनी कधीही या सर्व पिळावलींना जवळ केले नव्हते.

सामाजिक न्याय
साखर कारखान्याचे अध्यक्षपद महिलेला दिले. दलिताला दिले. ओबीसीला दिले. अशा प्रकारे सामाजिक न्यायाचा पाया देखील त्यांनी घातला. ज्या धरणग्रस्तांच्या त्यागामुळे शेतीला पाणी मिळाले आणि साखर उद्योग उभा राहिला. त्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी कारखान्याचा पैसा दिला आणि त्यांच्यासाठी सरकारशी संघर्ष केला. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळाले पाहिजे, यासाठी कारखान्याची साधने वापरून लोक चळवळ उभी केली. सामाजिक लढ्याचे अनेक उपक्रम हाती घेतले. जात्यांध आणि धर्मांध शक्तींना विरोध करण्यासाठी त्यांनी सातत्याने संघर्षाचे हत्यार उपसले. अशा सर्व चळवळीपासून दूर असणारी ही त्यांची पिलावळ (नातेवाईक मंडळी) जणू काही या सर्व संस्था आपल्या मालकीच्या आहेत. किंबहुना वारसा हक्काने त्याचीच मालकी आहे, असे सांगत वाटणीसाठी भांडत आहेत. या संस्थेमध्ये ते सभासद जरूर असतील पण ते मालक निश्चित नाहीत. स्वातंत्र्यवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या प्रतिमेची बदनामी व्हायची नसेल तर सभासदांनी आता ताट मानेने उभे राहिले पाहिजे आणि कारखान्याचा कारभार या सर्व नायकवडी पिलावळांना दूर सारून आपल्या हाती घेतली पाहिजे. ही पिलावळ एका त्यागमूर्ती स्वातंत्र्य सेनानीचे स्मारक जपण्यासाठी काम करत नाही तर त्यांचे थडगे उभे करण्यासाठी काम करीत आहेत, असे त्यांच्या भांडणांवरून दुर्दैवाने म्हणावे लागेल.

वैभवला हाकला
हुतात्मा चळवळ किंवा संकुल याविषयी मी अनेक वेळा कौतुकाने भरभरून लिहिलेले आहे. आज अशा प्रकारचे लिखाण करण्याची वेळ माझ्यावर येईल, असे कधीच वाटले नव्हते. ज्या त्याग मूर्तीचा आदर्श घेऊन आम्ही सार्वजनिक जीवनात पारदर्शी जीवन जगण्याचा वसा माझ्यासह असंख्य लोकांनी घेतला. अशा नागनाथ अण्णा नायकवडी यांचे स्थान आमच्या जीवनामध्ये पित्या समान आहे. आजही वाळवा किंवा हुतात्मा हे नाव उच्चारताच नागनाथ अण्णांची प्रतिमा समोर उभी राहते. त्यांचे विचार, काम करण्याची सचोटी, कष्टकरी लोकांच्या बद्दल असलेली निष्ठा, स्वातंत्र्यलढ्यासाठी जीव मुठीत घेऊन लढणारे सेनानी या सर्व भूमिका समोर दिसतात.

अशा माणसाच्या कुटुंबामध्ये ही पिलावळ कशी जन्माला आली आणि त्यांनी इतर अनेक सहकारी संस्थांमध्ये ज्या प्रकारे भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार चालतात त्याच वाटेने जाण्याचा मार्ग कसा स्वीकारला याचे कोडे पडते. लोक काय म्हणतील याचेही भान यांना नाही इतके हे बेधुंद झाले आहेत. या सर्वांना अद्दल घडवल्याशिवाय पुन्हा एकदा ‘हुतात्मा’चे वैभव उभे राहणार नाही. यासाठी पहिल्यांदा “या दिवट्या वैभव”ला वाळव्यातून हाकलून दिले पाहिजे. वाळवा म्हणजे अण्णा आणि अण्णा म्हणजे वाळवा..!

यावर आपले मत नोंदवा

अभिलेख (Archives)