आपल्या देशाच्या ऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दोन गोष्टींकडे आवर्जून लक्ष गेले. त्यापैकी एक म्हणजे ठिकठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या पुढाकाराने काढलेली तिरंगा यात्रा. आणि दुसरी एक घटना म्हणजे कर्नाटक शैलीचे गायक आणि संशोधक टी.एम. कृष्णा यांच्या ‘वी पीपल ऑफ इंडिया’ या अलीकडेच प्रकाशित झालेल्या ग्रंथाचा वेध घेणारा एक सविस्तर लेख वाचनात आला. या दोन्ही बाबतीत बरेच विचार करणारे साम्य आढळून आल्याने हा विषय “जागर” मध्ये मांडावा असे वाटले. याला तिसरी घटना एक पार्श्वभूमी म्हणून निश्चित आहे. वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला राष्ट्रगीताचा दर्जा देण्याचा निर्णय विधेयक आणून घेण्यात आला. त्यामुळे स्वातंत्र्य दिन सोहळ्यामध्ये हे गीत प्रथमच गायले तसेच प्रत्येक शासकीय कार्यक्रमांमध्ये या गीताचा आता समावेश केला जात आहे.

टी.एम. कृष्णा यांनी स्वातंत्र्योत्तर भारताची ओळख ठसवण्यासाठी निवडण्यात आलेल्या विविध राष्ट्रीय प्रतीकांचा आपल्या पुस्तकामध्ये सखोल विश्लेषणात्मक आढावा घेतलेला आहे. मग ते राष्ट्रगीत असेल किंवा राष्ट्रध्वज असेल. सत्यमेव जयते हे घोषवाक्य असेल किंवा राष्ट्रीयत्वाचे प्रतीक म्हणून अशोकस्तंभ असेल..! या सर्व प्रतिकांची निवड करताना कसा वाद विवाद तथा संवाद झाला..? त्या मागच्या विचार प्रेरणा कोणत्या होत्या.? भारतासारख्या राष्ट्राला एक संघ ठेवू शकतील आणि अभिमान वाटतील अशी प्रतीके कुठले असतील.? याचाही विचार खोलवर करण्यात आला होता.

टी एम कृष्णा यांचे पुस्तक वुई द पीपल ऑफ इंडिया

देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताना याची चर्चा सुरू झाली होती. यामध्ये आपल्या असंख्य स्वातंत्र्य सेनानींनी आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि भारतीय समाज रचनेचा सखोल विचार करून निवड केली आहे. सद्यस्थितीत आपण आपल्या प्रतीकांच्या निवडीच्या विचाराच्या मुळापासून किंवा त्यांच्या उद्दिष्टापासून दूर चाललो आहोत अशा प्रकारची एक भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे या सर्व राष्ट्रीय प्रतीकांच्या उगमांचा शोध घेण्याचा प्रयत्न करावा, असे वाटले असणार आहे. त्यामध्ये टी. एम. कृष्णा पूर्णपणे यशस्वी झाले आहेत.

पाच प्रकरणे
पाच प्रकरणांमध्ये विभागलेल्या या पुस्तकाची सुरुवात तिरंगा या राष्ट्रीय ध्वजापासून होते. तिरंगा हा राष्ट्रीय ध्वज स्वीकारताना खूप विचारमंथन झालेले आहे. त्याचा रंग कसा असावा, आकार कसा असावा, त्यावर बोधचिन्ह कोणते असावे.. या साऱ्यांचा विचार होत होता. त्यामध्ये महात्मा गांधी, विनायक दामोदर सावरकर, नेताजी सुभाष चंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यापासून असंख्य स्वातंत्र्य सेनानी आणि विचारवंतांनी मंथन केलेले आहे.

तिरंगा हा झेंडा म्हणून १९०७ मध्ये प्रथम इंटरनॅशनल सोशालिस्ट काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये फडकविण्यात आला. तेव्हापासून राष्ट्रध्वज ही संकल्पना रुजायला सुरुवात झाली. अन्यथा भारतात असलेल्या ५६५ संस्थानिकांचे स्वतंत्र ध्वज होते. पुढे याचे स्थित्यंतर कसे होत गेले.. राष्ट्र ध्वज कसा असावा त्यामध्ये धार्मिक प्रतिकांचा उल्लेख असावा की नसावा.? आदी मुद्द्यांचा विचार करण्यात आला.

दुसऱ्या प्रकरणांमध्ये बोधचिन्हांचा विचार करण्यात आला आहे. इसवी सन पूर्व काळामध्ये सम्राट अशोक यांनी निर्माण केलेल्या चौमुखी सिंह शिल्प याची निवड करण्यात आली. हा देखील खूप विचारपूर्वक निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये लोकशाही मूल्यांची प्रेरणा असल्याची मते मांडण्यात आली. तिसरे प्रकरण सत्यमेव जयते हे राष्ट्रीय घोषवाक्य म्हणून तसे निवडण्यात आले. याचा रंजक इतिहास देण्यात आलेला आहे.त्या मागील विचार कोणता होता याचा आढावा घेण्यात आला आहे. चौथ्या प्रकरणांमध्ये राष्ट्रगीत निवडीचा विषय मांडण्यात आला आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले जन गण मन की बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी लिहिलेले वंदे मातरम् या दोन प्रेरणादायी गीतांपैकी कोणत्या गीताची निवड करायची..? याची चर्चा जी झाली त्याचा आढावा घेण्यात आलेला आहे.

वंदे मातरम् हे गीत पहिल्यांदा १८९६ मध्ये कलकत्ता येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात प्रथम गायले गेले होते. त्यामुळे या दोन्ही गीतांचा प्रवास हा समांतरच आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने जन गण मन हे आमचे राष्ट्रगीत असल्याचे १९४२ मध्ये जाहीर केले होते. पुस्तकाच्या पाचव्या आणि अखेरच्या प्रकरणांमध्ये भारतीय राज्यघटनेच्या संविधानाच्या उद्देशिकेवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. यात वापरलेली भाषा, व्यक्त केलेली भावना आणि जगभरातील राज्यघटनांशी तुलना करून मांडणी करण्यात आलेले आहे. त्यामधील बंधुता हा शब्द खूप महत्त्वाचा ठरलेला आहे. यासाठी लेखकाने १९४ देशांच्या संविधानांचा धांडोळा घेतलेला आहे.

स्वतंत्र भारत
भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रत्यक्ष आंदोलन करून जितक्या तडफेने स्वातंत्र्यसेनानी यांनी भाग घेतला. त्याच्याहून अधिक तडफेने स्वतंत्र होणारा भारत कसा असेल.? याचा विचार विनिमय करण्यात आला. याची प्रचिती टी.एम.कृष्णा यांच्या पुस्तकाचे ज्येष्ठ पत्रकार शेखर देशमुख यांनी करून दिलेल्या परिचयामध्ये सारखे जाणवत राहते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले आहे. तेव्हापासून गेल्या बारा वर्षांमध्ये स्वातंत्र्य लढ्याच्या मंथनातून समोर आलेली मग ती राष्ट्रीय प्रतिके असोत किंवा जो स्वातंत्र्यातील संग्रामाचा इतिहास जागोजागी जाणवतो आहे. त्यातील निवडक आणि बहुसंख्यांकवादी राजकारणाला पोषक ठरेल अशाचीच निवड केली जाते. त्यातून सातत्याने हिंदू मुस्लिम मतभेद कसे पुढे येऊ शकतील याची दक्षता घेतली जाते.

कर्नाटक शैलीचे गायक आणि लेखक टी. एम.कृष्णा. छाया: अमर रमेश

देशाला स्वातंत्र्य मिळत असताना फाळणी ज्या पार्श्वभूमीवर झाली तो इतिहास बाजूला ठेवून काँग्रेसने फाळणी घडवून आणली. असा आरोप करण्यापर्यंत या मंडळींचा प्रयत्न चालू आहे. देशाच्या उभारणीची बीजे पेरण्यामध्ये स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाटा खूप मोठा होता. आधुनिक भारताच्या पाऊल खुणांमध्ये जिकडे तिकडे पंडित जवाहलाल नेहरू यांची प्रतिमा सध्याच्या राजकारण्यांना दिसते आहे. त्यामुळेच ही सर्व राष्ट्रीय प्रतीके बाजूला सारून किंवा ती बाजूला करता येत नसतील तर त्याला शरण जाऊन नव्या प्रतीकांचा समावेश केला जात आहे. वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला जन गण मन या राष्ट्रगीताच्या बरोबरीचा दर्जा देत असताना जन गण मन नाकारण्याचे धाडस त्यांच्यात नाही. सर्वच राष्ट्रीय प्रतीके निवडताना वाद-विवाद झाले. पण अंतिम निर्णय घेताना त्यामागे एक वैचारिक भूमिका स्पष्ट होती ती भारताचा गौरव करणारी होती हे इतिहासाने सिद्ध करून दाखवलेले आहे. सखोल विचारमंथन करून ही सर्वच प्रतीके निवडली गेली आहेत. तत्कालीन स्वातंत्र्य सेनानींच्या तोडीचे राज्यकर्ते आज नाहीत. त्यामुळे त्यांनी केलेल्या विचारांती निर्णयाचे खंडन करणे शक्यच नाही.

तिरंगा यात्रा
वंदे मातरम् चा स्वीकार करताना अनेक वाद प्रतिवाद झाले. आता दोन्ही गीतांचा स्वीकार करण्यात आला. शिवाय प्रत्येक राज्याने आपापल्या राज्य गीताचा देखील स्वीकार करून त्याप्रमाणे अंमल करावा असे ठरवण्यात आले. या निर्णयाच्या तथाकथित सन्मानार्थ म्हणून राजकीय संधी साधण्याचा प्रयत्न भाजपा करीत आहे. त्यासाठी सरकारी यंत्रणेला त्यांनी हाताशी धरलेले आहे. पण दाखवण्याचे दात आणि खाण्याचे दात वेगळे आहेत हे वारंवार भाजपच्या बाबतीत घडताना दिसत आहे.

बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पाटण्यात काढण्यात आलेली तिरंगा यात्रा. छाया: पीटीआय

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने दिनांक ७ ते १७ ऑगस्टपर्यंत तिरंगा यात्रा आयोजित करण्याचे फर्मान काढले होते. तसा हा शासकीय कार्यक्रम म्हटले पाहिजे. शासन पातळीवर समाजातील सर्वच घटकांना सोबत घेऊन ही तिरंगा यात्रा ऐंशीव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त काढण्याबाबत कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. ही तिरंगा यात्रा भारतीय जनता पक्षाने हायजॅक करून राजकारण साधण्याचा प्रयत्न केला. जिकडे तिकडे ही यात्रा काढण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री आणि मुख्यमंत्री देखील आघाडीवर असल्याचे दिसले. ही तिरंगा यात्रा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम असल्याच्या पद्धतीने काढण्यात आली. तिरंगा हा राष्ट्रध्वज आपला होऊ शकत नाही, अशी भूमिका मांडणारे काही महाभाग आजही समाजात उजळ माथ्याने फिरत आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. ते राज्यकर्त्यांचे लाडके असू शकतात.

पण एक गोष्ट निश्चित आहे की, ज्यांनी तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज नाही, असे सांगत अनेक वर्ष काढली. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा समावेश आहे. त्या संघाच्या राजकीय पक्षाला तिरंगा यात्रा काढून स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची वेळ आली. हे काही कमी नाही. भारतातील झुरळ गॅंगने हे करून दाखवलेले आहे. आता नव्याने साऱ्याची चर्चा करण्याची वेळ आलेली आहे. केवळ भावनिक मुद्दे किंवा बहुसंख्यांक वादाला कुरवाळून बहुसंख्यांक विरुद्ध अल्पसंख्यांक अशी समाजात फूट पाडून होट बँकेचे राजकारण करण्याचे दिवस संपुष्टात येऊ लागल्याने ही शरणागती पत्करले आहे का…? याचाही विचार आता केला पाहिजे.

“अखेर तिरंगा ध्वजापुढे शरण..!” वर एक प्रतिसाद

  1. आदरणीय साहेब आपण म्हणतात तसे १०१ टक्के खरेच आहे. ज्या जातियवादी,धर्मांध, एस. एस. ची पिलावळ भाजप म्हणून सत्तेवर बसली आहे त्यांना वारंवार तिरंगा घेऊनच जनते समोर येणे हे त्यांचे अपयश आहे. आणी ते महिन यश आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्वच नेत्यांचे आहे. महात्मा गांधी म्हणाले होते कि स्वतंत्र भारताची राज्यघटना फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच सर्वसमावेशक तयार करून हा देश एकत्रित बांधू शकतील. अन्य लोक या देशाला एकसंघ बांधू शकत नाहीत.

    हीच त्या महात्म्याची दूरदृष्टी होती. आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कर्तृत्व सिद्ध होते.

    Like

यावर आपले मत नोंदवा

अभिलेख (Archives)