एका सामान्य ग्रामीण शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेले आणि सहकारी साखर कारखान्यामध्ये टाईम कीपरची नोकरी केलेल्या श्री.अंकेगौडा या माणसाने आयुष्याला जोडून घेतलेल्या एका छंदातून वीस लाख पुस्तके जमवली आणि त्याचे मोफत ग्रंथालयात रूपांतर करून जनतेला खुले करून दिले. इतके प्रचंड मोठे काम करून ठेवले आहे.

श्री. अंकेगौडा

के. अनंतारामू या गुरुवर्याने उपदेश दिला होता की “आयुष्यात कोणाकडूनही लाच स्वीकारू नका, शेजाऱ्यांशी स्नेहाने वागा आणि आयुष्यात चांगल्या सवयी लावून घ्या.” शालेय जीवनापासून त्यांचा हा उपदेश अंकेगौडा यांनी तंतोतंत पाळला. वाचन करण्याची सवय त्यांनी लावून घेतली आणि आयुष्यभर वाचतच राहिले. वाचण्याचा छंद जडल्याने या अवलिया माणसाने हजार दोन हजार नव्हे तर तब्बल वीस लाख पुस्तके जमवली आहेत आणि आज पुस्तका मने (पुस्तकांचे घर) नावाने त्यांनी स्वतःचे ग्रंथालय उभे केले आहे. आपल्या देशात स्वतःच्या संग्रहामध्ये सर्वाधिक पुस्तके असण्याचा मान त्यांना जातो. अलीकडेच त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन भारत सरकारने गौरव केला. गुरुवर्यांच्या उपदेशाप्रमाणे अंगी बानवलेल्या एका चांगल्या सवयीचे रूपांतर इतक्यात भव्य दिव्य कार्यात रूपांतरीत झाले.

कर्नाटकाच्या मंड्या जिल्ह्यामधील पांडवपुरा तालुक्यात चिनाकुर्ली गावात १९४७ मध्ये अंकेगौडा यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मरीगौडा आणि आई निंगम्मा शेती करीत होते. गावात प्राथमिक शाळा होती. चौथीला असतानाच गुरुवर्यांचा त्यांना हा जीवन मार्ग दाखवणारा उपदेश दीपस्तंभासारखा मदतीला धावून आला. त्यानुसार ते चौथीला असतानाच स्वामी विवेकानंद यांच्या संबंधित पुस्तक वाचायला घेतले आणि जे तेव्हापासून पुस्तक वाचण्याचा छंद जडला तो आज अखेर सात दशके कायमचा चालू आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यातील कमाई पुस्तकं खरेदी करण्यासाठीच वापरली. पदवीपर्यंतचे शिक्षण पांडवपुरा येथे झाले आणि कर्नाटक राज्य एसटी महामंडळामध्ये वाहकाची नोकरी मिळाली. ती केवळ अकराच महिने त्यांनी केली. कारण याच दरम्यान महाविद्यालयातील एक शिक्षक पुन्हा भेटले आणि त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला. अंकेगौडा तो यांनी तंतोतंत पाळला. वाहक पदाची नोकरी सोडून ते म्हैसूरला महाराजा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कन्नड विषय घेऊन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

एका बाजूला वाचण्याचा छंद चालूच होता. त्यांना दोन मोठ्या बहिणी होत्या. आई-वडील काही खाऊ घेण्यासाठी पैसे द्यायचे त्या पैशातून अंकेगौडा पुस्तके खरेदी करून वाचन करायचे. बहिणींना मिळणाऱ्या पैशातूनही ते पुस्तके खरेदी करायचे. अशा पद्धतीने त्यांनी वाचनाचा छंद लावून घेतला त्याच्यामध्ये कन्नड साहित्य, धार्मिक साहित्य, सांस्कृतिक साहित्य आणि इतिहास यांचा सुरुवातीच्या काळामध्ये समावेश होता.

टाईम कीपरची नोकरी
पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना पांडवपुरा सहकारी साखर कारखान्यामध्ये टाईम कीपरची नोकरी मिळाली. ही नोकरी त्यांनी 33 वर्षे केली. या नोकरीतून मिळणाऱ्या पगाराची बहुतांश रक्कम पुस्तके खरेदी करण्यासाठीच खर्च केली. असे करीत करीत त्यांच्याकडे २०१६ पर्यंत लाखो पुस्तके जमा झाली होती. निवृत्त झाल्यानंतर जी काही रक्कम मिळाली त्यातून पांडवपुरा या नगरपालिका असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी थोडा घराचा विस्तार करावा आणि ग्रंथालय करावे अशी त्यांची इच्छा होती. आपण लहानपणी इच्छा असून देखील खूप काही वाचू शकलो नाही. ग्रामीण भागात गरिबी असल्याने आणि तिथे पर्यंत पुस्तके पोहोचत नसल्यामुळे तरुण पिढी वाचू शकत नाही. अशी खंत त्यांच्या मनात होती. ही उणीव पुढच्या पिढीला जाणवू नये, यासाठी आपण खरेदी केलेली आणि वाचलेली पुस्तके ग्रंथालयाच्या रूपाने समर्पित करावी अशी त्यांची भावना होती. यासाठी त्यांनी श्री अंकेगौडा प्रतिष्ठान स्थापन केले आणि या प्रतिष्ठानतर्फे ग्रंथालय उभे करण्याचा मनोदय व्यक्त केला.

पुस्तकांच्या गराड्यात श्री. अंकेगौडा

आयुष्याची सारी कमाई पुस्तक खरेदी करण्यामध्ये घालविलेली असल्यामुळे त्यांना आता सुमारे वीस लाख पुस्तकांची व्यवस्था करण्यास मोठे ग्रंथालय करणे शक्यच नव्हते. पांडवपुराचे सुपुत्र असलेले कर्नाटकातील नामांकित उद्योजक हरी खोडे झाली यांनी गावकऱ्यांसाठी मंदिर बांधण्याचे काम हाती घेतले होते. त्यावेळी त्यांचा श्री. अंकेगौडा यांच्याशी संपर्क आला. पुस्तके जमवण्याची आणि ती वाचण्याची तसेच नव्या पिढीला ती मोफत उपलब्ध करून देण्याची अंके गौडा यांचा तळमळ पाहून हरी खोडे यांनी त्यांना स्वखर्चाने ग्रंथालय बांधून देण्याचा निर्णय घेतला. सुमारे सोळा हजार चौरस फूट ग्रंथालय उभे केले. त्याच ग्रंथालयाच्या दोन छोट्या खोल्यांमध्ये अंकेगौडा पत्नी आणि मुलासह राहतात.

विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक, संशोधक शिवाय सामान्य नागरिक या ग्रंथालयाचा उपयोग करून घेतात. तिथे कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जात नाही. ग्रंथपाल नाही. त्यामुळे वीस लाख पुस्तकातून तुम्हाला हवी ती पुस्तकं सापडत नसतील तर अंत्यगौडा यांना सांगितल्यानंतर काही क्षणात तुम्हाला हवे असलेले पुस्तक काढून देतात. तुम्ही स्वतः देखील त्या ग्रंथालयात जाऊन तासन तास बसू शकता. या ग्रंथाला कधीही सुट्टी असत नसते. असा हा एक अवलिया माणूसाच्या कामाकडे लिमका बुक्स ऑफ रेकॉर्डचे २०१६ मध्ये लक्ष गेले. वैयक्तिक पातळीवर पुस्तकांचा संग्रह करून ठेवण्याचा हा भारतातील सर्वात मोठा उपक्रम म्हणून श्री. अंकेगौडा यांची नोंद झाली.

कन्नड भाषेविषयी त्यांना आकर्षण आहेच. कारण त्यांची ती मातृभाषा आहे. त्यांनी अखिल भारतीय कन्नड साहित्य संमेलनाला नेहमीच हजेरी लावली. कर्नाटक राज्योत्सव समितीने त्यांचा सत्कार करण्यात आला. अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. यावर्षी भारत सरकारने त्यांचा पद्मश्री देऊन गौरव केला. शिक्षण प्रसार आणि वाचन संस्कृती वाढीस कार्य केल्याबद्दल हा गौरव झाला. मात्र त्यांच्या ग्रंथालयामध्ये केवळ कन्नड पुस्तके नाहीत तर भारतातील सुमारे बावीस भाषेतील सर्व प्रकारच्या विषयांची पुस्तके आहेत. शिवाय काही परदेशी भाषेतील पुस्तके देखील त्यांच्याकडे आहेत. सुमारे पस्तीस हजार आंतरराष्ट्रीय पाक्षिके आहेत. कन्नड भाषेतील अडीच हजार पक्षीकांचाही संग्रह आहे. पाच हजार शब्दकोश (डिक्शनरी) त्यांच्याकडे आहेत. महाभारत, जैन तत्वज्ञान, बौद्ध तत्त्वज्ञान आणि ख्रिश्नीनीटी या विषयावरील असंख्य पुस्तके आहेत. महात्मा गांधी आणि भगवद्गीतेवर हजारो पुस्तकांचा समावेश आहे. त्यांच्या संग्रहामध्ये इतिहासावरती हजारो पुस्तके जमा झालेली आहेत. असा आता कोणताही विषय नाही की त्यावरील पुस्तक नाही.

अंकेगौडा यांचे ग्रंथालय

अनेकांची भेट
अंकेगौडा यांच्या ग्रंथालयाचा लाभ असंख्य विद्यार्थी घेत आहेत. शिक्षक घेत आहेत. तसेच संशोधक पण घेत आहेत. या ग्रंथालयास अनेक नामवंतांनी भेट दिली. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि सदानंद गौडा यांनी देखील भेट दिली आहे. कुमार स्वामी यांनी भेट दिली तेव्हा ते मुख्यमंत्रीपदी होते. त्यांनी तुम्हाला हवी ती मदत देण्यास तयार आहे. असे सांगितल्यानंतर अपुऱ्या पडणाऱ्या जागेवरती आणखीन दोन इमारती त्यांना बांधून दिल्या.

एका सामान्य ग्रामीण शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेले आणि सहकारी साखर कारखान्यामध्ये टाईम कीपरची नोकरी केलेल्या या माणसाने आयुष्याला जोडून घेतलेल्या एका छंदातून इतके प्रचंड मोठे काम करून ठेवले आहे. “आता माझी क्षमता संपलेली आहे. हे पुढच्या पिढीने चालवले पाहिजे किंवा शासनाने सर्व काही ताब्यात घेऊन जनतेला सदैव उपलब्ध करून द्यावे” अशी त्यांची इच्छा आहे. अंकेगौडा यांना साष्टांग नमस्कार…!

यावर आपले मत नोंदवा

अभिलेख (Archives)